
आष्टी
बीड जिल्हयातील दुध भेसळ रोखण्यासाठी बीडचे अप्पर जिल्हाधिकारी त्रिभुवन
कुलकर्णी यांचे अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय भेसळ प्रतिबंधक समितीने संयुक्त
पथकामार्फत बीड जिल्हयात विविध दुध संकलन केंद्रावर जावुन दुध व दुग्धजन्य
पदार्थाची तपासणी करण्यात आलेली आहे.या तपासणी धडक मोहिमे अंतर्गत अन्न व औषध
प्रशासन विभागामार्फत संशयास्पद आढळुन आलेले दुध आणि दुग्धजन्य पदार्थाचे एकुण ३७
नमुने विश्लेषनास्तव प्रयोगशाळेत पाठविण्यात आलेले आहेत.मोहिमे अंतर्गत अंबाजोगाई
येथील रामदास कदम डेंगे यांचे २३१ लिटर दुध, आष्टी तालुक्यातील हाजीपुर येथील
कानिफनाथ खाजगी दुध संकलन केंद्राचे २५८ लिटर दुध,ब्रम्हगाव येथील संत वामनभाऊ या
खाजगी दुध संकलन केंद्राचे १७९८ लिटर दुध, जय हनुमान या खाजगी दुध संकलन केंद्राचे
७३८ लिटर दुध असे एकुण ३०२५ लिटर दुधाची तपासणी केली असता ते संशयास्पद आढळुन
आल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागामार्फत नष्ट करण्यात आले. गेवराई तालुकयातील
बेंगलोर स्वीटस मधील जप्त केलेले २३ किलो खवा नाशवंत व संशयास्पद असल्याने अन्न व
औषध प्रशासन विभागामार्फत नष्ट करण्यात आला.अन्न सुरक्षा अधिकारी यांनी कानिफनाथ
दुध संकलन केंद्र,हाजीपुर व संत वामनभाऊ दुध संकलन केंद्र ब्रम्हगाव या दुध संकलन
केंद्राचा अन्न परवाना नसल्यामुळे व्यवहार बंद करण्याबाबत सुचना दिल्या.वैधमापन
शास्त्र विभागामार्फत आष्टी तालुका दुध संघ म. आष्टी या केंद्रातील वजन काटा
प्रमाणीत नसल्यामुळे संघावर कार्यवाही करण्यात आली आहे.कानिफनाथ - हाजीपुर व संत
वामनभाऊ- ब्रम्हगाव या खाजगी दुध संकलन केंद्रावर कार्यवाही प्रस्तावित करण्यात आली
आहे.जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी या कार्यालयातील पथकामार्फत २० दुध संस्थाची
तपासणी करण्यात आली असुन २२२२ लिटर कमीप्रत, वास चवीचे दुध संस्था स्तरावर परत
करण्यात आले आहे. याबाबत दुग्ध संस्थाना कमीप्रत,वास चवीचे व भेसळयुक्त् दुध न
स्विकारण्याबाबत सक्त् सुचना देण्यात आल्या आहेत.या जिल्हास्तरीय समिती मार्फत दुध
व दुग्धजन्य पदार्थाचे भेसळ करणा-या विरुध्द धडक मोहिम राबविण्यात येत असुन सर्व
जनतेस आवाहन करण्यात येत आहे की,आपले जवळपास दुध व दुग्धजन्य पदार्थाचे भेसळीचे
प्रकार घडत असल्यास आपण जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी बीड या कार्यालयाकडे
संपर्क साधावा असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी यांनी केले आहे.
0 टिप्पण्या