Ticker

6/recent/ticker-posts

प्रसिद्ध कवी,लेखक इंद्रजित भालेराव ***********************
कवी,लेखक प्रा.इंद्रजित भालेराव यांना जामखेड जि.अहमदनगर येथील मराठी साहित्य प्रतिष्ठानचा संत तुकाराम साहित्य पुरस्कार नुकताच जाहीर झाला आहे.दि.१८ डिसेंबर रोजी हा पुरस्कार त्यांना सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे.कवी इंद्रजित भालेराव हे मराठी मुलखाला सर्व परिचित आहेत.त्यांनी केलेले लेखन आणि कवी संमेलनातील त्यांची मुसाफिरी वाहवा!मिळवणारी असते.हिंगोली जिल्ह्यातील रिधोरा हे त्यांचं मूळ गाव.गावच्या अस्सल मातीशी नातं सांगणारा,शेती,शेतकरी,त्यांचं काबाडकष्टाचं जीन आपल्या कवितेतून कसदारपणे मांडण्याचा प्रयत्न,त्यांच्या ओळी ओळीतून दिसून येतो.लहान मुलांना अभ्यासाला असणारी बाप नावाची कविता ही विद्यार्थ्यांच्या नेहमीच आवडीची कविता राहिलेली आहे.या कवितेच गेयरूप सर्वांनाच गायला भाग पाडते.शेतामधी माझी खोप,तिला बोराटीची झाप,तिथं राबवतो,कष्टतो माझा शेतकरी बाप, लेतो अंगावर चिंध्या,खातो मिरची भाकर, काढी उसाची पाचट,जगा मिळाल्या साखर,काटा त्याच्याच का पाई, त्यानं काय केलं पाप ?. असं हे पोशिंदाचं दुःख मांडणारी कविता सर्वांच्या आवडीची होऊन जाते.त्यांची अशीच एक कविता.गावाकडं चल माझ्या दोस्ता.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील निमंत्रितांच्या कवी संमेलनात या कवितेने वन्समोअर घेतला आहे.सहज मनाला भिडणारे शब्द हे इंद्रजित भालेराव यांच्या कवितेची खासियत आहे.गावाकडं चल माझ्या दोस्ता..या पुस्तकात मलपृष्ठावर म्हटलेच आहे. आपल्या गावातली सातवीपर्यंतची शाळा पूर्ण करून खेड्यातला एक विद्यार्थी शहरातल्या शाळेत येतो.सुरुवातीला तो भांबावून जातो. त्याचे आजी..आजोबा,माय... बाप,बहीण... भाऊ,गाई.. वासरं,झाड.. झुडप,यासह सगळी मित्रमंडळी गावाकडं राहते.बरेच दिवस त्याला करमत नाही.हळूहळू दोन चारच का होईना पण शहरातल्या शाळेतही त्याला मित्र मिळतात आणि एक दिवस तो आपल्या मित्रांना गावाकडे घेऊन जातो..काट्याकुट्यांचा तुडवीत रस्ता,माझ्या गावाकडे चल माझ्या दोस्ता. अशी ही या कवितेची पार्श्वभूमी.दोन जीवाची माय माही....., या कवितेला महाराष्ट्राने डोक्यावर घेतले.कवी इंद्रजित भालेराव यांचे सादरीकरणही तितकेच दमदार.अशा अनेक कविता मराठी रसिकांना मंत्रमुग्ध करतात म्हणूनच डॉ.नागनाथ कोत्तापल्ले त्यांच्याविषयी म्हणतात. गेल्या पाव शतकातील सशक्त कवींपैकी इंद्रजित भालेराव हे एक महत्त्वाचे नाव आहे.ग्रामीण जीवनातील वेदनेसह सर्व प्रकारच्या जाणिवांचे रंग.. गंध अतिशय उत्कट पणे इंद्रजित भालेराव यांच्या कवितांमधून प्रकट होतात.डॉ.नागनाथ कोत्तापल्ले यांनी इंद्रजित भालेराव यांच्या साहित्यावर भरभक्कम असा समीक्षा लेख मी एका मासिकातही वाचला होता.स्वतःविषयी इंद्रजित भालेराव एके ठिकाणी म्हणतात.... माझ्या कवितेत गीतगुण आधीच होते.नंतर निमित्ताने मला प्रत्यक्ष गाणीही रचावी लागली.कधी चळवळीसाठी,कधी चित्रपटासाठी,कधी दूरदर्शनसाठी,कधी संस्था,शाळा,महाविद्यालय,विद्यापीठांसाठी देखील.यातली बरीच गाणी आता लोकगीत झालेली आहेत.लोकांना गाणी माहित आहेत.पण मी माहीत नाही. याचाही मला आनंदच वाटतो.सामान्य माणसाला प्रतिमा, प्रतीकातून उलगडत जाणारी कविता कळत नाही,पण गाणी म्हटलं की त्यांना ती लगेच आपलीशी वाटतात,जन्मापासून माझं आयुष्य अशा सामान्य कष्टकरी लोकांसोबतच गेल्यामुळे आणि आजही माझा खरा रसिक श्रोता तोच असल्यामुळे त्यांच्यासाठी गाणी लिहिण्याकडे माझा कल आहेच.काही आधीच्या संग्रहात संकलित आहे.तर काही असंकलित. अशी माझी सर्व गाणी सततच्या मागणीमुळे तीही उपलब्ध करून देतो आहे.कवी इंद्रजित भालेराव यांची आजवर आम्ही काबाडाचे धनी,उगवले नारायण,कुळम्बिनीची कहाणी,गाऊ जिजाऊस आम्ही,गावाकडं चल माझ्या दोस्ता,गाई घरा आल्या,घरीदारी,टाहो,दूर राहिला गाव,नाद,पीकपाणी,पेरा,भूमीचे मार्दव,मळा,मुलुख माझा,रानमळ्याची वाट अशी अनेक पुस्तके,याशिवाय प्रसिद्ध ग्रामीण कथाकार भास्कर चंदनशिव यांच्या निवडक कथांचा लाल चिखल या कथासंग्रहाचे संपादन, बलचमा ही हिंदीतून मराठीत अनुवादित कादंबरी,बहिणाबाई चौधरी यांच्यावरील समीक्षा ग्रंथ असे विपुल लेखन त्यांनी केलेले आहे.कवी इंद्रजित भालेराव यांना आजवर अनेक पुरस्काराने सन्मानित केले आहे.महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे गोखले पुरस्कार,रोहमारे ग्रामीण साहित्य पुरस्कार,यशवंतराव चव्हाण पुरस्कार, अनंत काणेकर पुरस्कार,पद्मश्री विखे प्रवरानगर प्रेरणा पुरस्कार,साहित्य अकादमी दिल्ली प्रवासवृत्ती,महाराष्ट्र शासनाचा वि.द.घाटे पुरस्कार,महाराष्ट्र शासन उत्कृष्ट संपादन पुरस्कार,ग.ह. पाटील पुरस्कार,मर्ढेकर पुरस्कार,शिवार सांस्कृतिक प्रतिष्ठान पुरस्कार,हरिश्चंद्र सहानी पुरस्कार, विवेकानंद प्रतिष्ठान पुरस्कार,इंदिरा संत पुरस्कार, विनायकराव चारठाणकर पुरस्कार, गो.नी.दांडेकर स्मृती पुरस्कार,मराठवाडा भूषण पुरस्कार,महाराष्ट्र शासन मधुकर केचे उत्कृष्ट साहित्य निर्मिती पुरस्कार,अनंत लाभसेटवार पुरस्कार,बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना आजवर सन्मानित करण्यात आले आहे.देशभर कविता वाचनाचे कार्यक्रम करणाऱ्या कवी इंद्रजित भालेराव यांच्या कविता, बालभारती,कुमारभारती,शिवाय अनेक विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट आहेत.त्यांनी अमेरिका येथील विश्व साहित्य संमेलनात सहभाग घेतला आहे.इंद्रजित भालेराव यांचे साहित्य.या विषयावर सहा विद्यार्थ्यांनी आजवर पी.एचडी.केली असून बारा विद्यार्थ्यांनी एम.फिल.साठी संशोधन पूर्ण केले आहे.कवी इंद्रजित भालेराव यांचे संत तुकाराम पुरस्काराबद्दल हार्दिक अभिनंदन!! लेखक प्रा.सय्यद अल्लाउद्दीन *************************

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या