Ticker

6/recent/ticker-posts

योगेश्वरी महाविद्यालयात दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद संपन्न

आष्टी (प्रतिनिधी) योगेश्वरी महाविद्यालयात येथे दि.१७ व १८ जानेवारी २०२५ रोजी प्राणीशास्त्र विभाग आयोजित दोन वदिवसीय राष्ट्रीय परिषद अत्यंत यशस्वीपणे संपन्न झाली. "जीवविज्ञान आणि पर्यावरणशास्त्र विषयातील अलीकडील काळातील संशोधन कल" या महत्त्वपूर्ण विषयावर केंद्रित असलेल्या या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले. राष्ट्रीय पातळीवरील विद्वान, संशोधक, पर्यावरणतज्ज्ञ आणि विद्यार्थी यांनी परिषदेत सहभागी होऊन आपले विचार मांडले. प्राणीशास्त्र विभाग प्रमुख व परिषदेचे समन्वयक प्रा.डॉ.जी.डी. सुर्यवंशी यांनी परिषद आयोजनाचे प्रयोजन व प्रास्ताविक माहिती दिली. प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर यांनी जैवविविधता व पर्यावरण व्यवस्थापन हि काळाची गरज आहे असे मत मांडले. उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष चंद्रशेखर बरदापुरकर होते. त्यांनी विविध राज्यांतून आलेल्या संशोधक,प्राध्यापक, शास्त्रज्ञांचे स्वागत केले तसेच पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणे ही काळाची गरज असुन महाविद्यालयात विविध पर्यावरण पुरक उपक्रम राबविले जावेत अशी अपेक्षा व्यक्त केली.उद्घाटन समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गोवा येथील नामवंत समुद्र शास्त्रज्ञ डॉ.बबन इंगोले उपस्थित होते.त्यांनी आपल्या भाषणात खडकांपासून ऊर्जा निर्मिती कशी करता येऊ शकते या विषयावर माहिती देऊन जैवविविधतेचे महत्त्व स्पष्ट करताना शाश्वत विकास साधण्यासाठी विविध उपाययोजना सुचवल्या. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पॉल हबर्ट डि.एन.ए.बारकोडिंग अँड बायोडायवर्सिटी स्टडीज चे संचालक डॉ. जी.डी.खेडकर यांनी जैतंत्रज्ञानाचे मानवी जीवनातील महत्त्व या विषयावर व्याख्यान दिले.गुलबर्गा विद्यापीठ, कर्नाटक येथील वरीष्ठ प्राध्यापक डॉ.के. विजयकुमार यांनी दक्षिण भारतातील फुलपाखरांचे रंगीत विश्व या विषयी माहिती देऊन जैवविविधतेचे संरक्षण आणि संवर्धन करण्याची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त केले.पहिल्या दिवसाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ.संदिप काळे यांनी केले.दुसऱ्या दिवशी च्या तांत्रिक सत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर कार्य केलेले वरीष्ठ शास्त्रज्ञ तसेच सध्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स एज्युकेशन अँड रिसर्च, बराहामपुर उडीसा येथे जिवविज्ञान विभागाचे अधिष्ठाता प्रा.डॉ. विश्वास चव्हाण यांनी मानवी जीवनातील अध्यात्म, मानवी मुल्य, परस्पर संबंध दृढता, व्यक्तिमत्त्व विकास, निसर्ग आणि जैवविविधता यांचा परस्पर संबंध या विषयावर वैचारिक मंथन करून उपस्थितांशी वैचारिक संवाद साधला.अहिल्यानगरचे मानद वन्यजीव संरक्षक डॉ.सुधाकर कुऱ्हाडे यांनी पक्षी जगाची ओळख या विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान दिले. ठाकुर महाविद्यालय कांदिवली मुंबई येथील डॉ.विठ्ठल मोहीते यांनी पर्यावरण, वातावरण बदल आणि भारतातील सध्याची शेतीची स्थीती याविषयी व्याख्यान दिले.दुसऱ्या दिवसाचे सूत्रसंचालन प्रा.आदित्य कदम यांनी केले.परिषदेतील तांत्रिक सत्रांमध्ये संशोधन निबंध सादरीकरण, परिसंवाद, आणि पोस्टर प्रदर्शन आयोजित करण्यात आले. देशभरातून आलेल्या संशोधकांनी आपल्या संशोधन कार्याचा आढावा घेत महत्त्वपूर्ण माहिती सादर केली. यामध्ये पाणी व्यवस्थापन, जैवविविधता संरक्षण, ऊर्जा बचत, आणि पर्यावरणपूरक तंत्रज्ञान या विषयांवर लक्ष केंद्रित करण्यात आले. परिषदेच्या समारोप सत्रात कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित असलेले योगेश्वरी शिक्षण संस्थेचे प्रतापराव पवार यांनी पर्यावरणीय जागरूकतेसाठी शैक्षणिक संस्थांची भूमिका अधोरेखित केली.प्रा.डॉ.अनिल कुऱ्हे यांनी पारितोषिक वितरण समारंभ प्रसंगी संशोधनाचे महत्त्व अधोरेखित केले. या राष्ट्रीय परिषदेत आसाम, कोलकाता, मध्यप्रदेश, गुजरात,कर्नाटक इत्यादी राज्यांमधील संशोधकांनी आपले शोधनिबंध सादर केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर यांनी सर्व सहभागी,आयोजक आणि स्वयंसेवकांचे आभार मानून परिषदेचा समारोप घोषित केला.ही राष्ट्रीय परिषद यशस्वी संपन्न होण्यासाठी महाविद्यालयातील सर्व विभागांचे विभागप्रमुख,प्राध्यापक, विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष, सचिव व अन्य पदाधिकाऱ्यांचे मोलाचे सहकार्य लाभले.ही राष्ट्रीय परिषद शैक्षणिक, सामाजिक आणि पर्यावरणीय क्षेत्रात प्रेरणा देणारी ठरली असून भविष्यात अशा उपक्रमांचे आयोजन करण्यासाठी महाविद्यालय व प्राणीशास्त्र विभाग वचनबद्ध आहे असे प्रतिपादन परिषदेचे आयोजक प्रा.डॉ. जी.डी.सुर्यवंशी यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या