आष्टी.
राज्य शिक्षक समन्वय संघटनेच्यावतीने आज सोमवार दि.२ ऑक्टोबर रोजी राज्यभरातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.शिक्षकांकडे असणारे अशैक्षणिक कामे,राज्यातील सरकारी शाळांचे होणारे खाजगीकरण,जुनी पेन्शन या आणि इतर मागण्यांसाठी राज्यभरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर महाआक्रोश मोर्चा आज होत आहे.त्यामुळे आमच्या मागणी मान्य करा अन्यथा यापुढे राष्ट्रीय कार्यामध्येदेखील आम्ही बहिष्कार घालणार असल्याचे समन्वय समितीच्यावतीने शिक्षक नेते बा.म.पवार यांनी सांगितले
सध्या सरकारी शाळेतील शिक्षकांसमोर अनेकविध अशैक्षणिक कामांचा डोंगर आहे. त्यामध्ये निवडणूक,मतदार नोंदणी, जनगणना,मतदार जागृती,शाळाबाह्य विद्यार्थी सर्वेक्षण,निरक्षर सर्वेक्षण,वेगवेगळ्या ॲपमध्ये माहिती भरणे,दररोज शालेय पोषण आहाराच्या नोंदी ठेवणे,

व्हाट्सअपच्या माध्यमातून दररोज पुन्हा पुन्हा तीच माहिती भरणे,वेगवेगळ्या माहिती भरणे या आणि यासारख्या अनेकविध कामामुळे सरकारी शाळेतील शिक्षक व मुख्याध्यापक प्रचंड वैतागले आहेत.मानसिक त्रासामुळे अनेक शिक्षकांना बीपी,शुगरचा त्रास सुरू झाला आहे.ही सर्व अशैक्षणिक कामे करताना शिक्षकांना विद्यार्थ्यांना शिकविण्यासाठी वेळ मिळत नाही.याचा विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर प्रतिकूल परिणाम होत आहे.यामुळे अशैक्षणिक कामातून सरकारी गुरुजींना मुक्त करण्यासाठी व गोरगरिबांच्या लेकरांना अध्यापनात वेळ देण्यासाठी आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे.शासनाकडून सरकारी शाळा विविध कंपन्यांना दत्तक देण्याचा प्रयत्न सुरु आहे.त्यामुळे भविष्यात शाळाच कंपनीच्या मालकीच्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे संविधानाने गोरगरिबांच्या मुलांना दिलेला शिक्षणाचा अधिकार संपुष्टात येण्याची भिती निर्माण झाली आहे.लहान भावंडांना जुनी पेन्शन मिळविण्यासाठी अनेकविध आंदोलने,मोर्चे,संप केले.शासनाने त्यावर समिती गठीत केली परंतु त्यावरही निश्चित निर्णय न झाल्यामुळे लहान भावंडांचे भविष्य अंधकारमय झाले आहे.या व इतर प्रमुख मागण्यांसाठी महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी आक्रोश महामोर्चा काढण्याचे नियोजन करण्यात आले.वेतन,भत्ते नाही तर गोरगरिबांच्या मुलांना शिक्षणाचा अधिकार पुन्हा मिळवून देण्यासाठी शिक्षक बंधू-भगिनींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन बा.म.पवार यांनी केले आहे.
0 टिप्पण्या