
आष्टी(प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील श्रीक्षेत्र पिंपळा येथील विश्वशांती भुवन
संस्थानचे मठाधिपती ह.भ.प नारायण महाराज वाळके यांनी सलग दुसऱ्या वर्षी अन्न आणि
पाण्याचे सेवन न करता जवळपास २०० कि.मी.अंतर पूर्ण करून पिंपळा ते वैकुंठभूमी श्री
क्षेत्र पंढरपूर वारी दि.६ ऑक्टोबर रोजी दररोज ५० किलोमीटर अंतर पायी चालून पूर्ण
केली.आनंद सांप्रदायाच्या मालिकेतील वैकुंठवासी सद्गुरु नाना महाराज पिंपळेकर यांचे
शिश्योत्तम असलेले ह.भ.प.नारायण महाराज वाळके हे नाना महाराजांच्या पश्चात
त्यांच्या इच्छाप्रमाणे मठाचे मठाधिपती म्हणून विराजमान झाले.नाना महाराज यांचा
महाराष्ट्र राज्यामध्ये प्रचंड मोठा भक्त परिवार आहे.गुरुपौर्णिमा आणि नाना
महाराजांच्या पुण्यतिथी निमित्त, आणि पारायण सोहळ्यासाठी हजारो भावीकांची पिंपळा
येथील मठामध्ये उपस्थिती असते.त्याचप्रमाणे मार्गशीर्षवारीसाठी पिंपळा येथून
पंढरपूरला दिंडी सोहळ्यामध्ये सुद्धा शेकडो भाविक सहभागी होत असतात. या सर्व वारीचे
नियोजन, संयोजन भक्त परिवारासह नारायण महाराज हे अनेक वर्षांपासून पाहत आहेत. नाना
महाराज यांनी या परिसरामध्ये आयुष्यभर परमार्थिक सेवा करत असताना अनेकांच्या
जीवनामध्ये भक्तीचा ओलावा निर्माण केलेला आहे. प.पू.नाना महाराजांच्या
मार्गदर्शनाने ,आशीर्वादाने अनेकांना व्यसनांपासून मुक्ती मिळालेली आहे. त्यांचा
अनुग्रह घेतलेले अनेक साधक आज मोठमोठाले कीर्तनकार, प्रवचनकार, उद्योजक,
व्यावसायिक, अधिकारी झालेले आहेत. नानांच्या आशीर्वादामुळे असंख्य परिवारामध्ये
सुख, समृद्धी आणि समाधान प्राप्त झालेले आहे. विशेषता पिंपळा, लोणी ,बोडखा,
निमगाव,सुरत, मुंबई, दौंड, पुणे ,नगर, धनगरवाडी , सूंबेवाडी, काकडवाडी ,कवडगाव,
पारोडी, कोयाळ, मांडवा, चिचोंडी, जामगाव, शेरी, कडा या परिसरामध्ये नाना महाराजांचा
मोठा शिष्य परिवार आहे. असंख्य अधिकारी, कर्मचारी नाना महाराजांच्या शिष्य
परिवारामध्ये भक्ती भावाने एकत्र येत असतात. भाविकांच्या आर्थिक मदतीतून
श्रीक्षेत्र पिंपळा येथे भव्य मठाचे व सद्गुरु नाना महाराजांच्या मंदिराचे बांधकाम
झालेले आहे. त्यांचाच अनुग्रह प्राप्त झालेले परमपूज्य मठाधिपती नारायण महाराज
वाळके हे त्यांचा वारसा भक्त परिवारामध्ये भक्तीभावाने,खंबीरपणे ,निष्ठेने चालवत
आहेत. ह.भ. प.नारायण महाराज हे आपल्या प्रवचन आणि कीर्तन सेवेतून सदैव परमार्थ
सेवा, ईश्वर सेवा आणि सद्गुरूच्या प्राप्तीसाठी अहोरात्र भक्ती भाव धारण करून
गावोगावी परमार्थ सेवावृत्ती ठेवून भगवंत भक्तीचा प्रसार करत असतात. मोठे जमीनदार
असून सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून स्वतःचे घरदार,प्रपंच याचा महाराजांनी त्याग
केलेला आहे. महाराज कोणाच्याही घरचे जेवण, चहा,पाणी, काहीही घेत नाहीत. किर्तन आणि
प्रवचन सेवेसाठी कुठेही गेले तरी कसल्याही प्रकारचे मानधन अथवा स्वतःच्या गाडीचे
पेट्रोल सुद्धा कुणाकडून स्वीकारित नाहीत स्वतःच्या हाताने बनवलेले जेवण 24 तासा
मधून फक्त एकदाच घेत असतात. कसलाही बडेजाव,थाटमाट न करता सदैव ईश्वर, नाम
चिंतनामध्ये ते व्यस्त असतात.त्याचाच एक भाग म्हणून गेल्यावर्षीपासून त्यांनी काही
मोजक्या साधकांना घेऊन पंढरपूरची पायी वारी ती सुद्धा अन्न आणि एक थेंब पाण्याचे
सेवन न करता दररोज ५० किलोमीटर अंतर कापून चार दिवसांमध्ये श्रीक्षेत्र पंढरपूर
येथे पांडुरंगाच्या दर्शनासाठी पूर्ण केली.वयाचे ७५ वर्ष पूर्ण होऊन सुद्धा
त्यांच्यामध्ये ईश्वर भक्तीचा असलेली प्रचंड श्रद्धा आणि जिव्हाळा या कठोर
तपश्चर्या मधून दिसून येते. पंढरपूर येथे त्यांचे आगमन झाल्यानंतर अनेक भाविकांनी
महाराजांचा सत्कार करून दर्शन घेतले.त्याचप्रमाणे सभापती गोपाळभाऊ रक्ताटे व अनेक
साधकांनी वारी पूर्ण करून आल्यानंतर पिंपळा येथील विश्वशांती भुवन संस्थान मध्ये
जाऊन आज महाराजांचा उचित सन्मान केला.
0 टिप्पण्या