
सामाजिक बांधिलकी जपणारे, सर्वधर्म समभावाची जपवणूक करणारे, सर्वांच्या सुखदुखाःत मिसळणारे, सर्वांशीच मित्रत्वाची भावना ठेवणारे, मानअपमानाने होरपळून न जाणारे, सततच इतरांना कौतुकाची थाप देणारे, स्पष्ट बोलणारे,कसलाही न्यूनगंड न बाळगणारे, शिक्षक नेते, दिव्यांग नेते, उत्कृष्ट संघटक, सुत्रसंचलन,उत्कृष्ट वक्तृत्व, प्रशासक, विद्यार्थी प्रिय, दिव्यांग प्रिय, सततच शैक्षणिक, सामाजिक व राष्ट्रीय कार्यासाठी धडपडणारे शिक्षक २९ वर्षाची सेवा,३०० वरती पुरस्कार, विविध शैक्षणिक व राष्ट्रीय विषयावर दोनशेच्या वर लेख व दोनशे च्या वरती कविता लेखन करणारे,शैक्षणिक क्षेत्राबरोबरच सामाजिक व राष्ट्रीय कार्याची आवड असणारे, समाज प्रिय शिक्षक तसेच समाजाच्या भल्यासाठी असलेल्या अनेक योजनांची शासनाकडून जनजागृती केली जाते. यासाठी पोस्टर,बॕनर,वृत्तपत्र,नाटिका, दूरचित्रवाणी, इंटरनेट, व्हाँटसअप, फेसबुक अशा विविध माध्यमांचा वापर केला जातो. मात्र, ही जनजागृती केवळ शासनाचेच काम नाही तर एक व्यक्ती म्हणून व आपणही समाजाचे देणे लागतो, या भावनेतून अनेक योजनांचा प्रचार व प्रसार आपल्या दुचाकीवर बोर्ड लावून तर कधी कॉनर बैठकीतून करत असणारे, शाळेमध्ये विद्यार्थी घडविण्याबरोबरच समाज घडविण्याचेही काम करणारे, समाजाच्या भल्यासाठी असलेल्या अनेक योजनांविषयी सतत समाजजागृती करीत असणारे, स्वतः दिव्यांग असणारे, दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडीअडचणींची जाणीव असल्याने दिव्यांग क्षेत्रात राज्यभरातील दिव्यांगांना मार्गदर्शन करणारे, आदर्श शिक्षक राजेंद्र प्रयागाबाई शाहुराव लाड यांच्या कार्याचा जागतिक दिव्यांग दिनानिमित्त घेतलेला आढावा.
आज रोजी जिल्हा षरिषद कन्या प्रशाला आष्टी येथे प्राथमिक पदविधर शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. सध्या राजेंद्र लाड जिल्हाध्यक्ष - शासनमान्य महाराष्ट्र राज्य दिव्यांग कर्मचारी संघटना बीड, राजदूत - दिव्यांग मतदार नोंदणी विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय बीड, सदस्य - दिव्यांग स्थानिक स्तर समिती, समाजकल्याण कार्यालय बीड तसेच वेगवेगळ्या शिक्षक संघटना, दिव्यांग संघटना, मंडळे, समाजसेवी संस्था, सामाजिक संघटना, राष्ट्रीय संघटनेच्या वेगवेगळ्या पदावर कार्यरत आहेत. विशेषतः शैक्षणिक, सामाजिक, साहित्य व राष्ट्रीय कार्य करत असल्यामुळे राज्यभरातील आदर्श व्यक्तींच्या संपर्कात आल्यामुळे विविध पदे भूषविण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. तसेच प्रत्येक ठिकाणी प्रत्येक पदाला योग्य न्याय देण्याचे काम त्यांनी निस्वार्थपणे केलेले आहे.
आजतागायत राजेंद्र लाड यांना ३०० शैक्षणिक, सामाजिक, राष्ट्रीय व साहित्यिक क्षेत्रातील कार्यासाठी पुरस्कार मिळालेले आहेत.महाराष्ट्र शासनाचा राज्य शिक्षक पुरस्कार,जि.प. बीडचा जिल्हा शिक्षक पुरस्कार देखील मिळालेला आहे., राज्य व जिल्हा शिक्षक पुरस्कार त्यांना सन - २०१६ साली एकाचवर्षी प्राप्त झालेला आहे.
राजेंद्र लाड सर स्वतः उजव्या पायाने ४५ टक्के कायमस्वरुपी दिव्यांग असून त्यांच्या दिव्यांगत्वावर मात करुन इतर दिव्यांगांच्या अडीअडचणीसाठी सततच धडपडत असतात. सर्व सामाजिक, राजकीय, शैक्षणिक व्यक्तींबरोबर मित्रत्वाची भावना तयार करुन दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग कर्मचारी, दिव्यांग जेष्ठ नागरिक, दिव्यांग सुशिक्षित बेरोजगारांचे प्रश्न सोडविलेले आहेत. दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी सतत धडपडत असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात त्यांची एक प्रकारची ओळख निर्माण झाल्यामुळे दिवसभरात कमीत कमी तिस ते चाळीस जणांच्या भ्रमणध्वनीद्वारे विचारलेल्या प्रश्नांचे निराकरण त्यांना करावे लागते.
दिव्यांगांच्या शस्त्रक्रिया, श्रवणयंत्र, कँलिपर्स, कुबड्या, व्हीलचेअर, ट्रायसिकल, चष्मे, कमोडचिअर, सिडीप्लेअर, टेबल लँम्पस, लोव्हीजन किट, टेपरेकॉर्डर, लार्ज प्रिंट पुस्तके, मदतनिस भत्ता, लेखन - वाचन भत्ता, दिव्यांग शिष्यवृत्ती, दिव्यांग तपासणी शिबीर, दिव्यांग प्रमाणपत्र वाटप, दिव्यांगांसाठी विविध थेरपी, मतिमंदांचा बुध्दीगुणांक काढणे, दिव्यांग मेळावे, दिव्यांगत्व निदान शिबीर, दिव्यांगांच्या प्रश्नांसाठी मोर्चा, धरणे, आंदोलने, एस. टी. बसेस पासेस मिळवून देणे, दिव्यांगांच्या तक्रारींचे निराकरण करणे, डाँ. हेलन केलर प्रतिष्ठान च्या वतिने पुरस्कार देणे, बीज भांडवल योजना, संजय गांधी योजना, दिव्यांग सुदढ योजना, दिव्यांगांसाठी घरकुल योजना, दोनशे चौ. फुट जागा देणे, स्वावलंबन कार्ड काढण्यासाठी मार्गदर्शन, इन्कम टँक्स मार्गदर्शन, वाहन भत्ता व पिटँक्स माफी बाबत मार्गदर्शन, दिव्यांग कर्मचाऱ्यांना साहित्य व उपकरणे मिळवून देणे, बदली सुट, लाँकडाऊन काळात उपस्थितीत सुट बाबत मार्गदर्शन, निवडणूक, जनगणना व इतर सर्वे मधून शासकीय नियमान्वये सुट मिळवून देणे, दिव्यांग कायदा २०१६ बाबत मार्गदर्शन, कायद्यान्वये दिव्यांग अँट्रासिटी बाबत योग्य मार्गदर्शन, चार चाकी गाडी साठी रोड टँक्स माफी बाबत आदी योजनांसाठी सुयोग्य मार्गदर्शन व वेळोवेळी पाठपुरावा करुन दिव्यांगांची अनेक प्रकरणे राजेंद्र लाड यांनी निकाली काढले आहेत. महाराष्ट्रातील पहिला दिव्यांगांचा जनता दरबार आयोजित करुन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना उपस्थित ठेवून दिव्यांगांचे अनेक प्रश्न निकाली काढून अनेक प्रश्नांचा उहापोह करण्यात आलेला आहे. ते स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग व्यक्तींना येणाऱ्या अडीअडचणींची जाणीव असल्याने पोलिओमुळे कोणी दिव्यांग होवू नये, यासाठी पोलिओ जनजागृतीपासून त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. लहान मुलांना पोलिओ डोस वेळेवर पाजावेत यासाठी ते आग्रही असतात. विशेषतः दिव्यांग बांधवांनी शौचालय बांधावे यासाठी दिव्यांगांनी शौचालय बांधा व पाचशे रुपये मिळवा ही प्रोत्साहनपर योजना राबवून अनेक दिव्यांगांना आर्थिक मदतीचा हातभार त्यांनी लावलेला आहे.शेवटच्या क्षणापर्यंत ते दिव्यांगांसाठी तन, मन,धनाने कार्य करीतच राहणार आहेत.त्यांच्या जडणघडणीत आज पर्यंतचे सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्रप्रमुख व त्यांचे सर्व शिक्षक सहकारी बांधव, दिव्यांग बांधव,मित्रपरिवार, पत्रकार मित्र यांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशा या दिव्यांग, शैक्षणिक, सामाजिक, साहित्यिक व राष्ट्रीय क्षेत्रातील अष्टपैलू व्यक्तीमत्वास हार्दिक शुभेच्छा....
-----
उत्तम बोडखे,आष्टी.
********************
0 टिप्पण्या