Ticker

6/recent/ticker-posts

जीवनात यशस्वी होण्यासाठी वक्तृत्व कला महत्वाची ............ माजी आ.भीमराव धोंडे

आष्टी ( प्रतिनिधी ) जीवनात यशस्वी होण्यासाठी विद्यार्थ्यांच्या अंगी चांगली वक्तृत्व कला असावी असे प्रतिपादन माजी आ.भीमराव धोंडे यांनी कडा येथे केले. कडा येथील आनंदराव धोंडे महाविद्यालयामध्ये बाबाजी यांचे स्मृती प्रित्यर्थ आनंदराव धोंडे आंतरमहाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांचे कला गुणांना संधी प्राप्त होऊन त्याच्यातील नवनवीन विचारांना चालना मिळावी तसेच वक्तृत्व गुण कौशल्ये विकसित व्हावे या उद्देशाने गेल्या १३ वर्षापासून सातत्याने ही राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली जाते. स्पर्धेसाठी अमृत महोत्सवी भारतीय संविधान,भारताचे महान सुपुत्र - पद्मविभूषण रतन टाटा व महिला सुरक्षा - चिंता व चिंतन हे विषय ठेवण्यात आले होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्रा.डॉ.आर.आर.आंधळे, शिवचरित्रकार ह.भ.प. मोहन महाराज शेलार, प्राचार्य डॉ हरिदास विधाते उपस्थित होते.परिक्षक म्हणून प्रा.डॉ.राजाराम सोनटक्के,प्रा. परदेशी,प्रा.पटेल एम.आर.उपस्थित होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी स्व. पंतप्रधान मनमोहनसिंग यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आ.भीमराव धोंडे यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्पर्धेसाठी चांगले विषय ठेवले आहेत. विद्यार्थी गुणवत्ता धारक असेल तर सर्व व्यवस्थित होते. जिवनात हुशारीचा फायदा होतो.विद्यार्थ्यांनी आतापासून कष्ट करण्याची तयारी ठेवा,जीवनात यशस्वी व्हाल. परदेशात शिक्षण घेण्यासाठी शासन मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देते परंतु ग्रामीण भागातील विद्यार्थी परदेशात का शिकायला जात नाहीत असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.आपल्याला मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. प्रयत्न करीत रहा यश मिळते.प्रत्येक काम मन लावून करा यश मिळतेच. आपल्या पेक्षा लहान असलेल्या जपानसारख्या देशाची प्रगती झाली आहे,चीन या देशात तयार झालेला माल जगभर जातो. धान्याच्या बाबतीत भारत देश समृद्ध आहे त्यामुळे आपल्या देशात गोरगरिबांना मोफत धान्य वाटप केले जाते .त्यांनी उद्योजक रतन टाटा यांच्या जिवन कार्याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्राचार्य डॉ.हरिदास विधाते यांनी स्व.आनंदराव ऊर्फ बाबाजी धोंडे यांच्या कार्याविषयी माहिती दिली.बाबाजी यांना शिक्षणाची खुप आवड होती. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिकावेत यासाठी त्यांनी माजी आ.भीमराव धोंडे यांना शाळा महाविद्यालये काढण्यास सांगितले.मुंबई येथील प्रा.डॉ.आर.आर.आंधळे यांनी सांगितले की,माजी आ.भीमराव धोंडे यांनी ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा आणली. ह.भ.प.मोहन महाराज शेलार यांनी सांगितले की,
प्राचार्य डॉ. हरिदास विधाते यांनी मला महाविद्यालयात कला सादर करण्याची संधी दिल्याने मी आज राज्यात आणि राज्याबाहेर किर्तन करीत आहे. वक्ता होण्यासाठी वक्त्याला शब्दांची जुळवाजुळव करुन ते व्यवस्थित मांडता आले पाहिजेत.तो खरा वक्ता होतो. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ.संभू वाघुले,उपप्राचार्य डॉ.बी.एस.खैरे यांच्यासह विद्यार्थी व शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.शैलजा कुचेकर,प्रा.डॉ.जी.पी.बोडखे यांनी केले व उपस्थितांचे आभार उपप्राचार्य डॉ.भास्कर चव्हाण यांनी मानले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या