
आष्टी( प्रतिनिधी )
महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य
विभागामार्फत दिला जाणारा “डॉ.बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण राज्यस्तरीय पुरस्कार”
यंदा डॉ.संदेश वाघ यांना जाहीर करण्यात आला आहे.आंबेडकरवादी चळवळीतील त्याच्या
मोलाच्या योगदानाबद्दल हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येत आहे.या पुरस्कारामध्ये
७५ हजार रु रोख रक्कम,सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र यांचा समावेश आहे. या
पुरस्कारामुळे ते काही शासकीय सवलतीसही पात्र ठरणार आहेत.डॉ.वाघ हे कर्मवीर
दादासाहेब वाघ व शांताबाई वाघ यांचे सुपुत्र आहेत.त्यांनी महाराष्ट्र राज्याच्या
अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती आयोगावर सदस्य सचिव म्हणून महत्त्वपूर्ण भूमिका
बजावली आहे.सध्या ते मुंबई विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक आहेत. डॉ.वाघ
यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर,बौद्ध धम्म आणि इतिहास विषयावर इंग्रजी, मराठी आणि
हिंदी या भाषांमध्ये अनेक पुस्तके लिहिलेली आहेत.त्यांनी फ्रान्स,
जर्मनी,स्वित्झर्लंड,इटली, मलेशिया,सिंगापूर,मॉरिशस, नेपाळ,थायलंड,इंडोनेशिया,
श्रीलंका आदी देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये आयोजन व प्रतिनिधीत्व केले
आहे.ते भारत सरकारच्या ICHR (आय.सी.एच.आर.) संस्थेच्या पश्चिम भारताचे समन्वयक
म्हणूनही कार्यरत होते. महाराष्ट्र शासनाच्या आंतरजातीय विवाह कायदा मसुदा
समिती,आकस्मिकता योजना समिती आणि महात्मा फुले लेखन प्रकाशन समितीवर त्यांनी सदस्य
म्हणून योगदान दिले आहे.राज्य शासनाकडून पुरस्कार जाहीर करून डॉ. वाघ यांचा गौरव
करण्यात आल्याने सामाजिक चळवळीतील कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
चौकट
--------
दरम्यान,महाराष्ट्र शासनाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार डॉ.
संदेश वाघ यांच्यासारख्या अत्यंत कार्यप्रवण,अभ्यासू, संवेदनशील साहित्यिक यांना
त्यांच्या कार्याची दखल घेऊन जाहीर करण्यात आला आहे, ही अत्यंत आनंददायी बाब
आहे.डॉ.वाघ सरांचे अभिनंदन करून शुभेच्छा सामाजिक कार्यकर्ते डॉ. सुभाष चव्हाण आणि
आंबेडकर राइट्स ऑफ हिस्टरी असोसिएशनचे राष्ट्रीय युवा अध्यक्ष प्रा.विकास गवई यांनी
दिल्या आहेत. -----------------------------------
0 टिप्पण्या