Ticker

6/recent/ticker-posts

बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्मपितामह माजी आ. दरेकरनाना*

बीड जिल्ह्याच्या राजकीय नकाशावर आपल्या आगळ्यावेगळ्या व्यक्तिमत्वाने नावलौकिक निर्माण केलेले राजकीय नेते साहेबराव दरेकर नाना आहेत. बीड जिल्ह्याच्या तमाम जनतेच्या व राजकिय नेत्यांच्या ते परिचयाचे आहेत. आपल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकिय, धार्मिक कार्याने त्यांनी बीडच्या राजकीय पटलावर आपली वेगळी ओळख निर्माण केलेली आहे तथा बीडच्या राजकिय नकाशावर आपल्या राजकिय कर्तबगारीने त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केलेले नेते दरेकर नाना आहेत. त्यांच्या स्पष्टोक्ते पणामुळे ते सर्व दूर परिचयाचे आहेत. मराठवाड्यातील संत - महंतांच्या आणि शुरवीरांच्या भूमीत माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांच्या रूपाने ही आष्टीची माती पवित्र झाली. संत भगवान बाबा, संत वामन भाऊ, माऊली महाराज, मुकुंदराज स्वामी, प्रभू श्रीराम यांच्या पावन भूमीत राजकिय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आदी क्षेत्रात आपल्या कार्याने या मातीत लहानाचे मोठे होऊन या भूमीच पांग फेडण्याचे काम करणारे नेते दरेकर नाना आहेत. आष्टी पासून चाळीस किलोमीटर अंतरावर असणाऱ्या कोयाळ या छोट्याशा गावात स्वातंत्र्य सेनानी स्वर्गीय नाथूजी दरेकर यांच्या कुटुंबात ३ सप्टेंबर १९४७ रोजी म्हणजे देश स्वतंत्र झाल्यावर अगदी काही दिवसात माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांचा जन्म झाला. शेतकरी आणि सामान्य कुटुंबात लहानाचे मोठे होताना अंगी सामाजिक गुण होते. पुढे शिक्षण पूर्ण करत असतांनाच कोयाळ व परिसरामधील गावातील जनतेच्या सुख - दुःखात सहभागी होणे, त्यांच्या अडीअडचणी सोडवणे हा छंद लहानपणापासूनच असल्याने ते आपोआप राजकारणात ओढले गेले. तेंव्हापासून ते आजपर्यंतचा त्यांचा राजकिय अनुभव आणि इतिहास पाहता ते आष्टी विधानसभा मतदारसंघाच्या राजकारणात नेहमी केंद्रस्थानी असतात. त्यांच्याकडे आष्टीच्या राजकिय कुरुक्षेत्रावरील भीष्मपितामह म्हणून पाहिले जाते. माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांची राजकारणाची सुरुवात पिंपळा जिल्हा परिषद गटातून झाली. अशाप्रकारे बीड जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राजकारणात त्यांनी यशस्वी प्रवेश केला. कडा सहकारी साखर कारखान्याला बळ देणारा संयम आणि संघर्षातून माजी आमदार भीमराव धोंडे यांच्या खांद्याला खांदा देऊन ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी काम करणारा रांगडा नेता म्हणजे नाना. त्यावेळी मा. आ. भीमराव धोंडे साहेब कारखान्याचे चेअरमन झाले त्यावेळी नाना व्हाईस चेअरमन पदावर विराजमान झाले. पुन्हा साधारणपणे १९८५ च्या विधानसभा निवडणुकीत धोंडे साहेबांनी उभे राहण्याचा निर्णय घेतला आणि इथूनच अतिशय जवळच्या दोन्ही मित्रात दोन गट पडले आणि दरेकरांचा खरा संघर्षाचा काळ सुरू झाला. पुढे १९९० च्या विधानसभा निवडणुकीत धोंडे - दरेकर आमने - सामने आले. जनता दलाचे चक्र सुदर्शन चक्र झाले. मात्र दरेकर नानांचा पराभव झाला. नंतर १९९५ ची निवडणूक सुरू झाली. घोडा मैदान समोरच होते. या निवडणुकीत दरेकर नानांचा मुलगा - मुलगी चिन्हाने विक्रमी मते घेऊन मराठवाड्यातील क्रमांक एकचे मते घेत दहावी शिकलेला संघर्षशील नेता विधानसभेत पोहोचला. त्याच काळात युती सरकार सत्तेवर आले. मात्र दरेकर नानांची शरद पवार साहेब यांच्यावरची निश्‍चिम भक्तीमुळे दरेकरांना अपक्ष असून देखील मंत्रिमंडळापासून दूर राहावे लागले. मात्र त्यावेळी आमदार दरेकर नाना यांनी मतदारसंघातील अनेक साठवण तलाव, बीड - अमळनेर नगर राज्य मार्ग, आयटीआय कॉलेज यांसह अनेक छोटे - मोठे विकास कामे मार्गी लावून मतदार संघात शांतता अबाधित ठेवण्यासाठी प्रयत्न केले. पुढे मित्र स्वर्गीय रामचंद्र दादा धस यांचे चिरंजीव सुरेश आण्णा धस यांना राजकारणात मनमोकळ्या पणाने कुठलाही हातचा न ठेवता मदत केली. १९९७ च्या जि.प. निवडणुकीत आमदार सुरेश धस या युवा नेतृत्वाचा राजकीय उदय झाला आणि त्यांना दरेकरांनी जि. प. अध्यक्षपदासाठी मदत केली. पुढे १९९९ च्या विधानसभेच्या निवडणुकीत आपले राजकिय शिष्य असणाऱ्या आमदार सुरेश धस यांच्याकडून दरेकरांना पराभूत व्हावे लागले. नंतर २००४ च्या विधानसभा निवडणुकीत ज्येष्ठ चिरंजीव राजाभाऊ दरेकर यांना उभे केले मात्र तेथे अपयश आले. दरेकरांच्या राजकिय जीवनात अनेक चढउतार आले. मात्र पिंपळा सध्याच्या लोणी जिल्हा परिषद गटातील जनतेने मात्र दरेकर कुटुंबावर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. पुढे पुन्हा २००९ च्या विधानसभा निवडणुकीत दरेकरांनी आमदार सुरेश धस यांना मदत केली तेथे त्यांचा विजय झाला. मात्र येथे एकत्र असलेली थ्रीडी जास्त काळ एकत्र राहिली नाही. पुन्हा २०१४ च्या निवडणुकीत आमदार भीमराव धोंडे यांना आमदार करण्यासाठी मदतीचा हात दिला आणि ते आमदार झाले. पुढे २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत सध्याचे आमदार बाळासाहेब आजबे राष्ट्रवादीकडून एकाएकी लढत असतांना माजी आमदार साहेबराव दरेकर यांनी त्यांना मदत करण्याचा निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. एकूणच आष्टी मतदार संघाच्या राजकिय इतिहासात माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांनी आमदार होण्यासाठी मदत केली नाही असा सध्या तरी एकही नेता नाही. आजच्या बदलत्या राजकिय परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांच्याबरोबर निष्ठेने कायम राहणार असल्याचे ठामपणे सांगितले आणि पक्ष विस्तार करण्यासाठी प्रत्यक्ष सुरुवात केलेली आहे.दिलेला शब्द पाळणे, जे बोलायचे तोंडावर बोलणे, स्वाभिमानी बाणा आणि संघर्ष करण्याची तयारी असणारे व आजच्या मतदारसंघातील जनतेच्या सुखदुःखात सहभागी होणारे बीड जिल्ह्यात सर्वत्र परिचित असणारे आष्टी मतदार संघाचे भीष्मपितामह ज्येष्ठ नेते माजी आमदार साहेबराव दरेकर नाना. चंदन स्वतः झिजत राहते आणि दुसऱ्याला शितलता देते तसे नानांचे जीवन आहे.जगद्गुरु संत तुकारामांच्या विचारांचा प्रभाव नानांच्या बोलण्यात नेहमीच जाणवतो. त्यांच्या स्वभावाला धार्मिक अधिष्ठान आहे. समाजातील रुढी - परंपरा, सण - उत्सव याला बाधा न पोहोचू देता ते अंधश्रद्धेला विरोध करतांना दिसतात.लग्न समारंभातील बडेजाव पणा, पूजाअर्चा, वृत्त - वैकल्य यामध्ये समाजाने गुंतून न पडता,व्यर्थ खर्च न करता आपल्या कुटुंबाची उन्नती करावी असे नेहमी त्यांना वाटते. शेतकऱ्यांचा पिंड असलेले,शेतकऱ्यांबद्दल त्यांना नेहमीच कळकळ वाटते. शेतकऱ्यांच्या मुलांनी शिकावं,मोठं व्हावं,नावलौकिक करावा याबाबत नाना नेहमीच आशावादी राहिले. नाना नेहमी वधूवरांना लग्नसमारंभात शुभाशीर्वाद देतांना तरुणांना वडीलकीचा सल्ला दिल्याशिवाय राहत नाहीत. नाना आमदार असतांना त्यांच्या काळात झालेले रस्ते,पाझर तलाव, नाले, पूल आजही नानांच्या दूरदृष्टीची साथ देतात. सत्तेत असो अथवा नसो, पदावर असो अथवा नसो परंतु समाजकारण करतांना त्यांनी विधानसभा मतदारसंघात नेहमीच आपला दबदबा कायम टिकून ठेवला आहे. गोरगरीब मजूर, पीडित - शोषित सर्वांचा आधार म्हणजे नाना. कुणाची भीडभाड न ठेवणारे, परखड बोलणं, बोलण्यातील लकप, चालण्यातील रुबाब, स्वभावातील रांगडेपणा नेहमीच भावत गेला. नानांशी बोलण्यावर आपलेपणाची भावना मनातून निर्माण होते. नानांचा संपर्क आला की, नाना त्यांना आपलंसं करतात. नेहमी दिलखुलास असणारे नाना, आपलेपणाची विचारपूस करणारे नाना, दरेकर नाना परखड राजकारणी. आष्टी मतदारसंघातच नव्हे तर महाराष्ट्र राज्य सुद्धा त्यांना " नाना " म्हणूनच ओळखतो.अशा या सर्व गुणसंपन्न बीड जिल्ह्याच्या राजकारणातील भीष्मपितामह माजी आमदार साहेबराव दरेकर नाना यांना वाढदिवसानिमित्त दीर्घायुष्यासाठी अनंत शुभेच्छा...!!!
लेखक -राजेंद्र लाड (आष्टी)

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या