विशेष लेख
-----------

बऱ्याचदा मोठी माणसं खूप साधी असतात. त्यांच्या मोठेपणामुळे आपण त्यांच्या जवळ
जायला जरा बिचकतो. मग बराच कालावधी असा अंतर राखून गेल्यानंतर त्यांच्या साधेपणाची
आपल्याला जाणीव व्हायला लागते.तेव्हा आपण उगाचच विलंब ताणून धरला असेही वाटायला
लागते.आष्टी जि.बीड येथील हंबर्डे महाविद्यालयात मी शिक्षण घेत होतो. त्याकाळी
महाविद्यालयाचे स्नेहसंमेलन म्हणजे सर्व विद्यार्थी,विद्यार्थिनींसाठी एक परवणीच
असायची.कलावंत विद्यार्थ्यांसाठी जरा जास्तीच.स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने कथाकथन,
काव्यवाचन,वक्तृत्व स्पर्धा घेतल्या जायच्या.सन १९८३- १९८४ सालाचे वार्षिक
स्नेहसंमेलनासाठी बाल साहित्यिक,दैनिक लोकमतचे संपादक महावीर जोंधळे हे
स्नेहसंमेलनाचे प्रमुख पाहुणे म्हणून महाविद्यालयाला लाभले.तो काळ असा होता
की,विद्यार्थी पाहुण्यांचे भाषण मन लावून ऐकायचे.मला आजही आठवते,त्यावेळी
कार्यकर्ता कादंबरी बद्दल ते प्रमुख पाहुणे म्हणून खूप भरभरून बोलले होते.पारितोषिक
वितरण सोहळा महावीर जोंधळे यांच्याच हस्ते झाला. स्नेहसंमेलनाचे
सूत्रसंचालक,नाटककार,नाट्य कलावंत प्रा. चित्तरंजन हेळकर यांनी काव्यवाचन प्रथम
पारितोषकासाठी माझे नाव पुकारले.मी स्टेजवर गेलो.पाहुण्यांच्या हातात प्रमाणपत्र
आणि पेन इत्यादी वस्तू पोहोचलेल्या होत्या.माझ्या हाती ते सर्व देण्याआधी
पाहुण्यांनी मला प्रश्न विचारला, तू मराठीत कविता लिहितोस ? मी हो
म्हणालो.त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद झळकला.हीच त्यांच्याशी माझी पहिली भेट
आणि झालेले संभाषण.पहिल्या भेटीतील संभाषण पुढे मराठवाडा स्तरावरील, अखिल भारतीय
स्तरावरील साहित्य संमेलनासाठी जेव्हा मी जात असे,तेव्हा त्यांना मी आपलेपणाने भेटत
असे.भेटीत ते स्मित हास्य करून स्वागत करायचे. मग माझी विचारपूस करायचे.शिक्षण
कुठपर्यंत आले ? म्हणायचे.पुढे मी हंबर्डे महाविद्यालयात शिक्षण घेऊन दोन-चार वर्ष
बाहेर शिक्षण घेतले आणि पुन्हा त्याच महाविद्यालयात अध्यापकाच्या नोकरीत रुजू
झालो.छत्रपती संभाजीनगरच्या जालना रोडवरील दैनिक लोकमत कार्यालयात मुख्य संपादक या
नात्याने त्यांची भेट घेण्यासाठी मी खास वेळ काढून जायचो.दैनिक लोकमतची भव्य वास्तू
! मनात यायचं ते भेटतील का ? बोलतील का ? असाही मनात विचार यायचा.त्यांच्या केबिन
समोर अनेकांची आधीच गर्दी असायची. भेटण्यासाठी त्यात बरेच कवी,साहित्यिकही असतील
असेही वाटायचे.नंबर यायचा.जाता क्षणी ते हसून स्वागत करायचे. त्यावरून असं
वाटायचं,त्यांनी आपल्याला चांगलं लक्षात ठेवलंय.बर,सध्या लेखन काय चाललंय? असही
विचारायचे. लोकमतची भव्य वास्तू ! त्यांचे मुख्य संपादकाचे पद! या साऱ्यांचा
सारासार विचार करता त्यांच्याशी काय बोलायचं होतं हे विसरूनच जायचं.मग ते बोलतं
करायचे. हळूहळू गप्पा रंगायच्या. अक्कलकाऱ्याची फुले,आणखी एक बिरबल,आसवं गाळणारी
कासव,एक पाय तळ्यात,पावसाचे पाय, शिवाची वाडी, मुंगळ्याच्या बेटावर, बाहुलीचे डोळे
यामधून त्यांच्या वाचलेल्या एखाद्या पुस्तकावर बोलन मला थोडं सोप वाटायचं.
त्यांच्या पुस्तकावर बोललो म्हणजे त्यांना आनंद वाटेल हा विचार मनात अजिबात
नव्हता.पुढे पोस्टाने त्यांच्या नावे कविता पाठवायचो. त्यावेळी दैनिक लोकमत मध्ये
औदुंबर हे कवितेचे सदर खूप प्रसिद्ध होते.ती लोकमतची रविवार पुरवणी म्हणजे काव्य
मैफिलच होती.बऱ्याच कवींना त्यात स्थान दिले जाई.त्या औदुंबर सदरामध्ये माझ्या अनेक
वेळा कविता प्रसिद्ध झाल्या.त्यामुळे माझी साहित्य जगतात ओळख झाली.महावीर जोंधळे
यांनी माझी दखल घेतली होती.सन १९९४ साली लातूर येथील अभियंता लेखक बी.एम.देशमुख
यांच्या मन पाखरू या कथासंग्रहाचे प्रकाशन होणार होते.श्री.देशमुख यांनी मला मन
पाखरू हे पुस्तक एका कार्यक्रमात दिले आणि दैनिक लोकमतसाठी परिचय लिहा असही
म्हणाले. मन पाखरू कथासंग्रह होता खरा,पण ललित लेखनाचे एक छान पुस्तकच म्हणायचे.
सुभाषिताप्रमाणे खूप खूप चांगल्या वाक्यांची पेरणी यात केलेली होती.मी त्या
पुस्तकावर परिचय लिहिला आणि दैनिक लोकमत करिता महावीर जोंधळे यांच्याकडे पाठवला.योग
असा की,त्यांच्याच हस्ते लातूरला त्याचे प्रकाशन होणार होते.त्यांनी त्याच दिवशी
दैनिक लोकमत मध्ये मी लिहिलेला परिचय छापला.मी त्या लातूरच्या पुस्तक प्रकाशनाला
जातीने हजर होतो.महावीर जोंधळे मला सोबत घेऊन जेवले. प्रकाशन सोहळ्याच्या
निमित्ताने मी लिहिलेल्या परिचयाचे कौतुकही झाले.हे सर्व आदरणीय महावीर जोंधळे
यांच्यामुळेच.१९९८ साली परळी वैजनाथ येथील ७१ व्या.अखिल भारतीय मराठी साहित्य
संमेलनात माझा पहिला कवितासंग्रह झिंदाबाद.. मुर्दाबाद प्रसिद्ध रानकवी
ना.धों.महानोर यांच्या हस्ते प्रकाशित झाला.या कवितासंग्रहासाठी महावीर जोंधळे
यांची मला पाठराखण लाभली.त्यात ते म्हणतात,शब्दांच्या माध्यमातून व्यंगात्मक टीका
टिप्पणी करून सामाजिक दंभांना वेशीवर टांगणे हा सय्यद अल्लाउद्दीन यांच्या काव्याचा
आत्मा आहे. कलावंताचा हेतू कलाकृतीत प्रांजळपणा उतरवतो.सांगण्यातील बोच त्यातील
गहनता अधिक गडद करण्यास मदत करते.ढोंगाच्या बाजारातील दंभाला उगडे... नागडे
करण्याची शक्ती झिंदाबाद मुर्दाबाद यात आहे.त्याला अंणकुचीदारपणा,टोकदारपणा
यावा.कवीच्या मनातील सल तुमची, माझी सर्वांचीच आहे...महावीर जोंधळे.ऑक्टोबर २०१५
मध्ये मुंबई साहित्य अकादेमीच्या वतीने बहुभाषिक बाल कवी संमेलनाचे आयोजन करण्यात
आले होते.मला त्याचे निमंत्रण मिळाले.ज्ञानपीठ पुरस्कार विजेते कवी,साहित्यिक
भालचंद्र नेमाडे हे या कार्यक्रमाला पूर्णवेळ उपस्थित होते.तसेच थोर बाल साहित्यिक
महावीर जोंधळे यांचीही उपस्थिती होती.त्यांच्या भेटीमुळे आभाळ ठेंगणे वाटले.माझी
पत्नी,दोन मुलं यांच्याशी मनमूराज संवाद झाला.माझ्या हंबर्डे महाविद्यालयात प्रमुख
पाहुणे म्हणून आलेले महावीर जोंधळे आणि तू मराठीत कविता लिहितोस? हा त्यांचा प्रश्न
आणि आज साहित्य अकादेमीच्या मंचावर, नवीन काय लिहितोस?असा विचारणारे महावीर
जोंधळे.खरंच एक साधा माणूस,मोठा माणूस., नवलेखकांना प्रोत्साहन देणारे थोर
साहित्यिक एवढेच मी त्यांच्याविषयी म्हणेल.....
लेखक प्रा.सय्यद अल्लाउद्दीनआष्टी
-------------------------*

0 टिप्पण्या