विशेष लेख
..............
बोडखे बोडखे उत्तम


कष्टाची भाकरी गोड लागली
लुटावे कोणाला कधी
जमलेच नाही..
चेहरा आरशासारखा
स्वच्छ होता...
मुखवटा लावणे कधी
जमलेच नाही...
जे लाभले ते आनंदाने स्विकारले
कष्ट नाकारणे
कधी जमलेच नाही..
जीवन साधेसरळ आहे
भूलथापा मारणे,
खोटे बोलणे,
कोणाला फसवणे
कधी जमलेच नाही...
मोट बांधली प्रत्येकवेळी
प्रेमळ माणसांची
आजपर्यंत काही कमी पडलेच नाही.... "
'...अगदी लहानपणापासूनच संघर्षाची बीजे नसानसात पेरलेल्या आणि त्याच्यात नाविन्य न राहता तो एक जीवनाचा भाग बनून सदैव त्याची सवय लागते..तरीही अत्यंत बेधडकपणे कार्य करत प्रतिकूल परिस्थितीतून चिखलाच्या दलदलीतून सुंदर कमल पुष्प निर्माण करण्याची क्रांतिकारी किमया आष्टी शहरातील जिगरबाज राजकीय व्यक्तिमत्व माजी नगराध्यक्ष रंगनाथ धांडे यांनी यशस्वी करून दाखवली आहे. रंगनाथ गोपीनाथ धोंडे यांचा जन्म कृषी दिन दि.१ जुलै १९६३ मध्ये गरीब शेतकरी कुटुंबात झाला. प्राथमिक व शालेय शिक्षण आष्टी येथील जि.प.माध्यमिक मुलांचे हायस्कूल मध्ये झाले.आष्टीतच बी.ए.पर्यतच शिक्षण झाले.घरात अठराविश्व दारिद्र्य.अशा बिकट
परिस्थितीतही आनंदी जीवन जगणे,शाळेला दांडी मारणे, तासनतास विहिरीत पोहणे, लहानपणी दुसऱ्यांच्या झाडाचे आंबे,सिताफळ,रामफळ,लिंब, चिंचा तोडण्यापासून होळीसाठी लाकडं गोळा करणे हा आवडीचा छंद.शृंगेरीदेवीची यात्रा असो किंवा नान्नजजवळा,फक्राबादची यात्रा असो पायी जात..आणि यात्रेचा
आनंद लुटणे.दहावीपर्यंतचे शिक्षण झाल्यावर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला.कॉलेजमध्ये अकरावीला असतानाच कॉलेजचे विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून निवडून आले.
घरात ५ भाऊ,सहावी बहीण असा परिवार,४ चुलते,२० चुलत भाऊ, चुलत बहिणी असा आष्टीतील
सगळ्यात मोठा धोंडे परिवार आहे.
वैवाहिक जीवनाची सुरुवात अतिशय संघर्षमय झाली.१९८६ चा तो काळ आष्टीतील पहिला आंतरजातीय प्रेमविवाह.दोन्ही परिवार,दोन्ही समाजाचा विरोध आणि त्याला सामोरं जाणं फार कठिण होतं.लग्नानंतर दोन महिने पाषाण वीटभट्टीवर अक्षरश:
मजुरी केली पण मिळणा-या मजुरीवही स्वत: राहणे आणि सहचरिणीला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न रंगनाथ धोंडे यांनी केला.
जीवनाचा मार्ग अतिशय खडतर होता असे असताना पहिला मदतीचा हात दिला तो चंदुआण्णा हंबर्डे यांनी...
पुण्यातुन आष्टीत आणण्यास चंदुआण्णांनीच प्रयत्न केला. दहावीला उत्तम गुण घेणा-या पत्नी सौ.आशाताईस शिकवावे असा सल्ला चंदूआण्णांनी दिला आणि अक्षरशःस्वतः मोलमजुरी,हमाली
करून पत्नीस डी.एड.शिकविणारे रंगनाथ धोंडे आहेत.ख-या अर्थाने महात्मा फुले यांचा वसा व वारसा माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी चालविला असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.पुण्याहून आष्टीस येताना नगरपर्यंत आलो पण नगरहुन आष्टीला येण्यास पाच रुपये कमी पडले.नगरच्या स्टँन्डवर ओळखीच्या ब-याच लोकांना पैसे
मागीतले पण कोणी दिले नाही. ईश्वर टकले या माणसाने ती मदत केली आणि मग आम्ही आष्टीला आलोत... आजही तो क्षण आठवला तर मन गहिवरून येतं. पत्नी सौ.आशाताई धोंडे (शिंदे) जि.प.मध्ये शिक्षिका म्हणून नोकरीला लागल्यावर १९९० साली निखीलचा जन्म झाला.आता
पत्नीस नोकरी मिळाल्यानंतर किमान गरजा भागणार होत्या.
१९९२ साली स्वप्निलचा जन्म झाला.निखिलचे इंजिनियरिंग पर्यंतचे शिक्षण पुण्यात केले. स्वप्नीलचेही शिक्षण पुण्यातच झाले.स्वप्नील बीबीए झाला आहे. मोठया सुनबाई सौ.दमयंती ही बी.ई.झाली आहे.धाकट्या सुनबाई सौ.पल्लवी बी.एस्सी.पर्यंत शिकलेल्या आहेत. ती आष्टी शहराची माजी नगराध्यक्षा आहे. आज्ञाधारक मुलं,सुसंस्कारी सुना आणि दोन गोड नाती असा परिवार आहे.घरात गोकुळातील सुख आहे.
रंगनाथ धोंडे यांचा १९९२ पासुन सामाजिक,राजकीय प्रवास सुरू झाला आहे.ग्रामपंचायत सदस्य, आष्टी पंचायत समिती सदस्य ते नगरपंचायत निवडणुकीत आजपर्यत कधीच पराभव झालेला नाही.गावातील लोकांच्या गरजा भागवण्याला नेहमीच प्राधान्य दिल्यामुळे,गावातील सर्व जाती धर्माचे लोक तसेच गोरगरीब जनता सगळे अडचण आली कि केव्हाही हक्काने फोन करतात आणि रंगाआण्णा त्यांच्या मदतीला धावतात...
आज धनश्री पतसंस्थेच्या
माध्यमातून देखील एकप्रकारे
जनतेची ते सेवाच करतात.धनश्री पतसंस्थेला उत्कृष्ट कार्याबद्दल महाराष्ट्रात गौरविलेले आहे.
रंगनाथ धोंडे यांचे सामाजिक, राजकीय,धार्मिक,व्यापार,बँकींग क्षेत्रात असामान्य काम आहे.
' वृक्षमित्र' रंगनाथ धोंडे यांचे झाडांवर नितांत प्रेम आहे.दहा वर्षापूर्वी वृक्षारोपण हे सुरू केलेलं
काम आज यशस्वीरित्या पार पडलं
आहे.पोटच्या मुलांपेक्षा झाडांवर प्रेम करणारा हा वृक्षमित्र आहे.
झाडाची फांदी तोडली हळहळ करणारे ते एकमेव सामाजिक कार्यकर्ते आहेत.राजकीय प्रवासात
सरपंच,उपसरपंच,उपसभापती, आणि नगराध्यक्ष या सगळ्या यशस्वी कारकिर्दीतील यशामध्ये किंवा ज्यांच्यामुळे हे अलौकिक सामाजिक,राजकीय कार्य करता आले ते म्हणजे रंगनाथ धोंडे यांचे गाॕडफादर (मार्गदर्शक) नेतृत्व
आ.सुरेश धस यांच्या मदतीने हे शक्य झाले.अशी भावना रंगनाथ धोंडे यांची आहे.धसआण्णांनी नेहमी रंगनाथ धोंडे यांच्या कार्यकर्तृत्वाला न्याय दिला आहे. योग्य मार्गदर्शन केले.विकास कामांना नेहमी प्राधान्य दिले. पाठीवर कौतुकाची थाप दिली.आ. सुरेश धस यांच्या सहकार्याशिवाय,पाठिंब्याशिवाय आणि मार्गदर्शनाशिवाय रंगनाथ धोंडे यांचा राजकिय प्रवास यशस्वी होणे शक्य नव्हते....त्यात रंगाआण्णाचा निस्वार्थ, निर्लोभी स्वभाव,साधी राहणी, उच्च विचार, विकासाला प्राधान्य " गावाचा विकास तोच माझा विकास " ही भावना ठेवून राजकारण, समाजकारण करणारा अवलिया आहे.
आष्टी शहरातील सर्व समाजाच्या हिताचे कामे,मुलभुत आणि नागरी सुविधा देण्याचे अखंड कार्य माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे हे करीत आहेत.गेली ४० वर्षापासुन शहर व परिसरात वृक्षलागवड आणि त्याचे स्वतःचे मुलाबाळांसारखे संगोपन करण्याचं त्यांचं विशेष उल्लेखनीय आणि कौतुकास्पद कार्य आहे.आष्टी शहरातील शेतकरी,शेतमजूर, कष्टकरी,नागरिक आणि वंचित घटकांच्या जीवनाच्या उद्धारासाठी काम केले आहे.आ.सुरेश धस यांच्या राजकीय जीवनात माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचे मोठे आणि मोलाचे कार्य आहे.रंगनाथ धोंडे हे आ.धस यांचे कट्टर समर्थक आहेत. माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांना आ.सुरेश धस यांच्या राजकीय गटातील सरसेनापती म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
यशोशिखर गाठताना भक्क पाया हा आई - वडिलांचे संस्कार असतात.किंबहुना आई आणि वडिलांचा आशीर्वाद हवा तसेच पत्नी व मुलांची साथ असावी लागते.आई-वडिलांच्या कष्टाची जाणीव ठेवून कर्तज्ञतेचा भाव जपावा हे मुलतत्व अंगीकारूण जे आपली जीवनाची वाटचाल करतात ते जीवनात यशस्वी होतात.हा अलिखित संकेत आहे. अगदी याच प्रेरणेतून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत लहानाचे मोठे होत असताना मोठे ध्येय ठेवून कार्य,कर्तव्य करणारे माजी नगराध्यक्ष वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांचा ६० वर्षाचा प्रवास यशदायी,प्रेरणादायी आणि तितकाच थक्क करणारा आहे. रंगनाथ धोंडे हे आष्टी येथील अंत्यंत गरीब सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले आहेत.लहानपणापासुन कष्टमय आणि संघर्षमय जीवन जगले आहेत.आष्टीत लहानाचे मोठे होत असताना मोठे स्वप्न आणि ऊर्जा घेत आई-वडिलांच्या संस्कारावर त्यांची दमदार वाटचाल होत राहिली.प्राथमिक,शालेय, शिक्षणानंतर त्यांनी आपली महाविद्यालयाची वाटचाल आष्टीतच केल्यानंतर तत्कालीन काळात हिंदूत्ववादी चळवळीत काम करणाऱ्या चंद्रकांत हंबर्डे यांच्यासमवेत खांद्याला खांदा देत सामाजिक, राजकीय, धार्मिक कार्य केले. तत्कालीन शिवसेनेत सक्रिय राहुन कार्य केलेले आहे.
प्रतिकूल आर्थिक परिस्थितीचे भांडवल न करता केवळ जिद्द, शशी आत्मविश्वास आणि चिकाटीच्या जोरावर कार्यकर्ता म्हणून तयार होताना मोठे स्वप्न उरी बाळगले आणि ते प्रत्यक्षात आणून दाखवले.शांत,संयमी,अन् धिरोदात्त असलेले हे व्यक्तिमत्व....
धनश्री पतसंस्थेची स्थापना करुन आणि त्यांनी पतसंस्थेचे माध्यमातून गरीब व्यापारी, टपरीधारक,पत नाही पण प्रामाणिकपणा असणा-यांना कर्ज उपलब्ध करून दिले.
आ.सुरेश धस यांच्या सर्व राजकीय,आर्थिक व्यवहारांमध्ये महत्त्वाची निष्ठेने भूमिका बजावणारे रंगनाथ धोंडे यांच्या सुनबाईंच्या माध्यमातून धोंडे परिवाराला पुनश्च नगराध्यक्ष हा बहुमान मिळाल्याने त्यांच्या प्रखर निष्ठेला,सचोटीला,कष्टाला 'न्याय' मिळाला हेच खरे....
आपल्या वाढदिवसानिमित्त कोणी काय,कोणी काय,उपक्रम साजरे करतात कोणी हजारो रुपये खर्च करुन पार्ट्या करतात मात्र आष्टीचे नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांनी गेल्या पाच वर्षापासून आष्टी शहरात शेकडो झाडे लावले. उन्हाळ्यात त्या झाडांना टॕकरने पाणी घातले.ती झाडे जगवली, आता त्या झाडांसोबतच आपला वाढदिवस साजरा करतात. स्वताःच्या वाढदिवसापेक्षा झाडांचा वाढदिवस साजरा करणारा हा वृक्षमित्र आहे.धनश्री पतसंस्थेने आष्टी पाठोपाठ कडा व परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम हाती घेतला. वृक्षमित्र रंगनाथ धोंडे यांचे सामाजिक कार्य कौतुकास्पद आहे. आष्टी शहरातील धनश्री पतसंस्थेने
गेल्या आठ वर्षापासून १ जुलै रोजी वृक्ष लागवड केली जाते.आतापर्यंत जवळपास ७६० झाडे आष्टी शहरात लावून त्यांचे संगोपणही ही पतसंस्था करीत आहे.यावर्षी कृषीदिन १ जूलै रोजी आष्टी येथील धनश्री पतसंस्थेचे चेअरमन रंगनाथ धोंडे यांनी आपल्या ६० व्या. वाढदिवसानिमित्ताने ६० झाडे लावत आहेत. वृक्षारोपणासाठी धनश्री पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन एल.जी. सुरतवाले,पतसंस्थेचे कार्यकारी संचालक जितेंद्र शिंदे,रमेश बोराडे, शांतीलाल धोंडे परिश्रम घेत आहेत.आष्टी शहरात धनश्रीने मोठ्या प्रमाणावर झाडे लावली आहेत.आज ही झाडे २० ते ३० फुट उंचीची झाली आहेत.या झांडामुळे आष्टी शहराच्या वैभवात भर पडली आहे.२०१७ पासून धनश्री पतसंस्थेच्या माध्यमातून वृक्षलावगड आणि संगोपण करत आहोत. वृक्षलागवड यशस्वी करण्यासाठी रमेश बोराडे,बाळासाहेब धोंडे,सय्यद ताहेर, शिवाजी धोंडे,कैलाश धोंडे,दिपक कुलकर्णी, सुनिल पालखे,इनायत बेग,अशिष बोंदार्डे आदिनी परिश्रम घेतात. आज आष्टीचे माजी नगराध्यक्ष रंगनाथ धोंडे यांचा वाढदिवस आहे.वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा ...
-----------------------
वृक्षासोबत वाढदिवस
करणारा सामाजिक कार्यकर्ता!
------------------------
लावलेल्या झाडांसोबत आपला
व झाडांचा वाढदिवस साजरा करणारा हा सामाजिक कार्यकर्ता आहे.गेल्या काही वर्षापासून स्वत:चा वाढदिवस साजरा न करता आपण लावलेल्या झाडांचा वाढदिवस साजरा करतो त्यामुळे आपल्याला समाधान लाभते.असे खुद्द रंगनाथ धोंडे यांना वाटते.
----उत्तम बोडखे
(उपसंपादक)
*******************
0 टिप्पण्या