श्रीक्षेत्र गहीनाथगड (उत्तम बोडखे.)
-----------------------
श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हा सर्व जाती धर्मांना घेऊन जाणारे तीर्थक्षेत्र असून विविध धर्मांच्या दिंड्या येथे येतात.गडाचे भक्तगण सर्व समाज आणि देशभर आहेत असे सांगून गडाच्या सुविधांसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून २५ कोटी रुपये देण्यात आले आहेत.यापुढेही विविध विकास योजनांसाठी भरपुर निधी देणार असा विश्वास महाराष्ट्राचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
महाराष्ट्रातील थोर संत सिद्ध पुरुष वै.संत वामनभाऊ महाराज यांच्या ४९ व्या.पुण्यतिथीनिमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी भ्रमणध्वनीवरून उपस्थित लाखो भक्तांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस श्रीक्षेत्र गहीनाथगडावर जमलेल्या लाखो भाविकांशी गडाची आणि संत वामनभाऊ महाराजांची ख्याती वर्णन करताना भाविकांशी विनम्रपणे हितगुज साधत होते. यावेळी मंचावर गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज,माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर, माजी आ.भीमराव धोंडे, माआ.बालासाहेब मुरकुटे,बीड जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष सौ.सविताताई गोल्हार,योगेश क्षीरसागर,अँड.वाल्मिकतात्या निकालजे,भाजप जिल्हाध्यक्ष शंकर देशमुख,अजयदादा धोंडे,सतीशआबा शिंदे, सभापती सौ.सुवर्णाताई लांबरुड,अभयराजे धोंडे,पांडुरंग नागरगोजे,जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,प्रा.बिभिषण चाटे,संजय सानप,गायकवाड,अशोक भवर,प्रकाश खेडकर,रामदास बडे,शिवाजी नाकाडे,ह.भ.प.
आसाराम बडे महाराज,ह.भ.प.अशोक महाराज काकडे आदीसह संत,महंत आणि राजकीय,सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दि.२१ आणि २२ जानेवारी २०२५ या दोन दिवशीय कालावधीत बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यातील चिंचोलीनाथ येथील श्रीक्षेत्र गहिनीनाथगडावर राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने विविध धार्मिक,सामाजिक कार्यक्रमांची रेलचेल होती.आज पुण्यतिथी महोत्सवाच्या अंतिम टप्प्यात पहाटे आज बुधवारी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री ना.धनंजय मुंडे यांनी संत वामनभाऊ महाराजांची विधिवत पूजा करून आशीर्वाद घेतले.संत वामनभाऊ महाराज यांनी समता, बंधुत्व आणि ऐक्य हे मूल्य जगाला दिली.माणुसकीचा मंत्र देणाऱ्या वामनभाऊंच्या आशीर्वादाची माझी परंपरा अनेक वर्षाची आहे.भक्त म्हणून ती परंपरा आपण अखंड आयुष्यभर पाळू असे सांगत त्यांनी वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन आपला विनम्र भाव व्यक्त केला.
राज्याच्या मंत्री ना.पंकजाताई मुंडे यांनी भ्रमणध्वनीवरुन संवाद साधताना मी प्रत्यक्ष आज गडावर येऊ शकत नसल्याबद्दल खंत व्यक्त करून संत वामनभाऊ महाराज यांनी सर्वधर्मसमभावाची शिकवण देत रंजल्या गांजल्या,दीनदलीत, दुबळ्या,अनाथ,अपंग,शेतकरी,शेतमजुरांना नवी प्रबोधनाची विकासात्मक दृष्टी दिली त्यांच्या आशीर्वादात आपण पुढे जाऊ अशी प्रार्थना व्यक्त केली.
राज्याचे मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस यांनी ४९ व्या. पुण्यतिथी निमित्त आपल्या भ्रह्मणध्वनीवरून भाषणात सांगितले की,महंत विठ्ठल महाराजांनी मला निमंत्रण दिले.पुष्पगुष्टी करण्यात मला आनंद आहे.गहिनीनाथ महाराज आणि वामनभाऊ महाराज यांच्या आशीर्वाद घेण्यात मला आनंद आहे परंतु उपस्थित राहता आले नाही याबद्दल त्यांनी खंत व्यक्त केली.गहिनीनाथगडाचा भक्त संप्रदाय मोठा आहे.संत वामनभाऊ महाराज हे सिद्ध पुरुष म्हणून त्यांची ओळख असून वारकरी संप्रदायात भाऊंचे योगदान मोठे आहे.अंधश्रद्धेपासून समाजाला दूर ठेवून शिक्षणाचे महत्त्व सांगणारे आधुनिक संत म्हणून त्यांचा संदेश अत्यंत मौलिक असून समता बंधुत्व सामाजिक समरसतेसाठी वामन भाऊंनी प्रयत्न केले. श्रीक्षेत्र गहिनीनाथगड हा सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारा गड असून विविध धर्माच्या दिंड्या येथे येतात.गडाचे भक्त सर्व समाज आणि देशभर आहेत.गडाच्या सुविधांसाठी तीर्थक्षेत्र विकास निधीतून २५ कोटी रुपये मंजूर केलेले आहेत त्याचे काम हे लवकरच पूर्ण होईल यापुढेही गहिनीनाथगडाच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही त्यांनी उपस्थित लाखो भक्तांना जाहीररित्या दिली.श्रीक्षेत्र गहीनाथगडाच्या संत वामनभाऊ महाराजांच्या चरणी मी नतमस्तक होतो.या मंगल सोहळ्यातून भक्तीरसाची प्राप्ती व्हावी अशी सदिच्छा ही त्यांनी शेवटी व्यक्त केली.
सकाळी १० ते ११.३० या दरम्यान आळंदीचे ह.भ.प.आसाराम महाराज बडे यांची कीर्तन सेवा संपन्न झाली.या पवित्र मंचावर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी श्रीक्षेत्र गहिनीनाथगडाची महती आणि संत वामनभाऊ महाराज यांनी केलेले समाज प्रबोधन भविष्यात अनेक पिढ्यांना योग्य दिशा देण्यासाठी उपयुक्त ठरेल असे सांगत बीड जिल्ह्यात सध्या जे वातावरण झालेले आहे त्याबद्दल खंत व्यक्त करीत जे खुनात दोषी आरोपी असतील त्यांना कठोर शिक्षा व्हावी मात्र कोणी राजकारण आणुन कोणाला बदनाम करु नये समाजा समाजात तेढ वाढवु नये असा सल्ला दिला.मुख्यमंत्री फडणवीससाहेब यांनी परदेशातुन आणलेल्या उद्योगापैकी एखादा उद्योग बीड जिल्ह्यात आणावा अशीही यावेली विनंती केली.
माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर म्हणाले की,गढुल मन स्थिर करण्यासाठी संत विचारांची साबन लावण्याची गरज आहे. गहिनीनाथगडाचा व संस्थानचा विकास करण्यासाठी महंत विठ्ठल महाराज परिश्रम घेतात.त्यांना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांचे मोठे सहकार्य आहे.पंढरपूरचा मोठा मठ होणार आहे.जागा घेतली आहे.सर्व समाज श्रध्देने बांधलेला आहे.भक्ती व श्रध्देचे नातं गडावर आहे.गहिनीनाथ गडाचा मी सेवेकरी आहे.वाचासिद्धी असलेले संत वामनभाऊ महाराज होते,त्यांच्या आशीर्वादाची आपणास सर्वांना नितांत आवश्यक असल्याची भावना माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी व्यक्त केली.
गहिनीनाथगडाचे महंत विठ्ठल महाराज यांनी प्रस्तावित केले. महाराष्ट्र हे संतांची आणि वीरांची भूमी आहे;संत वामनभाऊ महाराजांनी आयुष्यभर समता आणि बंधुत्वाचा विचार दिला.. म्हणूनच इथे भक्तांचा महापूर दिसतो आहे! अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने लाखो भाविकांनी पंगती मध्ये बसून महाप्रसाद घेतला. परिसरातील अहिल्यानगर आणि बीड जिल्ह्यातील विविध बस आगारांच्या बसेसची सुविधा देण्यात आली होती तर पोलीस बंदोबस्त चोख होता.राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त भाऊंच्या चरणी नतमस्तक झाला.
चौकट
--------------
लोकनेते स्व.गोपीनाथ मुंडे
यांच्या फोटोंची प्रचंड विक्री
-------------------------
लोकनेते गोपीनाथराव मुंडे हे गहिनीनाथगडाचे भक्त होते.प्रत्येक पुण्यतिथी ला मुंडे साहेबांचे भाषण हे भक्तांसाठी एक पर्वणी होती.दुर्दैवाने त्यांच्यानंतर ही संधी भक्तांसाठी विरहाची ठरली परंतु या पुण्यतिथीवेळी यात्रेत व्यापाऱ्यांनी विक्रीसाठी ठेवलेले लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे फोटो यांची प्रचंड विक्री झाल्याचे दिसून येत होते.
भक्तांच्या प्रवासासाठी
एसटीची सुविधा
---------------
राष्ट्रसंत वामनभाऊ महाराजांच्या पुण्यतिथी सोहळ्यास उपस्थित राहून आशीर्वाद घेण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भक्त येत असल्याने बीड,पाटोदा,पाथर्डी,शिरुर,जामखेड आदीसह विविध बस आगारांच्या बसेसची सुविधा असल्याने भक्तांना प्रवास सुखकर होऊ शकला.
साक्षात पंढरी
अवतरल्याचा भास!
----------------
'संत वामनभाऊ महाराज कि जय..!' च्या घोषणाने परिसर अक्षरशः दणाणून गेला. लाखो भक्त वामनभाऊंच्या चरणी नतमस्तक झाले.आजचा हा पुण्यतिथी सोहळा 'न भूतो न भविष्यती' असा पार पडला.पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. साक्षात पंढरी अवतरली गेली असा भास काही क्षण होत होता.
दर्शनासाठी प्रचंड रांगा
---------------------
गडावर विविध जाती धर्म पंथांच्या राज्य आणि देशभरातून दिंड्या सहभागी झाल्या होत्या.संत वामनभाऊ महाराज की जय घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.दर्शनासाठी प्रचंड रांगा होत्या. दुपारी काल्याचे किर्तन झाले.त्यानंतर प्रथेप्रमाणे पुष्पवृष्टी करण्यात आली.लाखोभक्तांनी महाप्रसादाचा आस्वाद अत्यंत शिस्त आणि मनोभावे घेतला.
राज्यभरातून भक्तांची
मांदियाळी
-----------------
महाराष्ट्रासह देशातील विविध राज्यातून लाखो भाविक भक्त गहिनीनाथ गडावर संत वामन भाऊंच्या चरणी नतमस्तक होऊन पुण्यतिथीनिमित्त आशीर्वाद घेण्यासाठी कालपासूनच उपस्थित होते. लाखो भाविकांनी गड अक्षरशः फुलुन गेला होता.वारकरी संप्रदायाची ही पताका अंगावर शहारे आणणारी असून संत वामनभाऊ महाराज यांचे आशीर्वाद घेऊन पुढील पुण्यतिथी पर्यंत ऊर्जा घेण्यासाठी आसुसलेला भक्तगण आज नतमस्तक होण्यात धन्यता मानून परत निघाला.




समता बंधुत्व आणि
सर्व धर्म समभावाचे केंद्र!
--------------------
श्रीक्षेत्र गहिनीनाथगड मानवतावादाची शिकवण देणारे केंद्र आहे.अत्यंत पवित्र स्थान असून संत वामनभाऊ महाराजांनी समता बंधुत्व ऐक्य याबरोबरच सर्व धर्म समभावाची शिकवण देणारे आणि अंधश्रद्धा रुढी परंपरांना तिलांजली देऊन शिक्षणाचा संदेश देणारे एक मानवतावादी केंद्र म्हणून पवित्र भक्तांच्या रूपाने अधोरेखित झाले.
-------------------------------
0 टिप्पण्या