Ticker

6/recent/ticker-posts

दिव्यांग,दुर्लक्षित घटकातील मुलांसाठी अलौकीक काम करणारे आदर्श संस्थाध्यक्ष सुखदेव पोकळे

उत्तम बोडखे,आष्टी ............... सुखदेव पोकळे हे सामाजिक बांधिलकी जपणारे,सर्वधर्म समभावाची जपवणूक करणारे,सर्वांच्या सुखदुखाःत मिसळणारे,सर्वांशी मित्रत्वाची भावना ठेवणारे,सेवधारी,संघर्षशिल,इतरांचे कौतुक करणारे,कसलाही न्यूनगंड न बाळगणारे,सामाजिक कार्यकर्ते युवानेते,उत्कृष्ट संघटन कौशल्य,कर्तुत्व, दातृत्व आणि नेतृत्व,कुशल प्रशासक, समाजप्रिय,शैक्षणिक,सामाजिक आणि सामाजिक कार्यासाठी धडपडणारे संघर्षशिल आणि उमलते नेतृत्व सुखदेव पोकळे ... --------------------- आष्टी तालुक्यातील बेलगाव या छोट्याशा खेडेगावांमध्ये सुखदेव सूर्यभान पोकळे यांचा जन्म दि.८ डिसेंबर १९७३ रोजी झाला. प्राथमिक शिक्षण बेलगाव येथे घेतल्यानंतर माध्यमिक शिक्षण किन्ही येथील भगतसिंग विद्यालयात घेतले.त्यानंतर महाविद्यालयीन शिक्षण आष्टी शहरातील हंबर्डे महाविद्यालयात झाले.काॕलेजमध्ये असतानाच आपल्या सहका-र्यांनाबरोबर घेत त्यांनी १९९५ साली शाहू महाराज अपंग पुनर्वसन संस्थेची स्थापना केली.आष्टी येथे छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालय सुरू केले. सर्वसामान्य परिस्थिती असतानाही स्वतः दिव्यांग असल्यामुळे दिव्यांग बांधवांचे काय हाल अपेक्षा असतात याची जाण असल्यामुळे दिव्यांग बांधवांसाठी काहीतरी करण्याचे ध्येय मनामध्ये असल्याने त्यांनी अपंग शाळा सुरू केली.अपंग शाळा सुरू करत असताना सुरुवातीला विद्यार्थी शोधणे व त्यांच्यासाठी उपजीविकेसाठी धान्य किराणा व इतर साहित्याची सोय करणे अतिशय जिकरीचे होते परंतु नाउमेद न होता सुखदेव पोकळे यांनी भाड्याच्या खोल्यामध्ये शाळेची सुरुवात केली. दिव्यांग बांधवांसाठी शिक्षणाची सोय व्हावी.समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये येऊन त्यांनी आपली उपजीविका स्वतः सुरू करावी यासाठी धडपडी व्यक्तिमत्व सुखदेव पोकळे यांनी सुरुवातीला सहा वर्ष विनाअनुदानित स्वतः खर्च करून या शाळेतील ५० विद्यार्थ्यांची उपजीविका त्यांनी भागवली.बेलगाव येथून आष्टीला सायकलवर येत वेळप्रसंगी उपाशी राहून तर कधी वडापाव खाऊन आपली भूक भागवत त्यांनी अपंग मुलांना आधार दिला. त्यांची पुण्याई म्हणूनच पुढे या अपंग शाळेत शासनाने अनुदान दिले.ही शाळा सुरळीतपणे सुरू झाली.त्यामागे संस्थापक अध्यक्ष सुखदेव पोकळे यांचे मोठे कष्ट व चिकाटी होती. शाहू महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्था व शिक्षण प्रसारक मंडळ आष्टी संस्थेची स्थापना करत या संस्थेअंतर्गत शाहू महाराज मागासवर्गीय मुलांचे वसतीगृह आष्टी,शाहू महाराज निवासी मूकबधिर विद्यालय आष्टी, साई बालसदन बालगृह क्रमांक एक, दोन,आष्टी तालुक्यातील डोईठाण येथे शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय,आष्टी येथे शाहू महाराज मतिमंद विद्यालय,आष्टी येथील साईराम निवासी मतिमंद विद्यालय,आष्टी शहरात श्री गणेश अध्यापक कला महाविद्यालय,साईबाबा बांधकाम पर्यवेक्षक कॉलेज,श्री गणेश बांधकाम पर्यवेक्षक कॉलेज, शाहू महाराज प्राथमिक विद्यालय आष्टी अशा अनेक शैक्षणिक संस्था व शैक्षणिक युनीटची स्थापना करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची "गंगा " आणली.मूकबधिर मुलांसाठी आष्टी येथे शाहू महाराज मूकबधिर विद्यालयाची स्थापना केली. त्यामध्येही आज ११० मुलं अतिशय चांगल्या प्रकारे शिक्षण घेत आहेत.त्याचठिकाणी मागासवर्गीय वसतीगृह व अनाथ अपंग, दुर्लक्षीत व गरीब घरातील मुलांसाठी त्यांनी बालसदन व अनाथालय सुरू केले. त्यामध्येही आज ३०० मुलं शिक्षण घेत आहेत. शाहू महाराज प्राथमिक शाळेची स्थापना केल्यानंतर त्यांनी डोइठाण येथे शाहू महाराज कनिष्ठ महाविद्यालय सुरु केले. यामध्ये आर्ट कॉमर्स आणि सायन्स या तिन्ही शाखांबरोबरच व्यवसाय प्रशिक्षणाची शाखा याठिकाणी सुरू केली आहे. ग्रामीण भागामध्ये महाविद्यालयाची गरज लक्षात घेता त्यांनी याठिकाणी महाविद्यालय सुरू करून डोंगरी भागामध्ये शिक्षणाची गंगा आणली. आज या ठिकाणी ५०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. छत्रपती शाहू महाराज निवासी अपंग विद्यालयांमध्ये त्यांनी वेगवेगळे उपक्रम राबवून याठिकाणी खास व्यवसाय प्रशिक्षण व कॉम्प्युटर प्रशिक्षणाची संकल्पना मांडून ती प्रत्यक्षामध्ये सुरू केली आहे.आज आष्टी तालुक्यातच नव्हे तर बीड जिल्ह्यातील नामांकित संस्था म्हणून त्यांच्या सर्व संस्थांची ओळख आहे.१७५ कर्मचारी संख्या असलेल्या त्यांच्या या शाळा व कॉलेजच्या विस्तारामध्ये त्यांचे मार्गदर्शन मोलाचे ठरत आहे.दिव्यांग,मूकबधिर, अंध,मतिमंद अनाथ,दीनदुबळे,गरीब कष्टकरी या सर्व घटकातील विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण मोफत घेत आहेत. त्यामुळे स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांगांसाठी काहीतरी करण्याची तळमळ संस्थापक अध्यक्ष सुखदेव पोकळे यांच्या मनामध्ये नेहमीच दिसते.आष्टी शहरामध्ये एक आदर्श संस्था म्हणून त्यांच्या सर्व शैक्षणिक संस्थाकडे पाहिले जाते.राजकीय पक्षातील नेत्यांची त्यांचे प्रेमाचे व सलोख्याचे संबंध आहेत.आपले काम आणि चिकाटी याच्या जोरावर त्यांनी हे यश संपादन केले आहे. यापुढेही दिव्यांग बांधवांसाठी आपण नेहमी प्रयत्नशील राहु.सामाजिक कार्यामध्ये व दिव्यांग बांधवांसाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यासाठी नेहमी अग्रेसर राहून वेगवेगळ्या योजना ते राबवत असतात. आष्टी शहरांमध्ये स्थायिक होऊन दुर्लक्षीत, दुर्बल घटकांसाठी काम करण्याची तळमळ मनामध्ये असल्यामुळे आज आष्टी शहरांमध्ये शैक्षणिक संस्थांचे जाळे त्यांनी उभारले आहे. यामध्ये विशेष करून अस्थिव्यंग,मूकबधिर, मतिमंद,अनाथ दुर्बल,गरीब दारिद्रय रेषेखालील घटकातील विद्यार्थ्यांची मोफत शिक्षणाची सोय त्यांनी आपल्या शिक्षण संस्थेमध्ये केली आहे.विद्यार्थ्यांना वर्षभर लागणारे सर्व साहित्य जीवनावश्यक वस्तू संस्थेमार्फत पुरवल्या जातात.वैयक्तिक लक्ष व कामाची चिकाटी यामधून त्यांनी दुर्लक्षित घटकासाठी मोठे काम उभा केले आहे.स्वतः दिव्यांग असूनही दिव्यांग बांधवांसाठी व दुर्लक्षित घटकातील मुलांसाठी काम करण्याची इच्छा मनाशी बाळगून एक आदर्श समाजापुढे निर्माण करण्याचे काम त्यांनी केले आहे.अशा या आदर्श व्यक्तिमत्त्वाला आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त लक्षलक्ष शुभेच्छा...... ---------------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या