


आष्टी ( प्रतिनिधी )
मराठी ही आत्म्याची भाषा आहे. रसाळ वाणी, अध्यात्म चिंतन आणि परमार्थाची गोडी हे सर्व जीवन अनुभव मातृभाषेतून निर्माण होतात. त्या अनुषंगाने अकरावी बारावी वर्गासाठी राज्यभरातील शाळा व शिक्षण संस्थांमधून मराठी ही मातृभाषा विषय अध्यापनामध्ये सक्तीचा करण्यात यावा,यासाठी राज्यभरातून मागणी पुढे येत असून महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाच्या वतीने आतापर्यंत २४ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे पाठपुरावा करण्यात आला असल्याची माहिती महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा. सुनील डिसले यांनी आज येथे दिली. अस्खलित शब्दांचा प्रतिभाषाली अविष्कार मराठी भाषेतून होत असतो. संतांच्या कृपेने मनुष्याचे जीवन सार्थकी लागते तसे मराठी भाषेतून ज्ञान निर्मिती होते आणि विकासाच्या दिशेने जाण्यास अनुकूलता निर्माण होते" असे मत महासंघाचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ. अशोक देवगुडे यांनी व्यक्त केले.
शासनाने नुकताच १३ सप्टेंबर २०२५ च्या निर्णयात द्वारे सर्व शासकीय निमशासकीय शिक्षण संस्थांमधून मराठी भाषा अनिवार्य केल्याचे स्पष्ट केले आहे; परंतु अमलबजावणी च्या मध्ये दहावीपर्यंत ही बाब अधोरेखित झालेली दिसून येते. म्हणून इयत्ता अकरावी, बारावी या शालेय शिक्षण विभागाच्या वर्गांमध्येही मराठी ही मातृभाषा महाराष्ट्रा मध्ये सर्वत्र सक्तीची करून ज्ञानभाषेचा मार्ग खूला करावा अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघाचे बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ.आत्माराम झिंजुर्डे, बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांनी केली आहे.
राज्यभरातून निवेदनाद्वारे जिल्हाधिकाऱ्यांना ही मागणी करण्यात आली आहे. आतापर्यंत राज्यातील २४ जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाने अधिकृतपणे निवेदनाद्वारे ही मागणी करून आग्रह धरला आहे; तर अन्य जिल्ह्यामध्ये ही मागणी करण्यात येत आहे. यासाठी मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्याध्यक्ष प्रा सुनील डिसले बारामती, राज्य कार्याध्यक्ष संपत गर्जे पुणे, कार्याध्यक्ष डॉ. मनीषा रिठे, सचिव बाळासाहेब माने, कोषाध्यक्ष प्रा.येनगुरे भंडारा आदीसह राज्यातील सर्व जिल्हा आणि तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयीन सतरावरील मराठी भाषा विषय शिक्षक मागणीचा पाठपुरावा करत परिश्रम घेत आहेत.
चौकट
---------
महासंघाकडून बीड जिल्हा पदाधिकार्यांचे कौतुक
--------------------------------
राज्यातून २४ जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाने अधिकृत निवेदनाद्वारे कनिष्ठ महाविद्यालयीन स्तरावर मराठी विषय सक्तीचा करावा यासाठी मागणी केलेली आहे.बीड येथे तर राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देऊन व चर्चेद्वारे हीया बाबीचा आग्रह धरल्याबद्दल बीड जिल्हाध्यक्ष प्रा.डॉ. आत्माराम झिंजुर्डे,कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक देवगुडे, बीड जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांच्यासह पदाधिकार्यांचे कौतुक केले आहे.
0 टिप्पण्या