विशेष लेख
---------
उत्तम बोडखे आष्टी
---------+

---
स्वतःसाठी जगतो तो मरतो; आणि इतरांसाठी जगतो तोच खरा जगतो..!' असे म्हणतात;
किंबहुना गोरगरीब दिन,दलीत, दुबळ्या,अनाथ, अपंग, शेतकरी, शेतमजूर व कामगारांची दुःख
वेदना पाहून ज्याचं मन तळमळतं तो संवेदनशील असतो.याच भावनेतून खऱ्या अर्थाने शिक्षण
क्षेत्रामध्ये अत्यंत उच्च पदावर गलेलठ्ठ पगार असूनसुद्धा केवळ स्वतःचं कुटुंब
प्रमाण मानून मजेशीर न जगता.. तमाम गरजू गरिबांच्या हक्कांसाठी नवा प्रेरणादायी
क्रांतीकारी विचार देण्याचा सातत्याने प्रयत्न करून..त्या दिशेने कर्तव्य
बजावणारा... शिक्षण क्षेत्रातील दैदिप्यमान हिरा..आणि प्रखर पुरोगामी शैक्षणिक आणि
सामाजिक विचारांचा प्रेरणास्त्रोत तथा चकाकणारा तेजस्वी सूर्य म्हणून
प्रा.ज्ञानेश्वर नवले सर यांच्या नावाला एक वेगळे वलय निर्माण झाले आहे. अत्यंत
सामान्य परिस्थिती. शेतकरी कुटुंबात जन्म.त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेतून
ज्ञानगंगेची सुरुवात केल्यानंतर आई-वडिलांचे पाठबळ आणि स्वतःच्या हिमतीवर प्रतिकूल
परिस्थितीत सुद्धा वह्या पुस्तक आणि पेनाच्या संगतीने त्यांनी यशस्वी शिखर गाठले!
पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर थेट आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयात
वरिष्ठ प्राध्यापक म्हणून सेवा करण्याची मौल्यवान संधी प्राप्त झाली.या संधीचे सोने
न करतील ते प्राध्यापक ज्ञानेश्वर नवले कसले? त्यांनी आपल्या आजपर्यंतच्या
प्राध्यापकपदाच्या प्रदिर्घ कार्यकाळात राष्ट्राची प्रमुख घटक मानली जाणारी युवा
पिढी घडवण्याचे मौलिक काम केले.विद्यार्थी घडला पाहिजे, युवक रास्त मार्गाने चालला
पाहिजे,लोकशाहीच्या आणि समता,बंधुत्व आणि एकतेच्या, सर्व धर्म समभाव आणि
बंधुत्वाच्या नात्यांनी सजलेला.. नटलेला..विद्यार्थी घडला पाहिजे,ही भूमिका त्यांची
सातत्याने राहिली.म्हणूनच त्यांचे आज विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात
विविध क्षेत्रात अत्यंत सक्षमपणे विविध पदावर कर्तव्य बजावताना दिसतात. हे नवले
सरांचे मोठेपण आहे. नवले सरांनी विद्यार्थ्यांबरोबरच छत्रपती शिवाजी महाराज,
राजमाता जिजाऊ,राजे संभाजी,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,म. ज्योतिराव
फुले,क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,राजर्षी शाहू महाराज,अहिल्यादेवी यांच्या
विचार कार्याला प्रमाणिकपणे पुढे नेण्याचा प्रत्येकवेळी सातत्याने प्रयत्न केला.आज
नवले सरांच्या सेवेचा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होतो. राजकीय,सामाजिक,
शैक्षणिक,सांस्कृतिक,क्षेत्रातील मान्यवर समाजसुधारकांच्या उपस्थितीमध्ये संपन्न
होत आहे. प्रा.नवले सरांची सेवा खऱ्या अर्थाने सार्थकी लागली आहे. यात शंका नाही
परंतु त्यांच्या या आजपर्यंतच्या सेवा कार्याला त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप
टाकून गुणगौरव करण्याचा आजचा आनंदाचा दिवस आहे. बीड जिल्ह्यातील पारगाव सीरस येथील
विश्वनाथ मारुती नवले व सुंदरबाई विश्वनाथ नवले या शेतकरी दांपत्याच्या पोटी दि.१०
एप्रिल १९६७ साली प्रा.ज्ञानेश्वर नवले यांचा जन्म झाला.पाचवी पर्यंतचे प्राथमिक
शिक्षण खानपिट सर व दहिवाले सर यांच्या मार्गदर्शनाने पूर्ण केल्यानंतर ज्ञानेश्वर
नवले यांचे मोठे बंधू प्रा. सुदाम नवले यांनी पुढील शिक्षणासाठी वडिलांच्या
सांगण्यावरून पुणे चिंचवड येथे त्यांना घेऊन गेले. सुदाम व मिठू या वडील बंधूनी
फत्तेचंद जैन विद्यालय चिंचवडगाव पुणे येथे त्यांचे माध्यमिक शिक्षण पूर्ण केले.
त्याकाळी लतिष बलकवडे व सुरेंद्र भंडारी या मित्रांच्या घरीच ते अभ्यासाला असायचे
स्व. संगीता ठाकूर या त्यांच्या बहिणीने त्यांची खूप काळजी घेतली. दहावी झाल्यानंतर
वकील व्हायचे हे त्यांचे स्वप्न होते मात्र शिक्षणाची जबाबदारी दोन भावांनी घेतली
असल्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वर नवले यांनी इंजिनियर व्हावे यासाठी माळेगाव
इंजिनिअरिंग कॉलेज बारामती येथे प्रवेश निश्चित करत इंजीनियरिंग पर्यंतचे शिक्षण
पूर्ण केले.विशेष म्हणजे त्याकाळी ते या महाविद्यालयाचे टॉपर विद्यार्थी होते.या
शैक्षणिक काळात त्यांच्या वहिणी भगीरथी नवले यांनी त्यांचे शिक्षण पूर्ण होईपर्यंत
आईची भूमिका पार पाडली दहावीपर्यंत मोठ्या वहिणीने मुलासारखी काळजी
घेतली.इंजीनियरिंग पदवी पूर्ण झाल्यानंतर प्रा.ज्ञानेश्वर नवले यांचे मोठे बंधू
यांनी त्यांना जबाबदारीची जाणीव करून दिली.आता इथून पुढे तुला तुझा मार्ग शोधायचा
आहे निर्णय घेण्याची क्षमता ठेव असा सल्ला दिला. त्यानंतर वडिलांशी चर्चा करून
प्रा.ज्ञानेश्वर नवले यांनी सरळ बीड गाठले आणि योगायोग म्हणजे त्याच दिवशी १८ जुन
१९९० रोजी छत्रपती शाहू औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमध्ये गणित विषयाचे शिक्षक म्हणून
ते रुजू झाले आणि याच माध्यमातून त्यांनी शिक्षण क्षेत्रात पाऊल टाकले.निर्णयक्षम
झाल्यानंतर आता सोबतीला पाठिंब्याची आवश्यकता आहे. याची जाणीव झाल्यानंतर साक्षाळ
पिंपरी येथील सधन कुटुंब असणारे शाहूराव नन्नवरे यांची मुलगी सुनीता नन्नवरे
हिच्याशी १९९१ साली प्रा.ज्ञानेश्वर नवले यांचा विवाह झाला. यामध्ये चुलत सासरे
असणारे महादेव नन्नवरे यांचे मोठे योगदान लाभले.नोकरी करत असताना विद्यार्थी असलेले
भाऊसाहेब निंबाळकर शहाजी हराळ दिलीप पवार,नितीन खिळे हे आष्टी तालुक्यातील असल्याने
आष्टी शहरात १९९२ मध्ये कला,वाणिज्य महाविद्यालय आष्टीची जाहिरात आली.ती जाहिरात
भाऊसाहेब निंबाळकर या विद्यार्थ्यांनी प्रा. ज्ञानेश्वर नवले यांना दाखवली आणि
विनंती केली की,सर तुम्ही या कॉलेजला शिक्षक म्हणून रुजू व्हावे. या रिक्त जागेचा
अर्ज देखील भाऊसाहेब निंबाळकर यांनीच दाखल केला आणि प्रा.ज्ञानेश्वर नवले यांना
मुलाखतीचे पत्र संबंधित महाविद्यालयाच्या वतीने पाठवण्यात आले.आष्टीत
प्रा.ज्ञानेश्वर नवले हे नवखेच होते. कोणाची ही ओळख नव्हती मात्र ही माहिती त्यांचे
सासरे महादेव नन्नवरे यांना मिळाल्यानंतर त्यांनी डॉ.बी. आर.पंडित यांच्याशी चर्चा
करत त्याचबरोबर ॲड.जगन्नाथ औटे यांच्याशी सल्लामसलत करत संस्थेचे अध्यक्ष ॲड.बी.डी.
हंबर्डे म्हणजेच सर्वांचे " भाऊ " हे आमचे वर्गमित्र आहेत म्हणून औटे साहेब
सहकुटुंब प्रा. नवले यांना घेऊन भाऊंच्या घरी आष्टीला आले.भाऊंनी प्रा.ज्ञानेश्वर
नवले यांना मुलाखतीला ये म्हणून सांगितले.दरम्यानच्या काळात महादेव ननवरे यांनी
भाऊंची भेट घेऊन प्रा.ज्ञानेश्वर नवले यांची परिस्थिती विशद केली एक तास चाललेल्या
या मुलाखतीमध्ये संस्थेचे अध्यक्ष असलेल्या भाऊंनी प्रा.ज्ञानेश्वर नवले यांना हजर
होण्याची सूचना दिली. प्रा.ज्ञानेश्वर नवले यांच्या आयुष्याला कलाटणी मिळाली.
तत्कालीन महाविद्यालयाचे प्राचार्य के.बी.चौरे सरांना भेटून रुजू अहवाल दिला.भाऊंनी
१८ जुन १९९२ रोजी रुजू करुन घेतले. खऱ्या अर्थाने प्रा.ज्ञानेश्वर नवले यांच्या
आयुष्याला स्थैर्य मिळाले परंतु प्रा.नवले यांची आष्टी मध्ये कोणाची ओळख नसल्याची
जाणीव भाऊंना असल्याने त्यांनी ज्ञानेश्वर नवले हे त्यांच्या पत्नी आणि मुलगी
सुज्ञा जुन्या आष्टी शहरातील घरामध्ये प्रा. नवले यांना राहण्याची सूचना केली.
तब्बल १० वर्ष त्या घरात राहूनही एकही पैसा त्याच्या मोबदल्यात प्रा.नवले
यांच्याकडून न घेता शिवाय घराचे लाईट बिल देखील भाऊच भरत होते.खऱ्या अर्थाने
प्रा.ज्ञानेश्वर नवले यांना आई- वडिलांनंतर प्रेमाने हक्काने आणि आदराने मान देणारी
व्यक्ती भाऊंच्या रूपाने भेटली. प्रा.ज्ञानेश्वर नवले यांनी विठ्ठल वाघमारे,पिराजी
बहिर, रावसाहेब गव्हाणे,शशिकांत सावंत,अनिता पोकळे,भागवत नन्नवरे,नारायण गोरे,स्व.
शिवाजी नन्नवरे,पंढरीनाथ नवले,स्वाती ठोंबरे,ओम नवले, भारत ननवरे,सविता गोरे यासह
इतर अनेक विद्यार्थ्यांचे शिक्षण त्यांनी करत या विद्यार्थ्यांची जेवणाची व्यवस्था
देखील स्वतःच्या घरी करून शिक्षण पूर्ण केले. यामध्ये त्यांच्या सुविद्य पत्नी
सुनीता नवले यांनी त्यांना मोलाची साथ दिली. आज ते विद्यार्थी आपला विविध व्यवसाय
करतात. आनंदी जीवन जगत आहेत. महाविद्यालयात सेवा करत असताना लक्ष्मण रेडेकर सर
यांनी सुरुवातीपासूनच मित्र व सहकारी यांची चोख भूमिका पार पाडली तर प्रकाश मेथा हे
अडचणीत वेळोवेळी प्रा.नवले यांना साथ देत होते. सामाजिक क्षेत्रात देखील
प्रा.ज्ञानेश्वर नवले यांनी आपल्या कार्याचा ठसा उटविला आहे,मराठा सेवा संघाच्या
माध्यमातून समाजापर्यंत जाण्याचा योग मिळाला १० वर्षे त्यांनी आष्टी तालुका मराठा
सेवा संघाचे अध्यक्ष म्हणून कार्यभार पाहिला तर छत्रपती संभाजी ब्रिगेडच्या जवळपास
५० हून अधिक शाखा आष्टी तालुक्यामध्ये स्थापन केल्या. सर्व राजकीय,सामाजिक,
क्षेत्रातील लोकांशी त्यांनी आपले हितसंबंध प्रस्थापित केले.प्रा.नवले यांच्या
विभागातील १२ वी. पास झालेल्या विद्यार्थ्यांसाठी भरती मेळावे,औद्योगिक
कंपन्यामध्ये कोठे कोठे संधी आहे याचा सातत्याने पाठपुरावा केल्याने अशोक
भोगाडे,शिवाजी जाधव,अच्युत थोरवे, राहुल घोडके,किशोर पेचे,देविदास वांढरे,श्रीपाद
वैद्य,संजय शेळके असे अनेक विद्यार्थी नोकरीला लावण्यास हातभार लावला आहे. नवले
सरांच्या नातेवाईक तसेच कुटुंबातील मुला मुलींच्या,आष्टी तालुका शिक्षण प्रसारक
मंडळाचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि अनेक
मान्यवरांच्या हस्ते आज आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयाच्या मुख्य सभागृहात नवले
सरांचा हा सेवापूर्ती गौरव समारंभ संपन्न होतो. आजपर्यंतच्या केलेल्या सेवा
कार्याला तमाम विद्यार्थ्यांच्यावतीने दमदार, तितकाच आदरपूर्वक शैल्युट करून
भविष्यातील त्यांचे उर्वरित जीवन आनंदी निरोगी आणि समाजकार्या साठी सदैव वाहून
घेतलेले राहावे..! या अपेक्षेसह प्रा.ज्ञानेश्वर नवले सरांच्या सुखी,आनंदी
जीवनासाठी दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने शुभेच्छा..! --- उत्तम बोडखे,आष्टी.
-------------------------
0 टिप्पण्या