आष्टी (प्रतिनिधी)
बंगळुरू येथे नुकत्याच पार पडलेल्या देशातील पहिल्या "तेजस्वी जीवलोक -१२-काजव्यांचे जग" राष्ट्रीय काजवा छायाचित्र प्रदर्शन व काजवा संरक्षण व संवर्धन कार्यशाळेमध्ये फक्राबाद येथील संशोधक विद्यार्थी रणजित रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदवला आहे.विशेष म्हणजे महाराष्ट्रातून निवड झालेले ते एकमेव विद्यार्थी होते. तसेच त्यांची फायरफ्लाईज एशियन असोशीएशन च्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून महाराष्ट्रातून एकमेव निवड करण्यात आली आहे.पर्यावरण विषयक प्रख्यात लेखक दिवंगत के.पी. पूर्णचंद्र तेजस्वी (८ सप्टेंबर १९३८ - दि.५ एप्रिल २००७) यांनी त्यांच्या जीवनात त्यांच्या अभ्यासातून आणि साहित्यातून सातत्याने पर्यावरण व जैवविविधतेच्या संरक्षण व संवर्धनासाठी जनजागृती केली आहे. त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून बंगळुरू येथील पर्यावरण व्यवस्थापन आणि संशोधन संस्था,इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्व्हेशन ऑफ नेचर,स्पेसिज स्पेशालिस्ट ग्रुप,फायरफ्लाइज एशीयन असोसिएशन,कर्नाटक चित्रकला परिषद, कर्नाटक प्रदुषण नियंत्रण मंडळ, कर्नाटक सरकार,परिसर - पर्यावरण संरक्षण संस्था बंगळुरू आणि केपी पूर्णचंद्र तेजस्वी प्रतिष्ठान, बंगळुरू यांच्या संयुक्त विद्यमाने कर्नाटक चित्रकला परिषद बंगळुरू येथे दि.८ ते १५ सप्टेंबर या कालावधीत "तेजस्वी जीवलोक -१२- काजव्यांचे जग", या विषयावर देशातील पहिले काजव्यांचे छायाचित्र प्रदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.या काजवा छायाचित्र प्रदर्शन व राष्ट्रीय कार्यशाळेमध्ये देशभरातून आसाम, कोलकाता,केरळ,छत्तीसगढ, उडीसा, दिल्ली, गुजरात, महाराष्ट्र इत्यादी विविध राज्यांमधून शास्त्रज्ञ,संशोधक व छायाचित्रकारांना निमंत्रीत करण्यात आले होते.त्यापैकी महाराष्ट्रातून छत्रपती संभाजीनगर येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाशी संलग्नित अंबाजोगाई येथील योगेश्वरी महाविद्यालयाच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी व फक्राबादचे सुपुत्र रणजित रावसाहेब राऊत यांना निमंत्रीत करण्यात आले होते.या काजवा छायाचित्र प्रदर्शन व राष्ट्रीय कार्यशाळेत त्यांनी आपल्या महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व केले. रणजित राऊत यांनी सक्रिय सहभाग घेऊन आठ दिवसीय राष्ट्रीय प्रदर्शन व कार्यशाळा यशस्वीरित्या पूर्ण केली.
या राष्ट्रीय कार्यशाळेत देशभरातून विविध राज्यांतील तज्ज्ञ प्राध्यापक, शास्त्रज्ञ, संशोधक विद्यार्थी यांनी सक्रीय सहभाग घेतला.त्यामध्ये प्रा.डॉ.गोहेन बरूवा (आसाम), प्रा.डॉ.आमलन दास (कोलकाता), प्रा.डॉ.अक्षय कुमार चक्रवर्ती (वरीष्ठ शास्त्रज्ञ,बंगळुरू),डॉ. बी. एल. शंकर (बंगळुरू),डॉ.ईश्वर प्रसाद (बंगळुरू), प्रा. डॉ. शमसुद्दीन शेख (विभागप्रमुख,प्राणीशास्त्र विभाग, कन्नूर विद्यापीठ, कन्नूर केरळ), प्रा. डॉ. बिजॉय (ख्रिस्त महाविद्यालय स्वायत्त, इरींजलकुडा, केरळ), डॉ.ज्योती (बंगळुरू),परवेझ खान (दिल्ली), आशुतोष डे (उडीसा),सुभद्रा बरीक (उडीसा), देबोरा हानौच (छत्तीसगड), अभिषेक (उडीसा), आशिष सिनोजिया (छायाचित्रकार गुजरात), रणजित राऊत (संशोधक, महाराष्ट्र) यांचा समावेश होता. या प्रसंगी संशोधक व शास्त्रज्ञांनी काजव्यांच्या विविध प्रजातींची ओळख व त्यांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी काय काय उपाय योजना करता येऊ शकतात याबद्दल मार्गदर्शन केले. काजवे सुमारे १५० दशलक्ष वर्षांपूर्वी म्हणजेच मानवांपूर्वी उत्क्रांत झाले आहेत.काजवे पर्यावरणीय समतोल राखण्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत कारण ते परागिभवनात मदत करतात, तसेच ते सर्वोत्तम कीटक शिकारी देखील आहेत.संशोधकांच्या मते, काजवे हे पर्यावरणाच्या गुणवत्तेचे चांगले सूचक आहेत.अशा पर्यावरणपूरक काजव्यांचा जीव आज धोक्यात आहे. वाढते शहरीकरण आणि अविचारी विकास, कीटकनाशकांचा अतिवापर यामुळे मानवजातीचा त्यांच्या अधिवासावर परिणाम होत असल्याने त्यांचे मोठे नुकसान होते. मानवी जीवनात प्रचलित असलेले कृत्रिम दिवे देखील त्यांना त्रासदायक आहेत. काजव्यांवर फारसा अभ्यास आणि संशोधन कार्य भारतात झालेले नाही. या कार्यशाळेमध्ये काजव्यांचे जीवसृष्टी व पर्यावरण समतोल राखण्यासाठी असलेले उपयुक्त योगदान व त्यांच्या संवर्धनाची आवश्यकता यावर सखोल चर्चा व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच प्रदूषण व मानवी हस्तक्षेपामुळे काजव्यांच्या संख्येत लक्षणीय घट झाली आहे, म्हणून त्यांच्या संरक्षण व संवर्धनासाठी योग्य त्या उपाययोजना सुचविण्यात आल्या. जनसामान्यांमध्ये काजव्यांबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी देशातील पहिले काजवा छायाचित्र प्रदर्शन व कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती असे आयोजकांनी सांगितले.जैवविविधता संरक्षण व संवर्धनासाठी रणजित राऊत हे नेहमीच प्रयत्नशील असतात. या राष्ट्रीय कार्यशाळेत त्यांची फायरफ्लाईज एशियन असोसीएशन च्या संचालक मंडळावर सदस्य म्हणून महाराष्ट्रातून एकमेव निवड करण्यात आली, त्यासाठी त्यांचे संशोधन मार्गदर्शक व प्राणीशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ.गणेश सूर्यवंशी, प्राचार्य डॉ.एम.व्ही.कानेटकर, प्रा.डॉ. अनिल कुऱ्हे, प्रा.डॉ.बी.ए.पवार, प्रा.डॉ. जे. डी. शेख, प्रा.डॉ.विद्या प्रधान, प्रा.डॉ. रुपेंद्र भागडे, प्रा.डॉ.ए.एम. भोसले,प्रा. डॉ. संतोष रणखांब, प्रा.डॉ.सुधाकर कुऱ्हाडे, प्रा.डॉ.विलास जीवतोडे, प्रा. डॉ. सुनिल पोकळे, प्राचार्य डॉ.एल.एस. मतकर,प्राचार्य डॉ.पी.एम.दिघे, प्राचार्य डॉ.मकदुम फारुकी आदीनी त्यांचे अभिनंदन केले.


0 टिप्पण्या