उत्तम बोडखे,
संत वामनभाऊ यांच्या आदेशाने एका नवाख्या तरूणाला कीर्तनाला उभे केले
आणि चक्क संत वामनभाऊ यांच्यासमोर उत्कृष्ठ कीर्तनसेवा केली.त्यानंतर या महाराजांचे
सर्वत्र नाव झाले आणि संत विचाराने संत जीवन जगत असलेले वयाचे शंभरी ओलांडली तर
पहाडी आवाज आणि उत्कृष्ठ कीर्तन करणारे आष्टी तालुक्यातील मुळ धामणगांव येथील
असलेले ह.भ.प.रघुनाथ महाराज चौधरी धामणगांवकर हे आहेत.लहानपणापासुन कीर्तन,भजनाचा
छंद असणारे आणि संत वामनभाऊ यांच्या सहवासात वाढलेले शिकलेले संत रघुनाथ महाराज
चौधरी हे आहेत.सन १९१९ मध्ये धामणगांवी लक्ष्मीबाई आणि दौलतराव पाटील यांच्या पोटी
रघुनाथ महाराज धामणगांवकर यांचा जन्म झाला.दौलतराव पाटलांना एकुण ७ अपत्य. त्यात
रघुनाथ महाराज यांचा क्रमांत तिसरा.आजोबा आबाजी पाटील व चुलते आप्पानंद महाराज
दोघेही वारकरी सांप्रदायाचे अनुयायी.मुलांनी शिकावे,शरीर संपदा कमवावी यावर त्यांचा
भर रघुनाथ महाराज मात्र खोडकर,बंडखोर वृत्तीचे त्याकाळी शेषराव गुरूजी आणि रोषन
मास्तर त्यांना कच्ची बिगारी व पक्की बिगारी शिकवावे.रोशन मास्तर अत्यंत कडक
शिस्तीचे होते.एकदा त्यांनी रघुनाथ महाराजांना शिक्षा केली.त्या गोष्टीचा मनात राग
धरून रघुनाथ महाराजांनी त्यांच्या खुर्चीवरील आसनाखाली काटे असणारे निवडुंगाचे पान
ठेवले.मास्तरांनी वर्गात प्रवेश करताच पोर स्वागतासाठी उभी राहिल.महाराज मात्र
सावधच.मास्तर नेहमीप्रमाणे खुचींवर जोरदार बसले तसे निवडुंगाच्या काट्यांनी त्यांचे
काम चोख बजावले.मास्तर कसेबसे उठले.हे कोणी केले ? असे विचारेपर्यंत रघुनाथ
महाराजांनी धुम ठोकली व धावत धावत थेट गहिनीनाथगड गाठला.श्री गहिनीनाथगडावर काही
दिवस त्यांनी गुरे सांभाळण्याचे काम केले. संत वामनभाऊमुळे गडावर धार्मिक वातावरण
भजन,कीर्तनाची मेजवानी त्यांना मिळत होती.रघुनाथ महाराजांनी गुरे राखता राखता अनेक
अभंग पाठ केले.अभंग पाठ करणे व गुणगुणने हे काम त्यांचे सुरू होते.संत वामनभाऊ
यांच्या हे लक्षात आले.त्यांनी रघुनाथ महाराजांना सोबत घेऊन आळंदी येथे गेले.तेथे
सद्गुरू धर्मशाळेत मामासाहेब दांडेकर यांच्या स्वाधीन करत एवढ्या माझ्या पोराला
सांभाळा असे सांगुन वामनभाऊ गडावर परतले.आळंदी संत संगतीत दिवसामागुन दिवस जात
होते.माधुकरी मागुन उदरनिर्वाह सुरू होता.अधुनमधुन वामनभाऊंची चक्कर
व्हायची.ख्याली खुशाली विचारायचे.ह.भ.प.रघुनाथ महाराजांची प्रगती पाहुन वामनभाऊ
समाधानी आणि आनंदी होत होते.एके दिवशी वामनभाऊंचा आदेश आला आता तु पंढरपुरला
जा.त्यांच्या आदेशानुसार रघुनाथ महाराज पंढरपूरला गेले.तेथे रविंद्रनाथ गुरूजी
परभणीकर,खंदारकर,धुंडा महाराज देगुलरकर यांच्या सहवासात राहिले.गुरूजींच्या सहवासात
जीवन जगताना बोध झाला की,संपुर्ण आयुष्य ब्रम्हचारी राहायचे हे नक्की केले.जो
प्रतिज्ञापुर्वक आपले अंतकरण स्वत:च्या स्वाधीन ठेवतो.तोच खरा निश्चयी माणुस
असतो.या उक्तीप्रमाणे रघुनाथ महाराज यांनी ब्रम्हचारी राहण्याचा संकल्प केले.भजन
म्हणणे,कीर्तन ऐकणे हे नित्याचे झाले.एके दिवशी वडील व मामा हे पंढरपूरला
महाराजांना घरी घेऊन जाण्यासाठी आले.वडील व मामांनी रघुनाथ महाराजांचे लग्नही ठरवले
होते परंतु महाराजांनी गावी येण्यास व लग्न करण्यास स्पष्ट नकार दिला.आपला
ब्रम्हचारी राहण्याचा दृढ निश्चय सांगितला. संपुर्ण आयुष्य ब्रम्हचारी राहुन ईश्वर
भक्तीत घालायचे आहे असे सांगितले.वयाच्या १५ व्या.वर्षी संत वामनभाऊ यांनी पंढरपूर
क्षेत्री रघुनाथ महाराजांना कीर्तन करण्याचा हुकूम दिला.रघुनाथ महाराज प्रथम
गोंधळले,संत वामनभाऊंनी हे ओळखले. स्वत:च्या डोक्यावरचा फेटा रघुनाथ महाराजांच्या
डोक्यावर चढवला व स्वत:चा पंचा देखील दिला आणि कीर्तनाला उभे केले.ह.भ.प.रघुनाथ
महाराजांच्या आयुष्यातील पहिले कीर्तन संत वामनभाऊ यांच्या समोर झाले
आहे.वामनभाऊंचा आशीर्वाद घेऊन ही कीर्तनसेवा त्यांनी केली.संत वामनभाऊसारख्या
महान,वाचासिध्द असलेल्या महात्म्यांच्या आशीर्वादाने रघुनाथ महाराज घडले.१०४ वर्षे
वय असले तरी आजही रघुनाथ महाराजांची यांची कीर्तनसेवा सुरूच आहे.धामणगांवी यायचे
नाही असे ठरवले होते परंतु धामणगांवचे पोलीस पाटील बाप्पासाहेब चौधरी स्वत: घ्यायला
आले.तुला गावी यावेच लागेल असे म्हणाले पाटलांचे मन मोडता आले नाही म्हणून रघुनाथ
महाराज धामणगांवी आले.बाप्पासाहेब पाटलांनी तुकाराम महाराज मंदीर बांधकाम करून
रघुनाथ महाराजांची राहण्याची सोय केली.धामणगांव व परिसरातील लोक त्यांना कीर्तनाला
निमंत्रीत करू लागले.सर्वत्र ओळख झाली.त्याचबरोबर महाराष्ट्रातील अनेक भागात
त्यांची कीर्तने होऊ लागली.रघुनाथ महाराजांनी कधीच कीर्तनाचे मानधन ठरवले
नाही.भाविक देतील तेच मानधन घेणारे हे एकमेव महाराज आहेत.सर्वत्र बोलबाला
झाल्यानंतर वेगवेगळ्या संस्थानावर त्यांना बोलावणं आल आमचे संस्थान सांभाळण्यासाठी
या परंतु ते कोठेही गेले नाहीत.रघुनाथ महाराजांच्या कीर्तनात आई वडीलांची सेवा
करा,वारी नाही केली तरी चालेल पण त्यांना दुखवु नका.आपल्या कृतीने आई-वडीलांची मान
खाली जाईल असे कृत्य करू नका.धर्माचे पालन करा,व्यसनाचा त्याग करा,सासु सुनाचे नाते
आई आणि मुलगी यांच्याप्रमाणे ठेवावे असा उपदेश करतात.महाराजांनी संपुर्ण आयुष्य
त्यागी,वारकरी विचारास समर्पित केले आहे.संत जीवन जगुन त्यांनी परिसरातच नव्हे तर
महाराष्ट्रात एक त्यागी संत असल्याचे ओळख निर्माण केली आहे.वयाचे १०४ वर्षे पार
झाली तरी गाडी,घोडी थाट,माट काही नाही.कीर्तनसेवा जेथे करायची तेथेच पंगतीत बसुन
भाजी भाकर खायची इतका साधेपणा त्यांनी जपला आहे.आयुष्यभर कोणाकडे कसलीच अपेक्षा
केली नाही.महाराजांचे अनेक शिष्य स्वत:आलिशान गाडी,सुखसोयी सर्व काही देण्यात तयार
आहेत परंतु महाराज हे नम्रतेने नाकारतात.भक्तांनी अनेक ठिकाणी महाराजांची शताब्दी
साजरी केली.त्यांची मिरवणुक काढली.ज्ञानेश्वरी,भागवत ग्रंथ यांनी रघुनाथ महाराज
धामणगांवकर यांची तुला झाली.ह.भ.प.वै.संत मदन महाराज यांना आष्टी तालुक्यात ५०
वर्षापुर्वी संत रघुनाथ महाराज धामणगांवकर आणि डोंगरगणचे रंगनाथ महाराज गावडे
यांनीच आमंत्रीत केले होते.महाराजांच्या कीर्तन श्रवणाने अनेक जण माळकरी
झाले.व्यसनाचा त्याग करून माणुस म्हणून जीवन जगत आहेत.महाराज नेहमी बोलताना एक
इच्छा बोलून दाखवतात ती म्हणजे माझ्या पाठीमागे माझा मठ बांधु नका.मंदीर ऊभारू
नका.फक्त आई वडीलांचा अनादर होणार नाही याची काळजी घ्या.जमलेच तर माझी स्मृती रहावे
म्हणून धामणगांवी तुकाराम महाराज मंदिरात मुर्तीच्या सानिध्यात ठेवा.म्हणजे मला
नंतरही तुकाराम महाराजांचा सहवास लाभेल असे म्हणतात.महाराज वयाची ६० ते ७० वर्षे
स्वताः हाताने स्वयंपाक करुन जेवले आहेत.त्यामुळे त्यांची प्रकृती अंत्यत चांगली
आहे.या १०४ वर्षे वयाचे तपस्वी,संत वामनभाऊ समकालीन ह.भ.प.रघुनाथ माहाराज चौधरी
धामणगांवकर यांंच्या अध्यात्मिक क्षेत्रातील महान कार्याला
झुंजारवार्ता परिवाराच्यावतीने हार्दिक शुभेच्छा ---- उत्तम बोडखे,आष्टी.
********************
0 टिप्पण्या