

आष्टी (उत्तम बोडखे)
आयुष्याच्या दहा पिढ्या पुरेल ईतकी संपत्ती असूनही एक रुपयाचेही दानधर्म आणि गरिबांना सेवा न देणारे हजारो जण असतात परंतु आपल्या अत्यंत गरिबी आणि दारिद्र्यात असूनही व्यावसायिक करताना आपल्यातील संवेदनशील मनाची भावना जागृत ठेवून कर्तव्य सेवा करण्याची आणि त्यातून समाधान मानण्याची प्रमाणिक प्रवृत्ती असणारेही मुठभर या समाज व्यवस्थेत आहेत.
याचाच प्रत्यय आज आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात आला.त्याचे झाले असे की,आष्टी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये गेल्या अनेक वर्षापासून गणेश आंबेकर हे चर्मकार समाजाचे बांधव आपला बूट चप्पल,दप्तर शिवण्याचा प्रमाणिक व्यवसाय करतात.आपली उपजीविका यावरच ते भागवतात. वय वर्ष साठीच्यावर जाऊन ही ते आपल्या कष्टावर जगतात परंतु हे करत असतानाही त्यांनी गरिबीचे दारिद्र्याचे भांडवल न करता इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थिनींना त्यांचे बूट चप्पल,दप्तर विना मोबदला म्हणजेच मोफत शिवून देण्याचे ते प्रमाणित कर्तव्य करतात.
ही सामाजिक बांधिलकीची कर्तव्य भावना या वयोवृध जेष्ठ नागरिक महाशयांना कुठून आली असेल? असा प्रश्न जागृक नागरिकांना पडल्याशिवाय राहत नाही परंतु आजकाल क्षुल्लक योगदान देऊन फार मोठी वाहवा करून घेणाऱ्या या जमान्यात तसेच कित्येक पिढ्यांची संपत्ती श्रीमंती असून ही इतरांच्या दुःखात सहभागी होऊन मदत करण्याची किंचितही भावना नसणारे अनेक महाभाग आहेत.त्यांच्या डोळ्यात यानिमित्ताने झणझणीत अंजन मात्र घातले गेले असेल! गणेश आंबेकर हे गरीब,वारकरी असेल किंवा रमजान महिन्यात उपवास करणारे व्यक्ती असतील अशा सर्व व्यक्तींनाही मोफत सेवा देतात.या गरीब कारागिरांच्या मोठेपणाच्या मनाचे आष्टी तालुक्यात कौतुक होत आहे.अशा या प्रमाणिक सामाजिक शैक्षणिक बांधिलकी मानून कार्य करणाऱ्या चर्मकार बांधवाला नगरपंचायतने येथे बसण्यासाठी महाराष्ट्र शासनाने चर्मकार लोकांना व्यवसायासाठी दिली जाणारी पत्र्याची पेटी सन्मानपूर्वक बहाल करावी अशी मागणी आष्टीतील जागरूक समाजधुरिणांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.
0 टिप्पण्या