
आष्टी (प्रतिनिधी) इंग्रजी ही जागतिक भाषा आहे.जगात भरारी घ्यायची असेल तर इंग्रजी शिवाय पान हालत नाही.अर्थात इंग्रजीने आपल्या मातृभाषेला किंवा राष्ट्रभाषेला दूर ठेवा असं कधीच म्हटलं नाही. याउलट इंग्रजीतील साहित्य अन्य भाषेत व स्थानिक भाषेतील साहित्य इंग्रजीत आल्याने अधिक रसिकांपर्यंत पोहचते. माणसाच्या जिभेवर अनेक भाषा एकत्रपणे नांदू शकतात.हाच विचार घेऊन गेल्या दशकात मराठी बरोबर इंग्रजी माध्यमाच्या अनेक शाळा, कॉन्व्हेन्ट स्कूल सुरू झाल्या आहेत. त्यामुळे लहान लहान मुले फाड फाड इंग्रजी बोलू लागली आहेत.पूर्वी इयत्ता पाचवीच्या पुढे इंग्रजीची तोंड ओळख व्हायची,ती आता पहिलीच्या आधीच होऊ लागली आहे. विद्यापठातील भाषांतर अभ्यास किंवा ट्रान्सलेशन स्टडीज या विद्याशाखेला संशोधक विद्यार्थी चांगला प्रतिसाद देत आहेत. ॲड.बी.डी.हंबर्डे महाविद्यालय येथील इंग्रजी विभाग प्रमुख प्रा.डॉ.अभय शिंदे यांनी प्रसिद्ध कवी प्रा.सय्यद अल्लाउद्दीन यांच्या मराठी कवितांचा इंग्रजी अनुवाद केला आहे.अशा २५ निवडक अनुवादित कवितांचे पुस्तक लवकरच वाचकांच्या हाती येत आहे. त्याचे प्रकाशन १ जानेवारी २०२५ रोजी संस्थाध्यक्ष किशोरनाना हंबर्डे यांच्या हस्ते होणार आहे.फेसेस बिहाइंड मास्कस् डॉ.अभय शिंदे कृत आष्टी पंचक्रोशीतील अनुवादित कवितांचा पहिलाच कवितासंग्रह ठरावा. पुण्याच्या ज्योतीकिरण पब्लिकेशनने हे पुस्तक काढले आहे.सालाबादप्रमाणे याहीवर्षी नववर्षारंभी महाविद्यालयात मान्यवर कवींची काव्यमैफिल होणार आहे त्यात हा प्रकाशन सोहळा होईल असे प्राचार्य डॉ.सोपान निंबोरे यांनी सांगितले.
0 टिप्पण्या