
जनसामान्यांचे शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न हाती घेऊन अत्यंत छोटी व्यक्ती असलेल्या
तत्कालीन जनसंघाची विचारधारा स्वीकारून समाज मनामध्ये आत्मीयता निर्माण करून
प्रस्थापित सत्ताधारी राजकारण्याच्या उरात धडकी निर्माण करणारे कार्यकर्तेच्या
सुखादुखात सामील होऊन सर्वसामान्यतुन नेतृत्वगुण शोधणारी सर्वसामान्य हे असामान्य
नेतृत्व म्हणजे लोकनेते गोपीनाथराव मुंडे साहेब होय. मराठवाडा विकास आंदोलनातून
प्रमोद महाजनांच्या विचार छायेत वावरलेले हे मराठमोळे युवक असलेले व्यक्तिमत्व
दिवसेंदिवस बहरत गेले.या आगळ्यावेगळ्या रुबाबदार व्यक्तिमत्वाविषयी कमालीचे आकर्षण
निर्माण झाले होते.प्रस्थापित काँग्रेसचे नेतृत्वाविरुद्ध " संघर्ष यात्रा " आयोजित
करून शासनाची सत्ता उलथून टाकताना केलेले परिश्रम अविरत संघर्षातून निर्माण झालेले
भाजपा-शिवसेनेचे पहिल्यांदा सत्तेवर आलेले शासन आणि त्यांचे ध्येयधोरणे यांच्या
जनसामान्यांवर चांगलाच पगडा बसला होता. लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेब हे अथांग
व्यक्तिमत्व होते.अजातशत्रू असलेल्या आणि सर्वांनाबरोबर घेऊन जाण्याची त्यांची
प्रवृत्ती होती.विरोधकांनाही हवेहवेसे वाटणारे,सर्वना आपलेसे करून घेण्याची त्यांना
विलक्षण हातोटी होती.भाजपसारखा मर्यादित पक्ष त्यांनी जनसामान्यांचा पक्ष करण्यात
त्यांचा सिंहाचा वाटा होता.जातीपातीच्या भिंती तोडताना राष्ट्रप्रेमाची विचारसरणी
त्यांनी कमी होऊ दिली नाही. परळीसारख्या नगरपरिषदमध्ये सहासहा मुस्लिम नगरसेवक
निवडून आणण्याची त्यांनी किमया केली होती.प्रखर युक्तिवाद,प्रचंड मेहनत,अविरत
चिंतन,महाराष्ट्रभर भ्रमंती,सतत संपर्क यामुळे संपूर्ण महाराष्ट्राचे नेतृत्व बनले
होते.पुढे राष्ट्रीय पातळीवरही त्यांनी आपली छाप पाडली.राजकारणामध्ये मतभेद असले
तरी मनभेद नसावेत या मताचे मुंडेसाहेब होते.२०११ मध्ये ऊसतोडणी कामगाराचा संप
झाल्यानंतर ऊसतोड मजुरांना त्यांचे कामाला किंमत मिळाली पाहिजे त्यांना प्रतिष्ठा
मिळाली पाहिजे त्यांना माणूस म्हणून वागणूक मिळाली पाहिजे.यासाठी मुंडेसाहेब यांनी
सर्वस्व पणाला लावले होते.शासनाविरुद्ध शेलक्या, मोजक्या मार्मिक शब्दात संसदीय
भाषेत उत्कृष्ट वकृत्वचा नमुना म्हणजे गोपीनाथराव मुंडेसाहेब... शेतकरी,कष्टकरी
यांना न्याय देताना त्यांनी कोणाचीही भीडभाड ठेवली नाही."अविरत संघर्ष " त्यांचे
नशिबी आला.३५ वर्षाच्या राजकीय आयुष्यापैकी केवळ साडेचार वर्षे सत्ता उपभोगली तरीही
इतर कालावधीत ही ते सिंहासारखे,वाघासारखे जगले विरोधी पक्षनेता असताना आणि नसताना
ही त्यांचेबरोबर ३० -३५ वाहनांचा ताफा बरोबर असायचा. असे हे देवगूण अंगभूत असलेले व
विरळे नेतृत्व होते. 'नाथ्रा ते दिल्ली .. हा प्रचंड लोकप्रियतेचा अथांग प्रवास...
लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या हयातीतील प्रचंड कार्यनिष्ठा, अथांग हृदयाची
व्यापकता, आत्मविश्वास,सचोटी आदीसह मूल्यांचे एकत्रित पर्यावसन होते! 'दिव्याने
दिवा पेटवावा..' त्याप्रमाणे गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या दीपगृहातून अनेक
दिपमाला सदैव पेटत राहिल्या.अनेक प्रकाश पुत्र निर्माण झाले.गोपीनाथराव मुंडेसाहेब
देशातल्या हजारो लाखो तरुणांचे प्रेरणास्त्रोत झाले.मुंडे साहेबांच्या राजकीय
व्यायाम शाळेतून बाहेर पडणारे कार्यकर्ते हे चारित्र्यवान,सुसंस्कृत आणि जबाबदार
नागरिक बनले.जसे पेरावे तसे उगवते असे आपण म्हणतो मुंडे साहेबांच्या तालमीतून
निघालेले प्रत्येक जण देशप्रेमाने भारावून निघाले.भारत देशाच्या
राजकीय,सामाजिक,सांस्कृतिक, शैक्षणिक,इतिहासामध्ये त्या काही महापुरुषांची सदैव
आठवण येते, त्यात लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचे नाव सुवर्ण अक्षराने हृदयात कोरले
जाते.गोरगरीब,दीनदलित, दुबळ्या,अनाथ,अपंग,शेतकरी, कामगार यांच्यासाठी आयुष्यभर
लढणारा नेता अशी ओळख असलेल्या मुंडेसाहेबांनी वंचित घटकांसाठी आपले आयुष्य अर्पण
केले.बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या प्रभु वैजनाथांच्या पवित्र भूमीत
मुंडेसाहेबांचे बालपण संस्कार पद्धतीने प्रारंभिक झाले त्यानंतर शिक्षणाचा
श्रीगणेशा त्यांनी मनोहर अंबानगरीच्या संत महंतांच्या मुकुंदराज नगरीमध्ये झाले आणि
स्व.प्रमोद महाजन यांच्या संयोगातून पुढे हा प्रवास पुणे आणि राज्याच्या राजकीय
इतिहासात धीर गंभीरपणे आणि तितक्यात परिपक्वतेने सुरू झाला.मागास ठरलेले
मराठवाड्याचे भूमिपुत्र म्हणून त्यांनी प्रचंड कार्य केले.हा लढा लढताना त्यांना
अनेकवेळा तुरूंगवास भोगावा लागला. शेतकऱ्यांसाठी,त्यांच्या हक्कासाठी झगडताना शेकडो
मोर्चे काढून शासनाला शेतकरी कामगार विषयी अनेक कायदे करण्यासाठी भाग पडणारा नेता
म्हणून मुंडे यांची ओळख देशाला झाली.आयुष्यभर विरोधी पक्षात राहून केवळ आणि केवळ
लोकांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुंडेसाहेबांनी आयुष्य खर्च केले.मुंडेसाहेबांनी
प्रत्येक क्षण सर्वसामान्यांसाठी व्यस्त केला. छत्रपती संभाजीनगर येथील
विद्यापीठातील उर्दू विद्यापीठाला दिलेला निधी असेल,छत्रपती संभाजीनगर येथीलच
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाविद्यालयातील वस्तीगृहाला दिलेला दोन कोटी रू.निधी
हे मुंडे साहेबांच्या समता,बंधुता आणि दूरदृष्टीचे प्रतीक होते.शिक्षण,
संस्कृती,संस्कार आदीसह विविध केंद्रांना महाराष्ट्र आणि देशांमध्ये त्यांनी दिलेला
न्याय हा आयुष्यभर स्मरणात राहील असा आहे. लोकनेते गोपीनाथराव मुंडेसाहेब हे
सर्वसामान्यांचे आधारवड होते, सावली होते.ज्या ज्या वेळेस सर्वसामान्य झोपडीतल्या
माणसावर संकटे आली,त्या त्या वेळेस गोपीनाथराव मुंडे पहिल्यांदा धावून
गेले.मुंडेसाहेब वंचित व गरिबांचे आश्रयस्थान होते आणि म्हणून ते लोकनेते
ठरले,महापुरुष झाले. परळी वैजनाथ तालुक्यातील नाथ्रा या छोट्याशा गावात जन्मलेला हा
तेजस्वी हिरा परळी आंबेजोगाई पुणे व संपूर्ण महाराष्ट्र आणि शेवटी दिल्लीच्या
तख्तावर शानदारपणे आपले कार्यकर्तृत्व करत असताना नियतीने त्यांना अकाली मुक्त
केले.गोरगरीब सर्वसामान्यांचा आश्रयदाता ठरलेले... महापुरुष. सर्वांची सावली ठरलेले
लोकनेते.. गोपीनाथराव मुंडेसाहेब हे आजही आणि भविष्यातही सर्वांसाठी जगण्याचे शक्ती
केंद्र असतीलच परंतु राजकीय सामाजिक विचारांचे स्वतः विद्यापीठ असलेले मुंडेसाहेब
ग्रामीण आणि शहरी लाखो युवकांचे प्रेरणास्थान आहेत आणि म्हणून हृदयाची व्यापकता
सर्व जाती धर्म पंथ यांना घेऊन जाणारे त्यांचे विशाल ह्रदय आहे.आपल्या सर्वांचा
अमूल्य ठेवा आहे.छत्रपती शिवाजी महाराज, म.फुले,राजर्षि शाहु महाराज डॉ.बाबासाहेब
आंबेडकर यांच्या विचारांना घेऊन प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे लोकनेते गोपीनाथराव
मुंडेसाहेब एक बहुजनांचे बहुआयामी व्यक्तिमत्व ठरले.
लोकनेता शब्दाची
मुंडेसाहेबांमुळे उंची वाढली
. ......................................
गोरगरीब
सर्वसामान्य जनतेसाठी त्यांच्या हितासाठी लढत राहून लोकशाहीच्या माध्यमातून त्यांना
हक्क प्राप्त करून देणारे गोपीनाथराव मुंडे हे अद्वितीय व्यक्तिमत्व होते. संघर्षमय
प्रवासातून त्यांनी वंचितांना न्याय मिळवून दिला झोपडीतील गरिबांच्या सरपटणारे
साहेब हे तमाम महाराष्ट्र आणि देशातील गोरगरिबांचे पालक ठरले म्हणूनच जनतेने
उत्स्फूर्त पणे दिलेली पदवी अर्थात ' लोकनेते. मुंडेसाहेबांच्या अफाट कार्य
कर्तृत्वामुळे लोकनेता या शब्दाचेच सोने झाले ' लोकनेता ' शब्द फक्त साहेबांना
शोभून दिसतो.
-------------------------------------
आज ३ जुन अर्थात लोकनेते
गोपीनाथराव मुंडेसाहेब यांच्या आज होणाऱ्या पुण्यतिथी दिनी राज्यभर अभिवादन केले
जात आहे.सर्वसामान्य माणसांच्या हृदयातून ओघळणारे अश्रू आज मोकळी वाट करून देत
आहेत.. स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडेसाहेबांना त्यांच्या पुण्यतिथी दिनी विनम्र
अभिवादन ! स्मृतीतून वेदना,वेदनेतून प्रेरणा, प्रेरणेतून चेतना,चेतनेतून निर्धार,
साहेब नाही होणार तुमच्या विचारांशी प्रतारणा ! स्व.लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे
साहेबांना विनम्र अभिवादन....
उत्तम बोडखे (उपसंपादक)
आष्टी
*************************
0 टिप्पण्या