
आष्टी (प्रतिनिधी )
साहित्य म्हणजे केवळ शब्दांची मांडणी नव्हे,ती असते समाजाच्या मनातील आंदोलनाची अभिव्यक्ती.मनाच्या उत्स्फूर्त हूंकाराला शब्दरूप देत, अन्यायाविरुद्धची धगधगती लढाई कवितेतून मांडणाऱ्या कवी बाळासाहेब नागरगोजे यांचा 'युद्ध पेटले आहे हा काव्यसंग्रह आहे.युध्द पेटले आहे सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारा काव्यसंग्रह असल्याचे प्रतिपादन साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी डॉ.वीरा राठोड यांनी केले.
बीड येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासनाचे अनुदान प्राप्त काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा प्रगतिशील लेखक संघ व एकता फांऊडेशनच्या संयुक्त विद्यमाने नुकताच संपन्न झाला.हा सोहळा केवळ साहित्यिक कार्यक्रम नव्हता तर तो होता परिवर्तनाच्या निर्धाराचा महोत्सव.शाहीर समाधान इंगळे,शाहीर अमरजीत बाहेती आणि नभा यांच्या क्रांतिकारी गीतांनी सभागृह भारावून गेले.शहीद दिनाचे औचित्य साधत भगतसिंह,राजगुरू,सुखदेव,अवतारसिंह'पाश' आणि साळूबाई डोरले यांच्या प्रतिमांचे पूजन आणि अभिवादन करून कार्यक्रमास सुरूवात करण्यात आली.या काव्यसंग्रहावर भाष्य करताना साहित्य अकादमी युवा पुरस्कार विजेते कवी डॉ.वीरा राठोड म्हणाले की,'नागरगोजे यांच्या कवितांमध्ये समाजभान व संघर्षाची गर्जना आहे.ही कविता केवळ शोषितांच्या वेदनांची तडफड नाही तर ती त्यांच्या हक्कासाठी उभे राहण्याची हाक देते.सामाजिक न्यायासाठी एल्गार पुकारणारी ही कविता आहे'.अभ्यासपूर्ण व ओघवत्या शैलीत त्यांनी या काव्यसंग्रहाचे अनेक पैलू उलगडून दाखवले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रगतिशील लेखक संघाचे जिल्हाध्यक्ष राजकुमार कदम यांनी केले.कवी बाळासाहेब नागरगोजे यांनी आपला जीवनप्रवास आणि काव्यप्रेरणेचे संदर्भ उलगडताना भावनाप्रधान शब्दांत मनोगत व्यक्त केले.ही कविता केवळ माझी नाही,ती माझ्या मातीची आहे.माझ्या कष्टकरी आई- बापाच्या अश्रूंची आहे. भगतसिंहांचे जाज्वल्य विचार ही माझी प्रमुख काव्य प्रेरणा राहिली आहे असे ते म्हणाले.
मराठवाडा साहित्य परिषदेचे संचालक तसेच एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अनंत कराड,जागतिक साहित्याचे अभ्यासक जयपालसिंह शिंदे यांनी कविता संग्रहावर भाष्य केले.ज्येष्ठ कवयित्री व लेखिका प्रा.ललिता गादगे यांनी 'या कविता म्हणजे काळीज वेदनांचे आणि तरल भावनांचे शब्दशिल्प आहेत असे मत व्यक्त केले.कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.सुधाकर शेंडगे यांनी'ही कविता म्हणजे एका नव्या सामाजिक जाणिवेचा प्रपंच आहे.ती केवळ वेदना सांगत नाही तर क्रांतीची दिशा दाखवते.समाज शिक्षकाची भूमिका कवी घेताना दिसतो'असे मत व्यक्त केले.
कार्यक्रमाला विशेष उपस्थिती डॉ.रामदास नागरगोजे,माजी कॅप्टन प्रल्हाद बांगर,कॉ.नामदेव चव्हाण,राजकुमार कदम, गोकुळ पवार,ॲड.करूणा टाकसाळ,राजेंद्र गोरे,नवनाथ मिसाळ,द.ल.वारे,संजय सावंत,रमेश बडे,परशुराम सोंडगे, अजित तांदळे,प्रमोद सानप,ॲड.महेश भोसले,ॲड.भीमराव चव्हाण,ॲड.अंबादास आगे,कवी पंजाब येडे,प्रकाश घाडगे,प्रमोद सानप,वर्षा केंडे यांच्यासह मोठ्या संख्येने महिला- पुरुष श्रोते उपस्थित होते.सभागृहात बसायला जागा मिळाली नसल्याने अनेक श्रोत्यांनी जागा मिळेल तेथे उभे राहून लाभ घेतला.वाचकांनी कवी बाळासाहेब नागरगोजे यांच्याशी संवाद साधत कवितांवरील आपली मते मांडली.सूत्रसंचालन डॉ.समाधान इंगळे यांनी केले तर येडेश्वर नागरगोजे यांनी आभार व्यक्त केले.
0 टिप्पण्या