
आष्टी (प्रतिनिधी )
संत ज्ञानेश्वरांनी ज्ञान व अज्ञान ओळखण्याची दृष्टी समाजाला
दिली. अज्ञान पाण्यावरील शेवाळासारखे असते.अविद्येची काजळी जाऊन सगळीकडे ज्ञानाचा
प्रकाश पसरवणारे साहित्य लिहीणे ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन गुहागर येथील
प्रसिद्ध कवी प्रा.डाॅ.बाळासाहेब लबडे यांनी केले. एकता फाउंडेशन महाराष्ट्र राज्य
तर्फे 'दिवाळी पाडवा पहाट' निमित्त आयोजित ३० व्या.राज्यस्तरीय ऑनलाईन एकता काव्य
संमेलनात ते उद्घाटक म्हणून बोलत होते.या संमेलनाच्या संमेलनाध्यक्षपदी बारामती
येथील सुप्रसिद्ध कवीवर्य हनुमंत चांदगुडे होते. एकताचे संस्थापक अध्यक्ष साहित्यिक
अनंत कराड, कोषाध्यक्ष शिवलिंग परळकर, प्रवक्ते मल्हारी खेडकर, मराठवाडा विभागीय
अध्यक्ष प्रा.डाॅ.प्रकाश वाकळे, परभणी जिल्हा उपाध्यक्षा मेघा नांदखेडकर, महानगरीय
अध्यक्षा प्रा.शोभाताई घुंगरे यांच्या प्रमुख उपस्थिती संपन्न झालेल्या या
राज्यस्तरीय काव्य संमेलनात अध्यक्ष चांदगुडे यांनी 'मोट गेली, नाडा गेला',
'विठ्ठला' व 'पाऊलवाट' या एकसे बढकर एक रचना ऐकवून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.
लातूर च्या कवयित्री मेनका धुमाळे यांच्या 'हरवलेल्या वाटा' व 'पोळणारे पाय' या
सामाजिक आशययुक्त कवितांनी रसिक अंतर्मुख झाले. माजलगाव येथील कवयित्री स्मिता
लिंबगावकर यांनी 'वागेन मी तशी, तु सांगेन जशी' ही स्री जाणिवांची रचना पेश
केल्यानंतर 'कोळी' शीर्षकाची उत्तम कविता सर्वांना ऐकवली.यानंतर पाथर्डी येथील
जेष्ठ कवी रामकिसन शिरसाट यांनी सादर केलेल्या 'लेक आता मोठा झाला' या रचनेने माहोल
गंभीर झाला. बीड चे जेष्ठ कवी जगन्नाथ कांबळे यांनी 'हरवलेल्या वाटा' व 'वेदना' या
रचना सादर करून सर्वांना हेलावून टाकले. केज जि.बीड चे कवी हनुमंत घोडके यांच्या
'इडा पिडा टळू दे' आणि 'सुंदर हा गाथा' या अभंगासमान रचनांनी श्रोत्यांच्या
ह्रदयाला हात घातला. पनवेल येथील कवीवर्य फौजी वीर देसाई यांच्या 'कविता' या
बहारदार कवितेने संमेलनात जान आणली. जालन्याचा युवाकवी पवन शेळके याच्या 'रूख्माईचं
रूसणं' ही वारीवर आधारित आणि 'बाप' नावाची आशयगर्भ रचनांनी रसिक प्रेक्षकांना
भारावून सोडले. ऐनवेळी सहभागी झालेले एकताचे हिंगोली जिल्हाध्यक्ष प्रा.मुरलीधर
पंढरकर यांनी 'शेतकऱ्याची रद्दी' नावाची शेतीमातीशी निगडीत रचना ऐकवली. या दर्जेदार
काव्य संमेलनाचे बहारदार सूत्रसंचालन बीड च्या डाॅ.रेखा ढेरे-घोलप यांनी केले.
त्यांनी 'ढगाळलेल्या नभालाही' ही दमदार कविता ऐकवून सर्वांना अंतर्मुख केले.एकताचे
प्रदेश संघटक देवीदास शिंदे आणि प्रदेश युवक सरचिटणीस बलराम मनिठे यांच्या
संकल्पनेतून साकारलेल्या या काव्य संमेलनामध्ये एकताचे बीड जिल्हा कोषाध्यक्ष अशोक
अवंतकर यांनी प्रास्ताविक तर एकताचे विभागीय युवा आघाडीचे संघटक सुनिल महाराज केकाण
यांनी आभार प्रदर्शन केले. काव्य संमेलनात श्रोते म्हणून माजलगावच्या कवयित्री गौरी
देशमुख, सुरेश भानप, गोविंद भांड, जया ढाकणे, लता बडे, डाॅ.अनिकेत कराड,कार्तिक
कांबळे यांच्यासह राज्यभरातील कवी कवयित्रींनी उपस्थिती लावली.
0 टिप्पण्या