


आष्टी (प्रतिनिधी)
भारतीय माणूस हा प्रचंड कुटुंबप्रिय आहे.श्रीराम हा भारतीयांच्या प्राचीन कौटुंबिक मूल्यव्यवस्थेचा आदर्शपुरुष आहे.आदर्श विद्यार्थी,कर्तबगार मुलगा,वडिलांनी दिलेल्या वचनाचा भार स्वतःच्या अंगावर घेणारा,सावत्र आईचा विपरीत अनुभव येऊनही तिच्याच मुलावर विश्वास ठेवू शकणारा, कौटुंबिक कलह कोणतीही किंमत देऊन टाळणारा श्रीराम हा त्या काळातल्या एकत्र कुटुंबव्यवस्थेत वारंवार उल्लेखलेला,उदाहरण दिला गेलेला आणि मग पुजला गेलेला महापुरुष आहे.समाज हे कुटुंबाचेच एक विस्तारित रूप असते.पूर्वीच्या काळी असायचे तसे शंभर शंभर लोकांचे कुटुंब हा स्वतःच एक समाज असायचा अशा कुटुंबात प्रत्येक व्यक्ती बुद्धीने,स्वभावाने, प्रवृत्तीने सारखी नसायची.पण तरीही अशा कुटुंबाला एकत्र ठेवणारा एक धागा,एक आधार हवा असायचा. सगळे कुटुंब त्या व्यक्तिभोवती विणले जायचे.सगळा अधिकार त्याच व्यक्तीला असायचा पण त्याने सगळ्यांना न्याय द्यावा,सगळ्यांना सांभाळून घ्यावे,गरज पडल्यास सर्वोच्च त्यागही करावा ही अपेक्षा असायची.भारतीयांच्या मनात असलेला प्रभू श्रीराम हे त्या अपेक्षांचे मूर्त रूप आहे. कर्तृत्ववान तरीही शांत, शक्तिशाली तरीही दयाळू, अभिमानी तरीही क्षमाशील,सत्ताधीश तरीही निःसंग असलेला श्रीमंत योगी भारतीयांना नेहमीच आवडतो. भोगाचा कोणताही आरोप स्वतःवर होऊ न देणारा प्रभू श्रीराम हा कुटुंबवत्सल भारतीयांचा आवडता देव झाला नसता तरच नवल.
श्रीकृष्ण भारतीय राजकारणाचा अर्क असेल तर श्रीराम भारतीय कुटुंबव्यवस्थेचा आदर्श आहे.प्रभू श्रीराम खरंच झाले होते का, झालेच असतील तर आपल्याला माहीत आहेत तसेच होते का, रामायणातील कोणता भाग मूळचा आहे, कोणता प्रक्षिप्त आहे, त्याकाळातील मूल्यव्यवस्थेत योग्य समजल्या गेलेल्या अनेक घटना आज अनुकरणीय आहेत का ? हे सगळे वेगळे प्रश्न आहेत आहेत आणि त्यांची वेगवेगळी उत्तरंही आहेत.आजच्या मूल्यव्यवस्थेशी मेळ खाणारी आणि समाजाला पुढे नेणारी उत्तरं समाज शोधतो आणि स्वतःला सुधारून घेतो.अर्वाचीन काळापासून उन्नत होत गेलेल्या भारतीय हिंदू समाजाचे हेच वैशिष्ट्य आहे.मात्र त्याचबरोबर प्रभू श्रीराम हा त्यांच्या सांस्कृतिक जीवनात वाहत आलेला,त्यांना जोडणारा,त्यांना एक कुटुंब म्हणून बांधून घेणारा धागा आहे. रामाचा अपमान हा म्हणूनच भारतीय समाजाचा अपमान आहे. रामाचा सन्मान हा म्हणूनच भारतीय समाजाचा सन्मान आहे.
स्वतःच्या कुटुंबापासून सुरू होऊन " वसुधैव कुटुम्बकम् " साधू पाहणाऱ्या भारतीयांचा प्रभू श्रीराम हा कौटुंबिक मानबिंदू आहे.
0 टिप्पण्या