Ticker

6/recent/ticker-posts

छत्रपती शिवाजी महाराजांनी निष्ठावंत मावळ्यांच्या सहकार्याने स्वराज्य निर्माण केले .............. ह.भ.प.सोनालीदीदी करपे यांचे प्रतिपादन

उत्तम बोडखे,आष्टी. --------------------------- अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये द-या खोऱ्यात राहून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या निष्ठावंत मावळ्यांच्या जीवावर स्वराज्याची स्थापना केली असे प्रतिपादन भागवताचार्या ह.भ.प. सोनालीदीदी करपे यांनी केले. आष्टी येथील प्रा.अशोक डोके यांनी छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या सप्ताहामध्ये कीर्तन सेवा देताना त्या बोलत होत्या.महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त आष्टी शहरात ह.भ.प.अशोक डोके सर यांंच्या नियोजनातुन आणि संयोजनातुन दि.१२ ते १९ फेब्रुवारी या कालावधीत कीर्तन महोत्सव आयोजीत करण्यात आलेला आहे. या सप्ताहातील व्दितीय पुष्प गुंफताना त्या बोलत होत्या.यावेळी माजी आ.साहेबराव दरेकर,माजी सरपंच आदिकाताई लोखंडे, दिनकरराव तांदळे महाराज,सुरेश बक्षी,डाॕ.सुभाष गदादे, जेष्ठ पत्रकार उत्तम बोडखे,नवनाथ पानतावणे,पवार सर,सुनिता पोकळे, शिवाजी थोरवे,इंजि. पी.बी.बोडखे,सानप सर,मिसाळ सर,रामराव झांजे,ॲड. मधुकर झांजे,हौसराव आजबे,ह.भ.प. तुकाराम भोसले,बबन बळे महाराज,नानासाहेब तवले आदि राजकीय, सामाजिक,धार्मिक क्षेत्रातील मान्यवर मोठ्यासंख्येने उपस्थित होते.ह.भ.प. सोनालीदीदी पुढे म्हणाल्याकी,आपल्या बालपणी चहू बाजूने आदिलशाही,मोगल शाही,निजामशाही आणि कुतुबशाही राजवटींचा अंमल असताना हिंदवी स्वराज्याचे स्वप्न घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांचेबरोबर असलेल्या निष्ठावंत, निर्मळ मनाच्या आणि नैतिकता सांभाळणाऱ्या मावळ्यांच्या जीवावर हिंदवी स्वराज्याची निर्मिती केली. कारण पूर्वीच्या काळी समाजामध्ये नीतिमान, सत्शील,सज्जन माणसांची कमतरता नव्हती. महाराष्ट्रातील द-या खोऱ्यात अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये कोणत्याही प्रकारची साधन सुविधा,प्रसिद्धी माध्यमे किंवा संवादाची माध्यमे नसताना छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य संस्थापनेचे महान कार्य करून स्वराज्याची निर्मिती केली आहे. आजच्या काळात स्वराज्य निर्माण होऊ शकणार नाही कारण पूर्वीच्या सारखी आज नीतिमत्ता,नैतिकता, सोज्वळपणा,सत्यता अंगी कारणारे लोक आज राहिले नाहीत.पूर्वीच्या काळी घरातील संपत्ती ही उतरंडीमध्ये सुरक्षित राहत होती आज कपाटामध्ये असून देखील ती सुरक्षित नाही.अशी अवस्था असून दिवसेंदिवस समाजातील एकमेकांविषयी असलेली निष्ठा संपुष्टात येत असल्याचे दिसून येत आहे असे सांगून त्या पुढे म्हणाल्या की,राष्ट्राची मानहानी करणारा प्रमुख घटक म्हणजे कपटी माणसे असून या माणसांच्या ओठात एक आणि पोटात एक असते अशा व्यक्तींपासून सावध राहण्याची गरज असून समाजामध्ये निर्मळ परमार्थ करणाऱ्या मन गंगेच्या पाण्यासारखे स्वच्छ असणाऱ्या माणसांची गरज निर्माण झालेली आहे.छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी साम्राज्य निर्माण केले परंतु या साम्राज्याला त्यांनी शिवशाही हे नाव दिले नाही त्याऐवजी त्यांनी या साम्राज्यास स्वराज्य असे नाव दिले कारण स्वराज्यामध्ये प्रत्येकाला स्वतःचे मत मांडण्याचा अधिकार असतो.न्याय मागण्याचा अधिकार असतो म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या या साम्राज्याला स्वराज्य असे नाव दिले.या कीर्तन महोत्सवामध्ये मोठ्या प्रमाणावर उपस्थित असलेल्या महिला वर्गास उद्देशून त्या म्हणाल्या माता भगिनींनो तुमची ताकद फार मोठी असून तुम्ही स्वतःला कमकुवत समजू नका तुमच्यामध्ये हजारो गुण समाविष्ट असून तुम्ही साक्षात शक्ती स्वरूप आहात पृथ्वीमध्ये क्षमा हा गुण असेल ज्यावेळी तुम्ही हाती पुस्तक घेता यावेळी तुम्ही सरस्वती असता घरात कोणी आजारी असताना त्याची सेवा करताना तुम्ही रेणुका असतात विवाह बंधनानंतर गृहप्रवेश करून तुम्ही दुसऱ्याच्या घरी जातात तेव्हा लक्ष्मी असतात त्या ठिकाणी रुचकर स्वादिष्ट अन्न तयार करून खाऊ घालताना तुम्ही अन्नपूर्णा असतात त्याच घरावर तुम्ही संकट आले असता तुम्ही दुर्गेचे रूप घेऊन या संकटाचा सामना करत असता त्यामुळे तुम्ही कुणी सामान्य नसून तुम्ही स्वतःला ओळखा एका स्त्रीने स्वतःला ओळखले आणि इंग्रजांविरुद्ध एल्गार केला काळजाच्या तुकड्याला पाठीवर बांधून मेरी झाशी नाही दुंगी असे म्हणत प्रत्यक्ष रणांगणावर इंग्रजांशी लढली सर्व नातेवाईक धारातीर्थी पडले असता स्वतःची ताकद ओळखून ती लढली पण ती शरण गेली नाही आपलं लेकरू गेले तरी सर्व समाज आपले लेकरू आहे असं समजून मातृत्वाची भावना जनतेसाठी अर्पण करणारी महान योद्धा म्हणून झाशी राणी लक्ष्मीबाई हिचा इतिहास अजरामर राहणार आहे असे सांगून आपल्या महाराष्ट्र राज्यातील असलेल्या पूर्वीच्या आष्टी तालुक्यात असणारे गाव चोंडी या ठिकाणी जन्म घेणारी अहिल्याबाई हिने इंदोर या ठिकाणाहून भगवान शंकराच्या चरणी लीन होऊन राज्यकारभार करून दाखवताना दातृत्वाचा, कर्तृत्वाचा,भक्तीचा आणि अध्यात्माचा आदर्श घडवला आहे.. असे सांगून प्रत्येक आईने आपली जबाबदारी ओळखली पाहिजे ज्याप्रमाणे कुंभार दादा मातीला आकार देऊन मातीच्या गोळ्यातून कलाकृती तयार करतो त्याप्रमाणेच प्रत्येक आईने आपल्या मांसाच्या गोळ्याला आकार देण्याचे संस्कार देण्याचे काम केले पाहिजे.. एक वेळ कुंभार दादा चुकला तरी चालेल परंतु आईने संस्कार आणि आकार देताना काही चुका केल्या तर अनर्थ ओढवणार आहे असे सांगताना त्या म्हणाले की आईने योग्य घडवले तर तो तरुण देशाची ताकद होतो परंतु आईकडून चुकीचे संस्कार झाले तर तो तरूण संस्कृतीला मातीत घालतो.. याची जाणीव ठेवावी असे भावनिक आवाहन त्यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त सप्ताहाचे आयोजन करणाऱ्या प्राध्यापक अशोक डोके यांनी पत्नी आजारी असताना देखील या सप्ताहाच्या निमित्ताने परमार्थ सुरू ठेवला आहे ते या ठिकाणी आज प्रत्यक्ष हजर नसले तरी त्यांच्या मित्रमंडळींनी त्यांची उणीव भासू न देता हा पारमार्थिक उपक्रम कोणताही अडथळा येऊ न देता सुरू ठेवला आहे ही विशेष कौतुकाची बाब असल्याचेही त्यांनी शेवटी सांगितले. *चौकट* ------------- मंदिरातील देव ज्यांच्यामुळे टिकला ते छत्रपती शिवाजी महाराज होते ------------------------------ सती,संत आणि शुर या घटकांवर देश घडतो.संतानी संस्कृती सांभाळायची असते. संतानी समाजाला चांगले विचार द्यायचे असतात. संत हे सर्वसामान्यांचे दिशादर्शक आणि मार्गदर्शन असतात. सेवा,श्रध्दा व समर्पण या तीन गोष्टीने पतिव्रता धर्म सांभाळला जातो.काम, वासना जळाली की मगच राम जागा होतो.सद्संग , संतसहवासाने ईश्वर प्राप्ती होत असते.जगदंब जगदंब... हे छत्रपती शिवाजी महाराज यांंच्या ओठावर सतत नाव होते. शिवाजी महाराज प्रत्येक मोहिमेवर जाताना देवाचे नाव घेत होते.हर हर महादेव म्हणत होते.छत्रपती शिवाजी महाराज देव होते की नव्हते हा प्रश्न पुढचा आहे परंतु मंदिरातील देव ज्यांच्यामुळे टिकला ते छत्रपती शिवाजी महाराज होते.हे लक्षात घ्यावे असेही प्रतिपादन कल्याणस्वामी संस्थानच्या अध्यक्षा भागवताचार्या ह.भ.प. सोनालीदिदि करपे महाराज यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या