Ticker

6/recent/ticker-posts

हंबर्डे महाविद्यालयाने शेतकरी पुत्रांच्या जीवनात आनंद निर्माण केला ------- आ. सुरेश धस ---------- हंबर्डे महाविद्यालयाच्या उन्नतीसाठी आपण वचनबद्ध आहोत ------ आ.बाळासाहेब आजबे.

उत्तम बोडखे,आष्टी. आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाने ५० वर्षांपूर्वी लावलेले बी.डी.हंबर्डे महाविद्यालय वेगाने प्रगती करीत असून ग्रामीण भागातील शेतकरी पुत्रांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य या महाविद्यालयाचे माध्यमातून झालेले असे प्रतिपादन विधान परिषदेचे आ.सुरेश धस यांनी केले.आष्टी येथील बी.डी.हंबर्डे महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. तर आष्टीचे बी.डी. हंबर्डे महाविद्यालयाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण वचनबद्ध आहोत.या ठिकाणी आवश्यक असलेली सर्व बाबींची पूर्तता करण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल. लवकरच ना.बनसोडे यांच्याकडुन आपण या महाविद्यालयात भव्य क्रीडांगण आणि वसतीगृह मंजूर करून घेऊ असे प्रतिपादन आष्टी विधानसभा मतदार संघाचे आ.बाळासाहेब आजबे यांनी केले. आष्टी येथील हंबर्डे महाविद्यालयातील बी.डी.हंबर्डे विधी महाविद्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष किशोरनाना हंबर्डे हे होते. यावेळी इंदोरचे उद्योगपती परमेश्वर येवले, बीडचे प्राचार्य डॉ.वसंत सानप, वाल्मिक निकाळजे,आण्णासाहेब चौधरी, चेअरमन आदिनाथ सानप, डॉ.शिवाजी राऊत, गोविंद घोडके, डॉ.मधुकर हंबर्डे, मधुकर गर्जे, काकासाहेब शिंदे, दत्ता काकडे, प्रफुल्ल सहस्रबुद्धे, उत्तम बोडखे, भाऊसाहेब लटपटे,सरपंच अशोक मुळे, प्राचार्य बाळासाहेब खेमगर,भाऊसाहेब थेटे, कल्याण पोकळे,राम बोडखे,ए.डी. कुलकर्णी,सुधीर पठाडे,जालिंदर वांढरे,रविकांत सुंबरे,उत्तम गव्हाणे, बाबासाहेब कर्डिले,रत्नदीप निकाळजे आदि मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना आ.सुरेश धस म्हणाले की,आष्टीसारख्या ग्रामीण भागातील या महाविद्यालयातील तत्कालीन सर्व प्राध्यापक वर्ग उत्कृष्ट पद्धतीने मार्गदर्शन करीत असे.या महाविद्यालयातील निवडणुकीत मी बरेच शिकलो.१९९१ ते १९९३ असे सतत तीन वर्ष विद्यार्थी संसदेच्या अध्यक्ष होण्याची संधी मला मिळाली. त्यातूनच पुढे राजकीय धडे गिरवण्याची संधी याच महाविद्यालयामध्ये मिळाली.सुरुवातीला केवळ कला आणि वाणिज्य या दोन शाखा अस्तित्वात होत्या परंतु कालांतराने आता विज्ञान शाखा सुरू झाल्याने आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांना दूरवर शिक्षण घेण्यासाठी जाण्याची आवश्यकता राहिली नसून या ठिकाणी त्यांना आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत. सुरुवातीला आम्ही शिक्षण घेत असताना गोरगरीब शेतकऱ्यांची मुले या महाविद्यालय शिक्षण घेत असत त्यांच्याकडे शैक्षणिक शुल्क इतकी देखील रक्कम नव्हती परंतु व्यवस्थापनातील सर्वजण शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे विद्यार्थ्यांना वर्षभर सवलत मिळत असे तर गोरगरीब विद्यार्थ्यांना विनाशुल्क शिक्षण मिळत असे कारण त्या काळात अनेक विद्यार्थी अनवाणी पायाने महाविद्यालयात शिक्षणासाठी येत असल्याचे आजही आठवणीत असल्याचे त्यांनी सांगितले. या महाविद्यालयातून शिक्षण घेतलेले अनेक विद्यार्थी आज अनेक क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट कामगिरी करत आहेत. या महाविद्यालयाने प्रगतीची मोठी गती घेतली असून बीसीए,एमसीए, बीबीए तसेच एम.ए.मराठी इतिहास राज्यशास्त्र अभ्यासक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे. तसेच या महाविद्यालयाच्या आगामी अभ्यासक्रमासाठी आणि या महाविद्यालयाच्या खेळाचे मैदान, सांस्कृतिक भवन,तसेच प्रशासकीय भवन या बांधकामासाठी आपण प्रशासकीय पातळीवर सर्वतोपरी मदत करू असे आश्वासन दिले.तर यावेळी पुढे बोलताना आ.बाळासाहेब आजबे म्हणाले की, हे महाविद्यालय सुरू करण्यासाठी आमचे पिताश्री तत्कालीन आमदार भाऊसाहेब आजबे (बापु ) यांचे मोठे आर्थिक योगदान असून केवळ शेतकऱ्यांची मुले या ठिकाणी शिक्षण घेत असल्यामुळे त्यांच्याविषयी अत्यंत सहानुभूतीने या महाविद्यालयामध्ये विचार करण्यात आला.त्यामुळेच आज या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नावलौकिक कमावलेला आहे.माझे प्राथमिक शिक्षण प्रवरा येथे,अकरावी आणि बारावी कर्जत येथे तर नंतर बी.ए.प्रथम वर्ष पुण्यात आणि व्दितीय आणि तृतीय वर्ष कोल्हापूर येथे पूर्ण केले.मी हंबर्डे महाविद्यालयाचा विद्यार्थी नाही परंतु माझ्या वडिलांनी हे महाविद्यालय उभे केले आहे.भूविकास बँकेचा संचालक झाल्यामुळे राजकारणात प्रवेश झाला. त्यामुळे पुढील शिक्षण घेता आले नाही त्यामुळे या महाविद्यालयामध्ये शिक्षण घेण्याची संधी मला मिळाली नाही.तरीही आष्टी तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या उज्वल भवितव्यासाठी या महाविद्यालयाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी आपण वचनबद्ध आहोत.याठिकाणी आवश्यक असलेल्या सर्व कामासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याची आ.आजबे यांनी यावेळी सांगितले.यावेळी प्रस्ताविक प्रा.महेश चवरे यांनी केले.या महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांच्या स्नेहमिलन मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष इंजि.किशोर हंबर्डे म्हणाले की, " हिस्टरी रिपीट्स अगेन " म्हणजे इतिहासाची पुनरावृत्ती होत असते असा प्रसंग आज आज घडलेला आहे कारण या आष्टी तालुका शिक्षण प्रसारक मंडळाच्या या महाविद्यालयाची सुरुवात आमचे आजोबा तात्कालीन आ.भाऊसाहेब आजबे यांच्या कार्यकर्तृत्वातून झाली असून त्यांचे यासाठी महत्त्वपूर्ण योगदान आहे आणि आज ५० वर्षांनी त्यांचेच पुत्र असलेले बाळासाहेब आमदार आहेत.संस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांमध्ये विधी महाविद्यालयाचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होत आहे.याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे असे सांगून ५० वर्षांपूर्वीच्या दुष्काळी परिस्थितीतील हे रोपटे आज बहरत असून आज उपस्थित असलेले आ.सुरेश धस आणि आ. बाळासाहेब आजबे हे दोन आमदार आपल्या तालुक्याला लाभलेले असून त्यांनी या महाविद्यालयाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी मदतीचा हात द्यावा अशी अपेक्षा असल्याचे सांगत आज कला वाणिज्य विज्ञान बीसीए,एमसीए, बीबीए,एम.ए. अभ्यासक्रम सुरू आहेत. यापुढे विधीमहाविद्यालय,डी.फार्मसी,बी. फार्मसी अशा प्रकारचे अभ्यासक्रम सुरू करण्याचा विचार असून येथील या ठिकाणी असलेली ११ एकर आणि समोरच्या बाजूला आणखी ३ एकर जमीन उपलब्ध असल्यामुळे येथेच संस्थेचा विस्तार करण्याचा विचार असल्याचे सांगितले. या ठिकाणी आष्टी तालुक्याचे क्रीडा संकुल होण्यायोग्य जागा उपलब्ध असून आ.सुरेश धस आणि आ.बाळासाहेब आजबे या दोघांनी मिळून प्रयत्न करून या ठिकाणी उत्कृष्ट असे क्रीडा संकुल उभारण्यासाठी प्रयत्न करावेत असे आवाहन केले. यानिमित्त कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे पहिले विद्यार्थी विक्रम पवळे,रावसाहेब चव्हाण,नवनाथ अडसरे,पी.टी.चौधरी,सय्यद शहाबुद्दीन आणि १९६२ च्या चीन युद्ध आणि १९७१ चे पाकिस्तान विरुद्धचे युद्धामध्ये सहभाग घेतलेले माजी सैनिक सावळीराम मार्कंडे (वय ८०) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ.सोपानराव निंभोरे यांनी केले तर संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सेवानिवृत्त प्रा.सय्यद अल्लाउद्दीन आणि प्रा.सायली हंबर्डे यांनी केले.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या