आष्टी (प्रतिनिधी)
महाराष्ट्र शासनाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी राज्यभरातील शालेय शिक्षणात मराठी विषय सक्तीचा आणि अनिवार्य करणे संदर्भात शासनादेश काढलेला होता.त्या शासन आदेशाची येत्या शैक्षणिक वर्षापासून अंमलबजावणी करून इयत्ता अकरावी बारावी या उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषय सक्तीचा करावा जेणेकरून मराठी भाषेचा विद्यार्थ्यांमध्ये ज्ञानग्रहण आणि अभिव्यक्तीसाठी उपयोग होईल अशी मागणी महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाच्या वतीने करण्यात आली आहे.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाच्यावतीने या महत्त्वपूर्ण बाबीचा सातत्याने पाठपुरावा केला जात आहे.त्या अनुषंगाने राज्यभरातून जिल्हाधिकाऱ्यांना महासंघाच्या वतीने लेखी स्वरूपात निवेदन देण्यात येत आहेत.यासंदर्भात महासंघाचे राज्य अध्यक्ष प्रा.सुनील डिसले म्हणाले, दि.१३ सप्टेंबर २०२४ च्या शासन आदेशानुसार येणाऱ्या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता १२वीपर्यंत मराठी विषय अनिवार्य करण्यात यावा, याबाबतचे जिल्हाधिकारी यांच्याकडे देण्यात येणारे निवेदने कृपया प्रत्येक जिल्हा प्रतिनिधींनी व संबंधित जिल्हा कार्यकारिणीने या किंवा पुढच्या आठवड्यात द्यावयाचे आहे.
चंद्रपूर,वर्धा,नांदेड,कोल्हापूर,पुणे,सांगली या जिल्ह्याच्या प्रतिनिधीनी निवेदन दिलेली आहेत.या पुढेही राज्यातील विविध विभागातील जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे ही मागणी विद्यार्थ्यांच्या हितास्तव केली जात आहे असे मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्य कार्याध्यक्ष प्रा.संपत गर्जे म्हणाले.उच्च माध्यमिक स्तरावर मराठी विषय सक्तीचा करण्यासंदर्भात मराठी भाषा विषय कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे राज्यअध्यक्ष - प्रा.सुनील डिसले (बारामती),कार्याध्यक्ष - संपत गर्जे (पुणे), कार्याध्यक्षा- डॉ.मनीषा रिठे (वर्धा),सचिव - बाळासाहेब माने (मुंबई ) यांच्या मार्गदर्शनाखालीसर्व राज्यकार्यकारिणी/ जिल्हा /तालुका प्रतिनिधी तसेच बीड जिल्हा प्रतिनिधी डॉ.आत्माराम झिंजुर्डे, बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक देवगुडे,जिल्हा सचिव प्रा.बिभिषण चाटे यांच्यासह तालुका प्रतिनिधी पाठपुरावा करीत आहेत.
चौकट
-------
१३ सप्टेंबर २०२४ च्या आदेशाची
अंमलबजावणी करा!
---------------
शासनाने १३ सप्टेंबर २०२४ रोजी शालेय शिक्षणामध्ये मराठी भाषा हा विषय सक्तीचा करण्यासंदर्भात आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.दहावी वर्गापर्यंत त्याची अंमलबजावणी होणार असून इयत्ता अकरावी आणि बारावी या उच्च माध्यमिक स्तरावर सुद्धा येत्या शैक्षणिक वर्षापासून मराठी विषय सक्तीचा आणि अनिवार्य करावा अशी आग्रही मागणी असल्याचे बीड जिल्हा कार्याध्यक्ष प्रा.डॉ.अशोक देवगुडे आणि जिल्हा सचिव प्रा.

बिभिषण चाटे यांनी सांगितले.
-----------------------------------
0 टिप्पण्या