Ticker

6/recent/ticker-posts

सत्तेच्या डोहात राहुनही अंगाला एकही थेंब चिकटुन न देणारे माजी आ.ॲड.निवृत्तीराव उगलेसाहेब

चौकट --------------- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत खडतर परिश्रमातून माजी आ.ॲड. स्व.निवृत्तीराव उगले हे व्यक्तिमत्व घडलेले आहे.शाळा, महाविद्यालयातील शैक्षणिक काळापासून,वकीली व्यावसाय ते विधानसभा सदस्यपर्यतचा प्रवास कसा झाला याचा संक्षिप्त आढावा देणारा उपसंपादक उत्तम बोडखे यांचा हा लेख....लेखन मार्गदर्शन जेष्ठ पत्रकार अनंत हंबर्डे यांचे लाभले.स्व.ॲड.उगलेसाहेब यांची अभ्यासु राजकारणी,समाजकारणी म्हणून महाराष्ट्रात ओळख निर्माण झाली आहे. त्यांचा सामाजिक अभ्यास,कुशाग्र बुध्दी,एक तरल संवेदनाक्षम सामाजिक जाणीव आणि अभ्यासुवृत्ती ही वाखाणण्याजोगी होती. ------------------------------------ आष्टी विधानसभा मतदार संघातीला निष्कलंक नेते,अकरा वर्षे आमदार राहिलेले... तरीही निगर्वी,शांत संयमी व अभ्यासु नेतृत्व होते.माजी आमदार ॲड. निवृत्तीराव उगले साहेबांचे नाव 'निवृत्ती' आहे.अॕड.उगलेसाहेब आष्टी मतदार संघाचे पाच वर्षे आमदार होते,सहा वर्षे महाराष्ट्र राज्याच्या विधान परिषदेचे आमदार होते.अकरा वर्षे ते महाराष्ट्र राज्याचे आमदार होते. त्यानंतर सुमारे पाच वर्षे ते बीड भूविकास बँकेचे शासकीय संचालक होते.ह्या काळात त्यांना बँकेच्या अध्यक्षाचे अधिकार प्रदान करण्यात आले होते.ह्या सर्व कार्यकाळात सत्तेची पदे असतांना त्यांनी आपल्या 'निवृत्ती' या नावाला लहानसाही डाग लागू दिला नाही. सत्तेचे ते उपभोगशून्य स्वामी राहिले.एका अत्यंत प्रामाणिक विश्वस्ताची भूमिका त्यांनी आयुष्यभर निभावली.१९५५ च्या सुमारास उगलेसाहेब वकिली करण्यासाठी आष्टीला आले.त्यांचे राहण्याचे गाव घोगरगाव हे अहिल्यानगर (अहमदनगर) जिल्ह्यात येते.त्यांच्या मनावर अहमदनगर जिल्ह्याच्या राजकीय आणि सामाजिक विचारांचे संस्कार झालेले होते.ते आजही लोपलेले नाहीत.आष्टी तालुका बीड जिल्ह्यात,म्हणजे तेव्हाच्या हैद्राबाद राज्यात,म्हणजे निजामाच्या राज्यात होता.ह्या तालुक्याला सात दिशेने अहमदनगर जिल्ह्याचीच सरहद्द होती.अहमदनगर जिल्ह्यात राजकीय चळवळीचे आणि सामाजिक चळवळीचे वारे जोरात वहात होते.त्या तुलनेत बीड जिल्हा पर्यायाने आष्टी तालुका फारच अंधारात,तमोयुगात होता.उगले साहेबांच्या मनाची मशागत, विचारांची बैठक अहमदनगर जिल्ह्यात तयार झालेली होती. उगलेसाहेबांनी वकिलीची सनद मिळविल्यानंतर वकिली कुठे करावी ? असा प्रश्न त्यांच्या मनात होता.ते बहधा अहमदनगर जिल्ह्यातच वकिली करण्याच्या ठाम विचारात होते पण त्यांना गुरुस्थानी असलेल्या अहमदनगरच्या विचारवंत मंडळींनी,अहमदनगरच्या अनुभवी वकिलांनी त्यांना आष्टीला वकिली करण्याचा सल्ला दिला.आष्टी कोर्टात त्यावेळी फक्त ११ वकील होते.एकही बहुजन समाजाचा वकील नव्हता किंवा इतर मागासवर्गीय जातीचा वकील नव्हता.उगलेसाहेबांची तालुक्यात फार ओळख नव्हती.सीना पट्टीच्या भागात सरहद्दीवरच्या गावात थोडी फार ओळख होती.त्याशिवाय आष्टी कोर्टातले कागद दप्तर उर्दू भाषेत होते.उगलेसाहेबांना उर्दू काहीही येत नव्हते.उगलेसाहेब आष्टीत फार उमेदीने आले नसावेत. साशंक मनस्थितीत आष्टीत आले. अॕड.मिर्झा हश्मतुल्ला साहेबांनी सुरवातीच्या काळात सल्ले दिले. बघता बघता उगलेसाहेब सगळ्या आष्टी तालुक्याचे फारच कमी अवधित लोकप्रिय वकील झाले. उगले साहेबांच्या वडिलांचे नाव विठोबा होते.संत ज्ञानेश्वरांच्या वडिलांचे नावही विठोबा होते. वकील साहेबांच्या वडिलांनी मुलांची नावे निवृत्ती,ज्ञानेश्वर अशी ठेवली.वकीलसाहेबांच्या भावाचे नाव ज्ञानेश्वर आहे.घरी वारकरी सांप्रदायाची परंपरा अशी लाभली.वकीलसाहेबांचे शिक्षण खंडितपणे झाले.त्यांना शिकायचे. आहेच पण परिस्थिती अनुकूल नाही.परिस्थितीवर मात करीत ते शिकत राहिले.पुस्तक शिकत राहिले.पुस्तके आणि त्याचबरोबर समाज वाचीत राहिले.अहमदनगर जिल्ह्यातल्या नेत्यांच्या संपर्कात येत राहिले; डॉक्टर व्हायचे का वकील ? असा काहीसा संभ्रम झाला असावा म्हणून मॅट्रिक झाल्यावर महाविद्यालयात त्यांनी सायन्स शाखेला प्रवेश घेतला.अहमदनगरचे शिक्षण झाल्यावर वकिलीच्या अभ्यासासाठी जावे लागले. अहमदनगरपर्यंतच्या शिक्षणाचा गाडा रेटला.पुण्याला जायचे आहेच,शिकायचेही आहेच.पैसाही नाहीच.ठोकळांचे प्रकाशन पुण्याला होते.तिथे कागदाच्या घड्या घालण्याचे काम मिळविण्याचा प्रयत्न केला.कष्टाने,भ्रमाने वकिलीची सनद मिळविली. गरिबीच्या अनुभवाने विचारांना डावी दिशा दिली.'आहेरे' वर्गाबरोबर न जाता 'नाहीरे' वर्गाबरोबर जात राहिले ते आजतागायत मनाने त्याच रुळावरुन चालत आहेत. आष्टीत वकिली सुरु केली.हैद्राबाद राज्यात, म्हणजे तेलंगणात कम्युनिस्ट पक्षाने " जमिन सिलिंगचे " फार मोठे क्रांतीकारक आंदोलन केलेले होते.हैद्राबाद टेनन्सी अॕक्ट (३८) हैद्राबाद " कुळ कायदा " हा कायदा झालेला होता. शेती कसणारांना कुळ म्हणत. जो शेती कसीत असेल त्याला शेताची मालकी कायद्याने मिळू लागली. ह्या कायद्याच्या काळात उगलेसाहेबांच्या वकिलीने शिखर गाठले.त्यांनी शक्यतो कुळांच्या बाजुने वकिली घेतली.अनेक शेतकऱ्यांना त्यांच्या हक्काप्रमाणे जमिनी मिळवून दिल्या. ह्याकाळात गरिबांच्या बाजुने वकिली करणारे उगलेसाहेब... हेच आष्टी तालुक्यात मुख्य वकिल होते.संरक्षित कुळांना, साधारण कुळांना उगलेसाहेबांचा मोठा आधार होता.आज ज्यांना ज्यांना कुळ म्हणून लाभ मिळाला आहे; त्यांनी उगलेसाहेबांचा विसर पडू देवू नये.ह्या काळात उगलेसाहेब कम्युनिस्ट पक्षात सक्रीय होते.संयुक्त महाराष्ट्राची चळवळ टीपेवर पोहचलेली होती. महाराष्ट्र द्विभाषिक होता.मुंबई गुजरातला द्यायची होती,नाही तर केन्द्राला द्यायची होती.महाराष्ट्राला मुंबई देणारच नाही असे केंद्र सरकार म्हणजे पं.नेहरु म्हणाले होते.'मुंबईचा राजा' स.का. पाटलांना म्हणत असत.ते म्हणाले होते,चंद्रसूर्य असेपर्यंत मुंबई महाराष्ट्राला देणार नाही.द्विभाषिक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मोरारजी देसाई होते.त्यांना मुंबई गुजराथला द्यायची होती.त्यांनी एकशे दहा महाराष्ट्रातील लोकांना जे मुंबई महाराष्ट्राला मागत होते त्यांना गोळ्या घालून ठार मारले होते. उगलेसाहेबांनी आष्टीत संयुक्त महाराष्ट्र समितीचा डंका वाजविला. मुंबईचा प्रश्न घरोघरी पोहचविला. आठवड्यात कधी दोन तर एक तर नक्कीच मोर्चा काढीत राहिले.पाच पन्नास लोकांचा मोर्चा असायचा. झाडाच्या फांद्याच्या काठ्या करायच्या.त्याला लाल बावटे लावायचे.निघाला उगले साहेबांचा मोर्चा.उगलेसाहेब त्यांच्या आयुष्यात ह्याच काळात विशेष आक्रमकपणाने भाषणे द्यायचे. आष्टीच्या जुन्या बसस्टँडच्या भोवताली मोठमोठाली वडाची झाडे होती.इथेच सगळ्या सभा व्हायच्या.क्वचित सभा भाजी मंडईतही व्हायच्या.कॉ.बाबुराव दरेकर,कॉ.आसराजी जाधव, कॉ.सय्यदमीर साहेब,कॉ.जलील साहेब,कॉ.बाबुराव हराळ, काशीनाथ म्हस्के,चिंचाळ्याचे पोकळे,गुलाबराव पोकळे,कॉ. हबीब खतीब,बबन देशमुख, काळपूंड,निकाळजे हे त्यांचे शिलेदार.ह्याच काळात विधान सभेची निवडणूक १९५७ साली लागली.समितीने उगलेसाहेबांना विधानसभेची उमेदवारी दिली. उगलेसाहेबांनी ही निवडणूक गांभिर्याने घेतलीच नाही.आष्टीला येवून दीड वर्ष झालेले.जवळ पैसा नाही.निवडणूक यंत्रणा नाही. त्यातच सामना काँग्रेस पक्षाच्या विश्वनाथभाऊ आजबे ह्यांच्याबरोबर होता.त्यांना तालुका पं. नेहरु म्हणायचा,समजायचा. भाऊला तालुका ओळखीत होता. त्यांचे निवडणूक चिन्ह शेतक-यांचे भरवशाचे " बैलजोडीचे " होते. त्यांच्याबरोबरच खासदार म्हणून राजकारणातले अत्यंत चाणाक्ष, मुत्सद्दी असे रखमाजी पाटील गावडे होते.काँग्रेसची अशी दुहेरी फळी उगलेसाहेबांच्या विरोधात होती. या निवडणुकीत उगलेसाहेबांनी जीप वापरली नाही. सायकलवर प्रवास केला.कॉ. आसराजी जाधव यांच्या सायकलीच्या मागे डबलसीट बसूनच प्रचार केला,तरीही त्यांचा फक्त दोनच हजार मतांनी पराभव झाला.अहमदनगरचे भाई बापूसाहेब भापकर हे उगले साहेबांनी प्रचार नीट केला नाही म्हणून रागेसुध्दा भरले होते. यावेळी आष्टीच्या नगर परिषदेची निवडणूक झाली.ती उगलेसाहेबांच्या नेतृत्वाखाली लढविली गेली,नगर परिषदेची ही निवडणूक मोठ्या फरकाने 'संयुक्त महाराष्ट्र 'समिती' या पक्षाने जिंकली. ह्या काळात आष्टी गावासकट तालुक्यात अनेक गावेच्या गावे कम्युनिस्ट पक्षाची होती.उदा.ब्रम्हगाव,किन्ही, बेलगाव,घुमरी,कुंभेफळ,अंभोरा, हिवरा,सुलेमान देवळा,कोयाळ, पिंपळगाव,पाटसरा,धामणगाव, सालेवडगाव,देऊळगाव अशी गावे एकमुखी कम्युनिस्ट पक्षाला मतदान करायची.उगलेसाहेबांनी आष्टी तालुक्याला,आष्टी कोर्टाला वकील म्हणून काय दिले असेल तर ते हे की, त्यांनी पक्षकारांना माणसाची वागणूक दिली.त्या आधीचा काळ म्हणजे पक्षकारांनी वकिलांचे अपमानास्पद बोलणे ऐकण्याचा होता.उगलेसाहेब पक्षकारांबरोबर माणसासारखे बोलले.त्यांनी वकिलीची फी घेतली पण मग लूट केली नाही. वकिली पेशाला कलंक लागू दिला नाही.एकंदरीत त्यांनी वकिलीचे आधीचे सर्व आयामच बदलवून टाकले.१९६२ साली कम्युनिस्ट पक्षाचे डावे आणि उजवे असे दोन स्वतंत्र पक्ष झाले.नंबुद्रीपाद, बी.टी.रणदिवे,एस.वाय. कोल्हटकर इत्यादी पुढारी डावे झाले.श्रीपाद अमृत डांगे उजवे झाले.उगले साहेबांनी डांगे ह्यांचे नेतृत्व स्वीकारले. उगलेसाहेबांची बीड जिल्ह्यातील गेवराईच्या शाहूराव पाटलांबरोबर बरी राजकीय मैत्री जुळली होती. १९६७ साली त्यांनी आष्टी-पाटोदा मतदार संघाची विधानसभेची निवडणूक लढविली.ही निवडणूक त्यांनी बहुमताने जिंकली. त्याचबरोबर जिल्हा परिषदेचे तीन गटही जिंकले.बीड जिल्ह्यातल्या राजकीय नेत्यांबरोबर विशेष अशी नाळ जुळलीच नाही. उगलेसाहेब पश्चिम महाराष्ट्रातले डाव्या विचाराचे,मग शेकाप,लाल निशान गट अशा नेत्यांबरोबर त्यांचे चटकन जुळून जात होते. क्रांतीसिंह नाना पाटलांबरोबर तर त्यांनी एकत्र निवडणूक लढविली होती. ती जिंकलीही होती. उगले साहेबांनी सोमय्याच्या शेतावर सत्याग्रह केला,गोवा मुक्ती चळवळीत मोर्चे काढले पण त्यांनी स्वातंत्र्य सैनिक म्हणवून घेतले नाही. स्वातंत्र्य सैनिकांचे लाभ अगदी सहजगत्या मिळाले असतांना त्यांनी फुकट्या लाभाची लालसा मनात येवू दिली नाही.उगलेसाहेब " संघटक" नव्हते ' हा त्यांच्या राजकीय प्रवासातला मोठाच दोष ठरला.त्यांनी " केडर " उभे केले नाही.त्यांना आष्टी तालुक्यात अनेकांनी मदत केली.पक्षाबाहेरच्या लोकांनी मोठी कुमक दिली.ह्याच्या उत्तरात त्यांनी कुणाबरोबरही राजकीय वैर ठेवले नाही आणि व्यवहारातही वैरही ठेवले नाही. आष्टीत त्यांनी रखमाजी पाटलांना विशेषत्वाने मानले असावे.१९६७ साली आमदारकी सुरु झाली. काँग्रेस पक्षाचे राज्य होते. यशवंतराजींची महाराष्ट्राच्या राजकारणावर घट्ट पकड होती. वसंतराव नाईक कार्यक्षम मुख्यमंत्री होते.उगलेसाहेबांनी विधानसभेत बोलण्याचा,प्रश्न विचारण्याचा सपाटा लावला.अनेक प्रश्न विचारले.सगळेच प्रश्न अभ्यासपूर्ण होते.त्यांच्या प्रश्नाने संबंधित खात्याच्या मंत्र्याची अडचण होत राहिली. नाईकसाहेबांनी उगले साहेबांबद्दल मनातल्या मनात वेगळीच आखणी केली.विधान सभेत शरद पवारसाहेब काँग्रेस पक्षाचे तरुण आमदार होते.त्यांनी उगलेसाहेबांबरोबर सख्य जुळवायला सुरुवात केली. उगलेसाहेबांना बारामतीला बरोबर घेतले. हळू हळू सूर जुळायला लागले. ह्याच काळात कॉ.कृष्णा देसाईचा मुंबईत खून झाला. केन्द्रात इंदिरा गांधींनी अधिक डावा कार्यक्रम घोषित केला.बँकांचे राष्ट्रीयीकरण केले, विमा कंपनीचे राष्ट्रीयीकरण केले. राजे महाराजे लोकांचे तनखे बंद केले. शिलिंग आणले. 'गरिबी हटाव' चा नारा दिला.डाव्या विचाराच्या लोकांना हा कार्यक्रम आपलाच वाटला.वसंतराव नाईकसाहेब,पवारसाहेबांचे प्रयत्न,इंदिरा गांधींचा २० कलमी कार्यक्रम, गरिबी हटावचा नारा ह्याचा परिणाम म्हणून उगलेसाहेबांनी आपल्या बरोबर तीन कम्युनिस्ट आमदारांना घेवून काँग्रेस प्रवेश केला. १९७२ सालच्या निवडणुकीसाठी ठरल्याप्रमाणे उगलेसाहेबांना वसंतराव नाईक साहेबांनी काँग्रेस पक्षाचे तिकीट जानेवारीत जाहीर केले.महाराष्ट्रातील एकट्याच उगले साहेबांचेच तिकीट फक्त दिल्लीला बदलले.बाबुराव काळे,बाळासाहेब पवारांनी शंकरराव चव्हाण साहेबांच्या आग्रहावरुन इंदिरा गांधींना सांगून आष्टीचे कॉंग्रेस पक्षाचे तिकीट श्रीपतराव कदम साहेबांना देण्यात आले पण त्याचवेळी वसंतराव नाईक साहेबांनी उगलेसाहेबांना विधान परिषदेवर घेण्याचे वचन दिले. ते त्यांनी लगेच पूर्णही केले. उगलेसाहेबांचा स्वभाव आक्रमक नाही.आपल्यामुळे कुणालाही,कशाही प्रकारचा शक्यतो त्रासा झाला नाही पाहिजे या मताचे होते. उगलेसाहेबांचे सुरुवातीच्या काळातील भाषणे भांडवलदारांच्या विरोधातली असत.आणीबाणीनंतर ते विधानसभेच्या निवडणुकीला उभे राहिले.त्यांचे फ्रेमबध्द वागणे आणि अती आदर्शवादापायी त्यांचा पराभव झाला.भूविकास बँकेची गाडी त्यांना मिळाली.ही गाडी त्यांनी घरापुढे ऐट म्हणून,रुबाब म्हणून लावली तर नाहीच पण खाजगी कामासाठीही ही गाडी वापरलीच नाही.बँकेचे शिपाईही घरी कामाला आणले नाहीत. वकिली चांगली चालली.११ वर्षे आमदार,भूविकास बँकेच्या चेअरमनचे अधिकार,रयत शिक्षण संस्थेचे पदाधिकारी,कड साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन. त्यांची आज प्रॉपर्टी काय? ह्याच बरोबर त्यांना शून्यातले मोठे शून्य दुर्व्यसन,राहणीमान घरात दारात सामान्य माणसासारखेच. सतत आपल्या गरिबीच्या भूतकाळाची आठवण जागी ठेवली.त्यांनी आष्टीत एक साधारण घर बांधले.१० एकर बरडाची जिरायत जमीन घेतली. ॲड. निर्मला या एका मुलीचे लग्न केले. संपली इस्टेट.वडिलोपार्जित इस्टेटीचाही थोडाफार लाभ संसार प्रपंचाला होतच असेल. उगलेसाहेबांनी आयुष्यभर एस.टी. बसनेच प्रवास केला.सत्शिल, आदर्शवत चारित्र्य उगलेसाहेबांनी जोपासले. आष्टी तालुक्याला कुकडीचे पाणी आणता येते हे त्यांनी १९८६ सालीच करून घेतला.दत्ता देशमुख आणि दांडेकर ह्यांच्या समितीला हा सर्व्हे पटवून दिला,मेळावे घेतले. त्यांनी ह्या सर्व्हेला मान्यताही दिली होती.विसापूर जवळून कुकडीचे हे पाणी आष्टी तालुक्याला सहज येत होते.हाच सर्व्हे त्यांना महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री शंकरराव चव्हाणसाहेब यांना दिला होता. शंकरराव चव्हाण स्वतः पाण्याच्या प्रश्नाचे तज्ञ होते,त्या मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण साहेबांना तो पटवून दिला. तालुक्याला शाप नसता तर हेच पाणी आष्टीला कधीच आले असते.शंकरराव चव्हाण साहेबांनी उगले साहेबांचे आमदारकीचे १९७२ सालचे तिकीट कापले होते. शंकरराव चव्हाणसाहेब आणीबाणीच्या काळात मुख्यमंत्री होते.पुढे निवडणुका आल्या. महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाला यश आले नाही.त्यामुळे शंकरराव चव्हाण साहेबांना मुख्यमंत्री पदावरुन हटवावे असा महाराष्ट्रातल्या काँग्रेसी लोकांनी इंदिरा गांधींकडे आग्रह धरला.केन्द्रीय नेतृत्व मुंबईला आले.आमदारांच्या मतांची चाचपणी सुरु केली. शंकरराव चव्हाण यांच्याबाबत "Change" OR "No Change" असा प्रश्न केन्द्रीय निरीक्षक आमदारांना विचारीत.उगलेसाहेबांनी शंकरराव चव्हाण साहेबांना बदलू नये "No Change" असे सांगितले अन् म्हणाले, महाराष्ट्रात मराठवाड्याला नेतृत्व आताच लाभले आहे.शिवाय शंकरराव पुरोगामी विचारांचे आहेत.त्यांना बदलू नये.वास्तविक पाहता त्यांनी शंकररावांचा राग ठेवायला पाहिजे होता.पण उगले साहेबांचे जगणे आणि राजकारणच एका तत्वाने बांधलेले होते. माजी आ.उगलेसाहेब शेवाटपर्यत डाव्या विचारांचेच राहिले.शेतकरी, शेतमजूर,श्रमजीवी,कष्टकरी यांच्याच बाजुने ते राहिले. पुर्वाश्रमीचे साम्यवादी,पुढे काँग्रेसने डावे धोरण स्वीकारले म्हणून ते पवार साहेबांच्या काँग्रेस बरोबर राहिले पण त्यांचा साम्यवादी पींड कायमच आहे. उगलेसाहेबांना कुठल्याही मंदिरात पूजापाठ करतांना,त्यांच्या घरात ब्राम्हणाने एखादा विधी केला आहे असे कुणाला आठवत नाही. कुठल्या मंदिरापुढे अन् बुवापुढे, महाराजांपुढे त्यांनी लोटांगण घातलेले नाही.पदे आली.पण त्या कोणत्याही पदाचा वापर स्वार्थासाठी एक मिलीग्रॅम इतकाही केला नाही.त्यांच्या हक्काचे मानधन आणि भत्त्याव्यतिरिक्त त्यांनी एकाही पैशाला हात लावला नाही.ते निर्लोभी आणि निर्लाभी, कमळाच्या पाकळ्यासारखे पाण्यात राहिले.कमळाच्या पाकळ्याला पाण्याचा एकही थेंब चिकटत नसतो.उगलेसाहेबच एक असे व्यक्तिमत्व खासदार रखमाजी पाटलांनंतरचे आहेत की,सत्तेच्या डोहात राहुनही अंगाला एकही थेंब चिकटुन न देणारे माजी आ.ॲड. निवृत्तीराव उगलेसाहेबच ..... माजी आ.निवृत्तीराव उगले यांच्या दशक्रियाविधीनिमित्त दैनिक झुंजारनेता परिवाराच्यावतीने भावपुर्ण श्रध्दांजली ..... -------------------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या