Ticker

6/recent/ticker-posts

कडा-धामणगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा प्रसिद्ध ; ३६ कोटी २२ लाख रु ची तरतुद

आष्टी (प्रतिनिधी) कडा - धामणगाव रस्त्यावरील रेल्वे उड्डाणपुलासाठी बांधकाम निविदा प्रसिद्ध झाली आहे.हे काम लवकरच सुरू होईल अशी अपेक्षा या मार्गावरील प्रवाशांनी व्यक्त केली आहे.अमरापूर, पाथर्डी,कडा,मिरजगाव,राशीन,बारामती या मार्गावर छेद देत कडा येथून नगर, बीड परळी रेल्वे मार्ग जातो.या रेल्वे मार्गामुळे कडा येथे सर्व वाहनांसाठी वळण रस्ता तयार करण्यात आला होता मात्र या ८०० मीटर वळण रस्त्यामुळे लोकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते.हा वळण रस्ता तयार करण्यासाठी सरकारचाही मोठा निधी खर्च झाला आहे मात्र मुळात हा वळण रस्ता सदोष असल्याने या मार्गावर अनेकदा अपघात झाले आहेत.त्यामुळे येथे रेल्वे उड्डाणपूल करण्यात यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती.सामाजिक कार्यकर्ते अनिल ढोबळे यांनी पुढाकार घेऊन ही मागणी लावून धरली होती.रेल्वे अधिकारी,आमदार , खासदार यांच्याकडे त्यांनी ही मागणी केली होती.त्याचप्रमाणे येथील व्यापारी यांनीही देखील रेल्वे उड्डाणपूलासाठी प्रयत्न सुरू ठेवले होते.या प्रयत्नांना या यश येत आमदार राम सातपुते यांच्या प्रयत्नाने या रेल्वे उड्डाणपुलसाठी ५० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता मोमीन यांनी अतिशय उत्कृष्टपणे या मार्गांचे रेखांकन केल्याने रेल्वेच्या अभियांत्रिकी विभागाने देखील त्याला मान्यता दिली.या उड्डाणपुलाची निविदा नुकतीच प्रसिद्ध झाली असून नऊ ऑगस्ट पर्यंत निविदा मागवण्यात आल्या आहेत.बांधकामासाठी ३६ कोटी २२ लाखाची तरतूद करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम जीएसटी आणि विद्युत कामासाठी राखीव असणार आहे.हे काम १८ महिने कालावधीमध्ये पूर्ण करायचे आहे त्यामुळे कदाचित सप्टेंबर पासून या कामास सुरुवात होईल अशी अपक्षा व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या