Ticker

6/recent/ticker-posts

विशेष लेख ------------------ राजेंद्र लाड,आष्टी ---------------------- एक सुज्ञ मतदार व्हा.. --------------------------------------- शाळेच्या पहिल्या दिवसापासून भारत माझा देश आहे, हे वाक्य आपण म्हणत असतो. पण जसे जसे आपण शाळेतून कॉलेज मध्ये जातो अन नंतर रोजच्या जिवनात पाऊल ठेवतो, तस तसे आपण हे वाक्य विसरत जातो. शाळेत असतांना नागरिक शास्त्राच्या पुस्तकात आपण भारत हे सार्वभौम, समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही प्रजासत्ताक आहे असे वाचत असतो, परंतु शाळा संपून महाविद्यालयात गेल्या नंतर अन मग नोकरी करु लागल्यावर मात्र हे सर्व शब्द आपण विसरुन जातो. शाळा, महाविद्यालयात असतांना स्काऊट गाईडस्,राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना अश्या उपक्रमांच्या माध्यमातून देशसेवेसाठी, समाजकार्यासाठी विद्यार्थ्यांच्या मनाची बैठक तयार केली जाते पण पुढे जिवनातील वैयक्तीक, कौटुंबिक गरजा भागवतांना सार्वजनिक जिवनातील काही जबाबदार्‍या आपणाकडुन दुर्लक्षित होतात हे नक्की.तसे नसते तर, लहानपणी अगदी छाती पुढे काढुन म्हटलेल्या बलसागर भारत होवो, विश्वात शोभुनी राहो. ह्या ओळींना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी आपण काय करतो हा विचार जर कधी मनात आला तर क्षणभर का होईना आपला भ्रमनिरास होतोच. कुठल्याही नैसर्गिक आपत्तीच्या वेळी देशप्रेमाचा पूर येणार्‍या आपल्या देशात, रोज असे कितीतरी प्रसंग असतात कि जिकडे आपण लक्ष द्यावे असे आपल्याला वाटत नाही. एक ठराविक चाकोरिबद्ध जिवन जगत असतांना, काही गोष्टी दुसऱ्यांनेच करायच्या असतात हे आपल्या मनावर पक्के बिंबवले गेलेले असते किंवा बिंबवून घेतले गेलेले असते. काही ही घडले कि सरकारला काही कळत नाही. असे जाहीर करुन आपण आपले काम करायला जुंपुन घेतो. जन्माच्या नोंदी पासुन विवाहाच्या नोंदीपर्यंत तसेच मृत्युच्या नोंदी पर्यंत वेगवेगळ्या टप्प्यांवर नेहमीच सरकारी यंत्रणेशी आपला संपर्क येतो. पाऊस कमी झाला किंवा जास्त झाला, रस्ते उखडले, वाहतुक बंद पडली, संप झाला, मोर्चे निघाले,उन्हाळ्यातील भारनियमनाने जिवाची लाही झाली,रोगाची साथ आली, पेट्रोलची भाववाढ झाली, रेशनकार्ड वर अन्यधान्याची टंचाई जाणवू लागली, अशा सामुदायीक अडचणीच्या प्रसंगी तर सरकारला दोष देण्याचा सामुदायीक कार्यक्रम होतोच पण बस स्टॅन्डवर वेळेत बस मिळाली नाही, रिक्षावाल्याने भाडे जास्त घेतले, टीव्हीवरील आवडत्या चित्रपटाच्यावेळी लाईट गेली,मुलाला शाळेला प्रवेश मिळाला नाही, ट्रॅफिक जाम झाले इत्यादी रोजच्या घटनांच्या वेळी प्रत्येक जण सरकारच्या यंत्रणेला दोष देत असतो.राजकारणी,प्रशासकीय अधिकारी वाईट आहेत असे समजणे ही एक फॅशनच झालीय पण त्यात काम करणारे लोक ही आपल्यासारखे हाडामासाचे गोळेच असतात हे आपण सोयीस्कर विसरतो. पण, सरकार म्हणजे कोण ? हा प्रश्न एक वेळ आपण स्वतःला विचारुन बघतो का ? सरकार वाईट म्हणजे नेमके कोण वाईट आहे हा प्रश्न स्वतःला विचारला तर येणारे उत्तर बघुन आपणच आपल्या नजरेतून उतरुन जावु असे वाटते की काय अशी ही शंका असते. हे सरकार कोण आहे अन ते कसे काम करते हे शाळेत आपण शिकतो. पण नंतर, आपण ही त्याचाच एक भाग आहोत, नव्हे सरकार बनवणे हा आपला एक हक्क अन अधिकार आहे, हे मात्र विसरुन जातो.आपले सरकार आपण्च बनवण्याचा हक्क मिळविण्यासाठी आपले पुर्वज हजारो वर्षे परकीयांशी लढले हे ही आपण विसरले जातो. भारतात राजकीय यंत्रणा सर्वात शक्तीशाली आहे, अन त्या खालोखाल प्रशासकीय यंत्रणा.या दोन यंत्रणाच सरकार चालवतात.अजुन एक महत्वाचा घटक म्हणजे न्याय व्यवस्था. सुदैवाने भारतीय न्यायालये अजुनही निष्पक्ष अन निस्पृह आहेत. अन म्हणुणच सरकार वर अंकुश ठेवण्याचे काम ते करु शकतात. लोकशाहीचा चौथा खांब म्हणवली जाणारी वृत्तपत्रे अजूनही चांगल्या - वाईट गोष्टींची जाणिव करुन देतात. सरकार मध्ये सामील व्हायचे असतील तर ढोबळ मानाने दोन मार्ग आहेत.एक म्हणजे प्रशासकीय यंत्रणेत सामील होणे. त्यासाठी स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातुन निवड व्हावी लागते. शहरी भागातील विद्यार्थ्यांना याबाबत बर्‍यापैकी माहीती मिळते. पण ग्रामीण भागातील शाळा, महाविद्यालयात स्पर्धा परिक्षांबाबत फार कमी माहिती दिली जाते. अन मग शहरात येऊन खाजगी शिकवण्या लावण्या इतपत मध्यमवर्गीय अन शेतकरी लोकांकडे ऐपत नसते. तरीही सरकारी सेवेत ग्रामीण भागातील मुले जास्त असतात कारण शहरी विद्यार्थ्याना कमी पगाराची सरकारी नोकरी करण्यापेक्षा त्यांची मोठ्या पगाराच्या खाजगी नोकरीलाच पसंती असते. याही पलिकडे सरकार म्हणजे काय हे ग्रामीण जनतेला जितके जास्त माहीती असते तितकी माहीती शहरी मुलांकडे नसती. अन म्हणुनच कदाचित शहरी लोक, विद्यार्थी सरकार बद्दल उदासीन असतात.दुसरा मार्ग असतो तो राजकीय यंत्रणेत शिरकाव करण्याचा. ग्रामपंचायती, पंचायत समित्या, कृषी उत्पन्न बाजर समित्या, विविध कार्यकारी सेवा संस्था, जिल्हा परिषदा, जिल्हा नियोजन मंडळे, वैधानिक विकास मंडळे, स्वतंत्र कारभार असणारी महामंडळे,विधानसभा,विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा अश्या चढत्या मांडणीत शिरकाव करणे दिसते तितके सोपे नाही. सत्तेच्या खेळात आपण कुठे ? असा प्रश्न सामान्य माणसाला पडणे सहाजिकच आहे. अन म्हणुनच त्याच्यांसाठी हा खुपच त्रासदायक मार्ग आहे असे त्यांचे मत बनून जाते. स्वातंत्र्य चळवळीच्या काळात किंवा त्यानंतर ची दोन तीन दशके मुल्यांवर आधारीत राजकारण असल्याने प्रामाणिकपणे काम करणार्‍या कार्यकर्त्याला किंमत होती. पण आता निवडणुकांचे निकष बदलत चालल्याने, राजकारणात पाय रोवणे ही सामान्य माणसाच्या आवाक्याबाहेरची गोष्ट झाली आहे. पैसा अन मनगटशाहीच्या जोरावरच निवडणुका लढवल्या जात आहेत. काही सन्माननीय अपवाद अजुनही शिल्लक आहेत. सामान्य माणुस हे सगळे उघड्या डोळ्यांनी पाहत असतो, पण तरीही, राजकीय नेते निवडण्याच्या वेळी मात्र ह्या सर्व बाबी विसरुन जातो अन नेमके मतदानाच्या दिवशी सुट्टी मिळुनही ती सुट्टी मौज करायला वापरतो. अन पुन्हा पुढील पाच वर्षे सरकार नामक संस्थेला वा निवडुन आलेल्या व्यक्तीला वाईट ठरवत असतो. पण खरे वाईट तर आपणच असतो कारण, सरकार निवडण्याचा आपल्याला अधिकार अन संधी मिळुनही आपण त्याचा वापर करत नसतो. मग इतरांना अन विषेशतः निवडुन आलेल्या लोकांना दोष देण्याचा अधिकार आपल्याला आजिबातच नसतो. एकीकडे महासत्ता बनण्याची स्वप्ने पाहणार्‍या देशात, स्वातंत्र्याला ७५ वर्षे होऊनही आपल्या जनतेच्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या प्राथमिक गरजा पुर्ण न होऊ शकण्याचे कारण कुठेतरी सामान्य माणासाचा सरकारी यंत्रणेवर वाढत चाललेला अविश्वास हेच आहे. एकाच देशात एकीकडे पंचतारांकित वसाहती आहेत तर दुसरीकडे एक वेळ अन्न मिळणे हीच 'पंचतारांकित' सोय वाटणार्‍या वाड्या वस्त्या आहेत. श्रीमंत अन गरीब ह्यांतील दरी रुंदावत आहे. जाती धर्माच्या नावावर दुफळी असलेल्या देशात 'आहे रे ' अन ' नाही रे ' वर्गातील वाढता द्वेष ही चिंतेची बाब आहे. अन हा द्वेश रोजच्या जिवनातील घटनांमधुन अनुभवायला येतो आहे. उच्चशिक्षित, नोकरीपेशा करणार्‍या लोकांना ह्या विषमतेचे अजुनच भयानक दर्शन घडते. परदेशात कामानिमित्त किंवा शिक्षणानिमित्त राहताना तसेच प्रवास करतांना तेथील सार्वजनीक स्वच्छता, कायदा सुव्यवस्था, आरोग्यसेवा, पायाभुत सुविधा पाहुण तोडात बोटे घातले जाते.आपल्याकडे असे का नाही हा प्रश्नही मनात येतो. पण हे असे आपणाकडे ही करता येइल का ? असा विचार मात्र फार कमी लोक करतात अन तो विचार प्रत्यक्षात आणणारे तर त्यापेक्षाही कमी असतात. केवळ असा विचार करुन अश्रु ढाळणारे ही फार असतात. पण, मी एक सामान्य माणुस अन एकटा सामान्य माणुस काय करु शकतो ? असा विचार करुन तो स्वतःचेच सांत्वन करुन घेतो. हे थांबायलाच हवे. आपल्या देशातील व्यवस्था नियमित करणे हे सामान्य माणसाने मनावर घ्यायलाच हवे आहे. ती व्यवस्था बदलवुन नवी क्रांती आणणारे गट देखील ह्या देशात आहेत. अन क्रांतीच्या नावाखाली हे नक्षलवादी परकीय शक्तींच्या हातातील बाहुले बनलेले आहेत. स्वातंत्र्यानंतर देशाने केलेली प्रगती पाहता, सुरुवातीला सामान्य माणसाचा ह्या देशातील राजकारण्यांवर अन प्रशासनावर प्रचंड विश्वास दिसून येत होता. नेत्यांच्या हाकेला ओ देणारे कार्यकर्त्यांचे प्रमाण प्रचंड होते. कालांतराने ह्यातील काही संकुचित विचारांचे लोक पुढे नेते झाले, पण प्रवृत्ती बदलली अन कंत्राटी कार्यकर्ते उदयाला आले.मोठ्या नेत्यांची मुले, मुली, पाहुणे च पुन्हा सत्तास्थानी दिसु लागले अन जनमाणसांत नेत्यांबद्दल आदर नाहीसा होऊ लागला. ज्या नेत्यांनी पुर्ण समाजाचे नेतृत्व करणे अपेक्षित होते, ते फक्त विशिष्ठ जात, धर्म, गट,समुहाचे अन बहुतेकदा हितसबंधियांचे अन नातेवाईकांचेच कल्याण करु लागले. सामान्य माणसाला राजकारणाची किळस येऊ लागली. राजकीय गुंडगिरी सुरु झाली. हे थांबले पाहिजे. पुर्वीचा विश्वास पुन्हा एकदा जागवला गेला पाहिजे. यासाठी सामान्य माणसाने राजकीय अन प्रशासकीय चौकटीत शिरकाव केलाच पाहिजे. राजकारण वाईट म्हणुन चालणार नाही, राजकारणातील कुप्रवृतीं विरुद्ध लढा उभारला पाहिजे. अन हे सगळे ' दुसर्‍याने ' नाही तर आपण स्वतःच केले पाहिजे. हे काम फार अवघड नाही मुळीच.परक्या इंग्रजांविरुद्ध लढा देवून आपल्या पुर्वजांनी हे काम अशक्य नसते हे सिद्ध करुन दाखवले आहेच. यासाठी भगतसिंगच जन्माला यावा असे नाही. प्रशासनात अन राजकीय व्यवस्थेत जाणार्‍या लोकांवर अंकुश ठेवणे तसे सोपे आहे. आपल्या सभोवतालची जी तरुण मंडळी विकासाची दृष्टी असणारी आहेत,सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणारी आहेत, ते राजकारणात, प्रशासनात जातील हे जरी आपण पाहिले तरी खुप झाले.आपल्या आसपास च्या एका हुशार, गुणी मुलाला प्रशासकीय सेवेत जाण्यास प्रोत्साहन देणे किंवा गावातील योग्य तरुण कार्यकर्त्याला स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत एक मत देऊनही हे काम करता येईल. माहितीच्या अधिकाराने सध्याच्या सत्ताधारी, प्रशासकीय यंत्रणेवर अंकुश ठेवता येईल.अन अशी खुप उदाहरणे आजुबाजुला आहेत. फक्त त्यापासून योग्य प्रेरणा घेणे अन आपले एक पाऊल पुढे टाकणे, हेच फक्त गरजेचे आहे.व्यवस्थेवरचा विश्वास दृढ करुया अन त्याचे पहिले पाऊल म्हणुन येत्या लोकसभा निवडणूकीत सुयोग्य उमेदवाराला मतदान करुन ह्या शुभ कार्याचा श्रीगणेशा करुयात. चला तर मग एक सुज्ञ मतदार होवूयात...

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या