Ticker

6/recent/ticker-posts

आष्टीचे सुपुत्र डाॕ.ज्ञानदेव म्हस्के यांची कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरुपदी निवड

आष्टी (प्रतिनिधी) सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरूपदी राज्यपाल तथा कुलपती रमेश बैस यांनी गुरूवारी आष्टीचे सुपुत्र डॉ.ज्ञानदेव कुंडलिक म्हस्के यांची विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती केली आहे.डॉ.म्हस्के हे सातारा येथील डॉ.धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयांचे प्राचार्य आहेत.त्यांची नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी झाली आहे.सातारा येथे नव्याने स्थापन झालेल्या कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे प्रथम कुलगुरु म्हणून शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु प्रोफेसर डी.टी.शिर्के यांची २१ ऑक्टोंबर २०२२ च्या शासन आदेशान्वये नियुक्ती केली होती. त्यानंतर ११ ऑक्टोबर २०२३ व १३ एप्रिल २०२४ च्या मा.राज्यपालांच्या आदेशान्वये पुढील सहा-सहा महिन्यांकरिता त्यांचेकडे कुलगुरूपदाचा कार्यभार सोपविण्यात आला होता. कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरू नियुक्तीसाठी राज्यपालांनी अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉ.एस.एस.मंथा यांच्या अध्यक्षतेखाली निवड समिती गठीत केली होती. सातारा येथील रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.अनिल आप्पासाहेब पाटील,पुण्यातील भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ.शिवाजीराव कदम,उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकास चंद्र रस्तोगी तसेच त्रिपुरा विद्यापीठाचे कुलगुरु प्रा.गंगा प्रसाद प्रसाई (युजीसी प्रतिनिधी) हे 'कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलगुरु निवड समितीचे अन्य सदस्य होते. समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यानंतर राज्यपालांनी डॉ. ज्ञानदेव म्हस्के यांची निवड जाहीर केली.डॉ ज्ञानदेव म्हस्के यांनी प्राणिशास्त्र या विषयात पदव्युत्तर पदवी व पीएच.डी प्राप्त केली असून गेल्या १९ वर्षांहून अधिक काळापासून ते प्राचार्य पदावर कार्यरत आहेत. नवनियुक्त कुलगुरु म्हस्के यांचे आष्टी तालुक्यातील सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या