
आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथे संत मदन महाराज बिहाणी यांच्या २८ व्या. पुण्यतिथीनिमित्त कडा येथील संत मदन महाराज संस्थान परिसरात दि.१३ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह सुरु आहे. कडा येथील संत मदन संस्थानचे अध्यक्ष तथा मठाधिपती ह.भ.प. बबन महाराज बहिरवाल यांच्या कालाच्या कीर्तनाने उद्या ( शुक्रवारी ) दि.२० डिसेंबर रोजी सप्ताहाची सांगता होणार आहे.या सप्ताहाची सुरुवात शुक्रवार दि.१३ डिसेंबर रोजी सकाळी ८ वा.गुरुवर्य वै.मदन महाराज यांच्या गावातील मठापासून भव्य शोभा यात्रेने झाली. या संपूर्ण सप्ताह कालावधीत आठ दिवस काकडा भजन, पसायदान,गाथाभजन,ज्ञानेश्वरी पारायण, हरिपाठ,हरिकीर्तन,
हरिजागर आदीसह विविध अध्यात्मिक कार्यक्रमांची मोठी रेलचेल होती.या सप्ताहात दररोज ३ ते ६ यावेळात ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांची सुश्राव्य श्रीराम कथा झाली.या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये ह.भ.प.पोपट महाराज पाटील,गुरूचैतन्य महाराज भगवत महाराज बादडे, आसाराम महाराज बडे, अनिल महाराज पाटील यांचे हरिकीर्तन झाले. आज गुरुवार दि.१९ डिसेंबर रोजी ह.भ.प. मुकुंदकाका महाराज जाटदेवळेकर यांचे हरिकीर्तन होणार आहे. दि.१४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ ते ६ यावेळात ह.भ.प. रघुनाथ महाराज धामणगावकर यांचे दत्त जयंतीनिमित्त कीर्तन झाले.शुक्रवार दि.२० डिसेंबर रोजी सकाळी १० ते १२ यावेळात संत मदन महाराज देवस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांचे काल्याचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. कीर्तनानंतर सामुदायिक विवाह सोहळा व महाप्रसाद वाटप केला जाणार आहे.कार्यक्रमास उपस्थितीचे आवाहन संत मदन महाराज संस्थानचे अध्यक्ष ह.भ.प.बबन महाराज बहिरवाल यांनी केले आहे.
0 टिप्पण्या