Ticker

6/recent/ticker-posts

देशाच्या सीमेवर रक्षण करणारे जवान आणि ग्रामीण भागात कष्ट करणारी महिला या दोन घटकांमुळे भारत देश टिकून आहे *----आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील

उत्तमराव बोडखे आष्टी, ----------------- आमदार,खासदार यांच्या भरवशावर गावे सुधारणार नाही. गावपातळीवर गाव ग्रामस्थच सुधारु शकतात.गावची स्वच्छता ठेवा,वृध्दांना सांभाळा ते पुण्याचे व महत्त्वाचे काम आहे.आपल्या गावात एखादा माणुस उपाशी झोपणार असेल तर त्या गावच्या सरपंचाला झोप आली नाही पाहिजे असा सरपंच असला पाहिजे.भारत देशाचे सीमेवरील अहोरात्र विपरीत परिस्थितीत डोळ्यात तेल घालून स्वतःचा जीव धोक्यात घालून देशाचे रक्षण करणारे जवान आणि ग्रामीण भागामध्ये सतत घाम गाळणारी काबाडकष्ट करणारी महिला या दोन घटकांमुळे आपला भारत देश टिकून आहे असे प्रतिपादन छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आदर्श गाव पाटोदा ग्रामपंचायतचे सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी केले. आष्टी तालुक्यातील बेलगाव येथे स्व.कॉम्रेड नानासाहेब पोकळे आणि त्यांच्या पत्नी स्व.सत्यभामा नानासाहेब पोकळे यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त आयोजित व्याख्यानामध्ये ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आष्टी विधानसभा मतदार संघाचे माजी आ.साहेबराव दरेकर हे होते.यावेळी व्यासपीठावर बीड जि.प.चे माजी सदस्य डॉ.मधुकर हंबर्डे,पंचायत समितीचे चेअरमन माजी उपसभापती आदिनाथ सानप,बलभीम सुंबरे,नामदेव राऊत,रामराव झांजे,जेष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,उत्तम बोडखे,विष्णुपंत वायभासे,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुखलाल मुथा, संजयशेठ मेहेर,संतोषशेठ मेहेर, चेअरमन बाळासाहेब शिंदे,प्रा. सुभाष रासकर,पोपटराव घुले, नवनाथ विधाते,गो.बा.सायकड , तालुका कृषी अधिकारी गोरख तरटे,अशोक कोंडे,निळकंठ खेडकर,सरपंच तात्यासाहेब शिंदे, उपसरपंच सतीष पोकळे,प्रविण वारे,अमोल जगताप आदि उपस्थित होते. पुढे बोलताना भास्कर पेरे पाटील यांनी अत्यंत सूक्ष्म पद्धतीने ग्रामीण भागातील ग्रामपंचायतच्या कारभारावर विश्लेषण करताना सोपेसोपे उदाहरणे देऊन उपस्थितांची मने जिंकली,पेरे पाटील म्हणाले की,मी अत्यंत विपरीत परिस्थितीमध्ये जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण घेतलं आहे.राजकारण आणि समाजकारण हा माझा विषय नव्हता परंतु योगायोगाने राजकारणामध्ये आलो. सद्यस्थितीतील युवकांनी विशिष्ट ध्येय ठेवून राजकारणात यावे आणि माझ्या गावासाठी मी काय करू शकतो ? याचा विचार करून अभ्यास करून सरपंच व्हावे कोणी गावात आपले पाहुणेरावळे जास्त आहेत म्हणून सरपंच होतो. कोणी भरपूर पैसा आहे म्हणून सरपंच होतो परंतु सरपंच कशासाठी व्हायचे ? हे जर माहीत नसेल तर काही उपयोग होत नाही.वास्तविक पाहता सरपंचपद हे अत्यंत पुण्यकर्म करण्याचे काम आहे.गावातील आरोग्य,स्वच्छता,प्रदूषण,शुध्द पाणी याबरोबरच अनेक सुखसोयी यावर सरपंचांना फार मोठे काम करता येते,सध्याचे आयुष्यमान ७० वर्षाचे आहे परंतु चांगला उद्देश ठेवून सरपंचांनी काम केल्यास नागरिकांचे आयुष्य १०० वर्षे होऊ शकते असा उद्देश ठेवून ग्रामपंचायतींनी आपला कारभार केला पाहिजे.शासनाच्या शेकडो योजना आहेत.त्यांचा अभ्यास करून जास्तीत जास्त योजनांचा गावातील लाभार्थ्यांना लाभ मिळवून देणे हे सरपंचाचे प्रथम कर्तव्य आहे आणि गावातला कर हा गावातच खर्चायचा असल्यामुळे चांगल्या चांगल्या सुखसुविधा निर्माण करून गावातला कर जमा केला पाहिजे.संत गाडगेबाबा आणि संत तुकडोजी महाराज यांनी जे संदेश दिलेले आहेत त्याप्रमाणे आपण आपले काम करावे आपण चांगले काम करावे.लोक आपोआप चांगले काम करतील या ध्येयाने प्रेरित होऊन सरपंचांनी काम केलं पाहिजे.गावातील नागरिकांसाठी स्वच्छ शुद्ध पर्यावरण निर्माण करणे यासाठी एका माणसासाठी चार झाडे लावली पाहिजेत बेलगावच्या परिसरामध्ये किमान ४० हजार झाडे लावता येतील एवढे क्षेत्र उपलब्ध असल्यासारखे दिसून येत आहे. या ठिकाणी चिकू,आंबा, पेरू,जांभूळ अशा प्रकारची झाडे लावावीत या वृक्ष लागवडीसाठी .. संवर्धनासाठी शासन पैसा देत आहे.फळे मात्र आपण खाणार आहोत परंतु याचा कोणीही विचार करत नाही. या झाडांची फळे आपलीच पोरेबाळे खाणार असल्यामुळे झाडांची लागवड ही निश्चितपणे महत्त्वाची आहे असे सांगून बेलगाव हे स्व.नानासाहेब पोकळे आणि त्यांच्या पत्नी सत्यभामा पोकळे यांनी आपले मुलेबाळे शिक्षित होण्याकडे लक्ष दिले तसेच त्यांच्या बरोबरीच्या मुलांना आणि या गावावर अत्यंत चांगले संस्कार केल्यामुळेच या गावात चांगले अधिकारी निर्माण झाले." शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी " हे इथे सिद्ध झालेले आहे. आमच्या पाटोदा या गावातील नागरिकांकडून आम्ही दरवर्षी चार हजार रुपये कर घेतो आणि हा कर वर्षाच्या सुरुवातीपासून घेतो.या चार हजार रुपयांमध्ये आम्ही शेतकऱ्यांची शेतजमीन ग्रामपंचायतच्या ट्रॅक्टरद्वारे सवलतीच्या दरात नांगरून देतो.महिला भगिनींसाठी विविध प्रकारच्या गिरण्या उपलब्ध करून सर्व प्रकारचे दळणे मोफत करून देतो गावातील नागरिकांसाठी विविध पद्धतीने नळ पाणीपुरवठा करतो,एक नळ सांडपाण्यासाठी,दुसरा नळ पिण्याच्या पाण्यासाठी, तिसरा नळ गरम पाण्यासाठी असून महिलांना घरोघर गॅस पाईपलाईन उपलब्ध करून दिली असल्यामुळे त्यांचा त्रास वाचला आहे.दरवर्षीच एक एप्रिल रोजी गावातील कर भरण्यासाठी रांग लागते.प्रथम प्राधान्याने प्रथम क्रमांकाने कर भरणाऱ्या महिलेच्या हाताने १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण करण्यात येते. दुसऱ्या क्रमांकाच्या महिलेकडून २६ जानेवारी रोजी प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहण करण्यात येते. तिसऱ्या क्रमांकावर कर भरणाऱ्या महिलेला १ मे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहणाचा तर चौथ्या क्रमांकाच्या महिलेला १७ सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी ध्वजारोहणाचा मान दिला जातो असे सांगून महिला वर्गाचा सन्मान कसा होतो हे सांगितले त्याचबरोबर पाटोदा येथे वयोवृद्ध,निराधार माणसांसाठी आम्ही निवास व्यवस्था आणि खाण्यापिण्याची, औषधोपचाराची मोफत व्यवस्था केलेली आहे.ज्या गावात एखादा माणूस उपाशी झोपत असेल त्या गावातल्या सरपंचाला झोप नाही आली पाहिजे असे सांगून शासनाच्या योजनांचा अभ्यास केला पाहिजे शासनाच्या काही योजनांवर टिपणी करताना ते म्हणाले सर्वसामान्य माणसाचे आयुर्मान जर सत्तर वर्षाचे असेल तर ७५ वर्षे वयाच्या नागरिकाला एसटी मोफत प्रवास आहे परंतु हा प्रवास शालेय विद्यार्थ्यांना मोफत असायला हवा कारण शाळेमध्ये शिक्षण घेण्यासाठी या मोफत बसचा उपयोग होऊ शकेल असे सांगत सध्याची राजकीय परिस्थिती ही अनाकलनीय असल्याचे दिसून येत आहे असे ते म्हणाले. या कार्यक्रमाचा अध्यक्षीय समारोप करताना माजी आमदार साहेबराव दरेकर म्हणाले की, कॉम्रेड नानासाहेब पोकळे आबा पक्षासाठी ध्येयनिष्ठ, एकनिष्ठ आयुष्य जगले. त्यांनी पदरमोड करून आदर्श पद्धतीने राजकारण कसे केले पाहिजे याचा धडा घालून दिलेला आहे. त्यांनी आयुष्यभर शेतकरी आणि शेतमजूर यांच्यासाठी लढा देण्यात धन्यता मानली.त्यांनी त्यांचे कार्यक्षेत्र हे आष्टी तालुक्यापुरते मर्यादित करून घेतले होते.कारण त्यांना तालुक्यातीलच शेतकरी आणि शेतमजुरांसाठी न्याय मागण्याची काम केले अत्यंत ध्येयनिष्ठ आणि तत्त्वनिष्ठतेने पक्षाचे काम केले त्यांना इतर पक्षाच्या ऑफर आल्या पण त्यांनी त्या नाकारल्या आणि आयुष्यभर कम्युनिस्ट पक्षाचेच काम केले त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज आदर्श सरपंच भास्कर पेरे पाटील यांनी अत्यंत सुंदरपणे सरपंच कसे काम करू शकतो हे सांगितले असल्यामुळे याचा आदर्श तालुक्यातील सरपंचांनी घ्यावा असे सांगितले प्रस्ताविक करताना स्व. नानासाहेब पोकळे यांचे चिरंजीव महाराष्ट्र राज्याचे सेवानिवृत्त फलोत्पादन संचालक प्रल्हाद पोकळे यांनी नानासाहेब पोकळे यांचे कार्य आणि विचार परिसरातील जनतेच्या स्मरणात राहावेत यासाठी हा पुण्यस्मरण सोहळा आयोजित केल्याचे सांगितले, या पुण्यस्मरण समारंभामध्ये प्रल्हाद पोकळे,ज्येष्ठ पत्रकार प्रफुल्ल सहस्त्रबुद्धे,डाॅ. मधुकर हंबर्डे,जैन श्रावक संघाचे अध्यक्ष सुखलाल मुथा,माजी शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांनी आपले विचार व्यक्त केले.या संपूर्ण कार्यक्रमाचे अत्यंत सुंदर विवेचनासह सूत्रसंचालन अमोल जगताप यांनी तर उपस्थितांचे आभार सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी विक्रम पोकळे यांनी केले.या कार्यक्रमासाठी ग्रामस्थ मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या