Ticker

6/recent/ticker-posts

भक्तीमार्ग, कर्ममार्ग व ज्ञानमार्ग यांचा समन्वय साधणारे ऐश्वर्य संत भगवान बाबा!

आपल्या आयुष्यभर मानवतावादाचा पुरस्कार करत गोरगरीब दिन दलित दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी शेतमजूर वंचित घटकांसह ऊसतोड कामगारांच्या जीवनात शिक्षणाच्या माध्यमातून क्रांतिकारक बदल घडवून नवा तेजस्वी समतावादी समाज निर्माण करण्याची जिद्द मनी धरून इतिहास घडवणारे राष्ट्रीय संत म्हणून संत भगवान बाबांच्या कार्याला आज उजाळा मिळालेला आहे! संत भगवान बाबांनी भक्ती मार्ग, कर्म मार्ग, आणि ज्ञान मार्ग यांचा समन्वय साधून दिव्य कर्तुत्व केले.लहानपणापासून विठ्ठल नामाची आवड असलेल्या आणि ऐक्य बंधुत्व सर्वधर्मसमभाव या मानवतावादी मूल्यांना महत्त्वाचे स्थान देत समाज प्रबोधनाची पताका खांद्यावर घेऊन लढणारे संत म्हणून त्यांची आज इतिहासात विशेष नोंद आहे.आपल्या कीर्तनामधून त्यांनी जातिभेद धर्मभेद अज्ञान अंधश्रद्धा अनिष्ट रूढी परंपरा यावर प्रचंड प्रहार करून जन माणसांना चांगुलपणाचा मार्ग दाखवला.संत भगवान बाबांनी प्रबोधनासाठी मराठवाडा विदर्भ तेलंगणा आंध्र प्रदेश कर्नाटक एवढेच नव्हे तर उभा महाराष्ट्र पिंजून काढत अज्ञानाच्या खाईत सापडलेल्या जनमानसाला शिक्षणाचा मार्ग दाखवला आणि स्वावलंबी जीवनाची पहाट निर्माण केली.विठू नामाच्या प्रचार आणि प्रसारा बरोबरच त्यांनी समता बंधुता ऐक्य मानवता आणि सर्वधर्मसमभाव या मूल्यांचा प्रचार आणि प्रसार रात्रंदिवस केला.वारकरी धर्माला आधुनिक रूप देणारे संत म्हणून त्यांची आज सर्वत्र विशेष नोंद घेत त्यांच्या चरणी नतमस्तक होताना भक्तांना मनापासून आनंद वाटतो.संत भगवान बाबांनी वार्षिक नारळी सप्ताहाची सुरुवात केली.ती आजतागायत अखंड सुरू आहे.संत भगवान बाबांचा जन्म मराठवाड्याच्या बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्याच्या श्रीक्षेत्र सावरगाव घाट या गावात २९ जुलै १८९६ साली झाला.आबाजी तुबाजी सानप असे त्यांचे पूर्ण नाव; तर कौतिक बाई हे आईचे नाव होते. यांनी संत भगवान बाबांवर बालपणात मानवता वादाचे संस्कार केले.बाबांनी चौथीपर्यंत सावरगाव घाट; तर पुढे मामाच्या लोणी या गावात शिक्षण घेतले.मुळातच त्यांना विठ्ठल भक्तीची ओळख असल्याने बाल वयातच पंढरपूरच्या दिंडीत सहभागी होण्याला त्यांनी स्थान दिले.माणिक बाबा या त्यांच्या गुरुच्या आदेशानुसार त्यांनी मानवी समाज व्यवस्थेला योग्य दिशा देण्यासाठी मूल्यं सांगितले. माणिक बाबांनीच आबाजींचे नाव भगवान ठेवले.आपले संपूर्ण आयुष्य रंजल्या गांजल्या दीनदलीत दुबळ्या अनाथ अपंग शेतकरी, शेतमजूर ऊसतोड कामगारांच्या परिवर्तनासाठी अर्पण करणारे संत भगवान बाबा यांची पुण्यतिथी संपूर्ण महाराष्ट्रा सह देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये भक्तगण साजरी करतात.बाबांनी सांगितलेला शिक्षणाचा संदेश अगदी तंतोतंत पाळत प्रचंड जिद्द कष्ट परिश्रम आणि मेहनत घेऊन हातात पेन घेत आणि पुस्तकाच्या माध्यमातून संस्कार जीवन जगण्यासाठी अहोरात्र धडपडतात. बाबांच्या पुण्यतिथी निमित्त भगवानगड,भगवान भक्ती गड तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात आणि देशाच्या विविध भागात भक्तगण अत्यंत पवित्र मनाने आणि विविध धार्मिक सामाजिक शैक्षणिक उपक्रमांच्या माध्यमातून साजरी करत आहेत.बाबांच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांनी सांगितलेल्या विचारावर चालल्यास मानवी जीवनाचे कल्याण होते हा विश्वास या निमित्ताने लाखो भाविक भक्तांना प्रत्यक्षात अनुभवता आला आहे. संत भगवान बाबांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने पवित्र मनाने त्यांच्या चरणी आपण सर्वजन विनम्र नतमस्तक होऊया ! --- श्रीमती आशा फड-चाटे --------------------------------------- ( सहशिक्षिका ) ---------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या