Ticker

6/recent/ticker-posts

रामदास फुटाणे यांच्या वाढदिवसानिमित्त जामखेड येथील सत्कार सोहळा

 

जामखेड येथील ल.ना. होशिग विद्यालयाच्या भव्य मैदानात प्रसिद्ध कवी व वात्रटिकाकार,चित्रपट निर्माते,दिग्दर्शक रामदासजी फुटाणे यांचा समस्त जामखेडकर ग्रामस्थांच्या वतीने कवी,लेखक,चित्रपट दिग्दर्शक नागराज मंजुळे,स्नेहालयाचे गिरीश कुलकर्णी यांच्या उपस्थितीत भव्य सत्कार करण्यात आला.यावेळी ज्येष्ठ मुलाखतकार आनंद देशमुख यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली.उद्योजक रमेश गुगळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.यावेळी नागराज मंजुळे म्हणाले,रामदास फुटाणे हे अष्टपैलू व्यक्तिमत्व आहे.त्यांचे मराठी चित्रपट सृष्टीत फार मोठे योगदान आहे.त्यांनी महाराष्ट्रातील अनेक दिग्गजांना पुरस्कार दिले.त्यांचे पुरस्कार आजही टिकून आहेत.स्वतः जवळ पैसा नसतानाही त्यांनी सामना सारखा चित्रपट काढण्याचे धाडस केले.हा नव्या पिढीसाठी मोठा आदर्श आहे.आम्ही रामदासजी फुटाणे यांना नाना म्हणतो.नानांचे माझ्या यशात फार मोठे योगदान आहे.त्यांचा आदर्श माझ्या डोळ्यासमोर आहे.त्यांचे धडपडणाऱ्या कुठल्याही कलावंतांना नेहमीच प्रोत्साहन असते.मला पहिला पुरस्कार मिळाला,तेव्हा त्यांनी माझे तोंडभरून कौतुक केले.माझ्यासाठी ते फार महत्त्वाचे व्यक्ती आहेत.जामखेडचे भूमिपुत्र म्हणून ज्येष्ठ कवी,दिग्दर्शक नाना यांची जगात ख्याती आहे.त्यांचे पूर्ण जीवन संघर्षाने भरलेले आहे.पहिलाच चित्रपट आणि तोही सामाजिक प्रश्नावर.तो त्यांच्या जीवनाशीच सामना होता.ते अनेकांचे आदर्श आहेत.माझेही आदर्श आहेत.असे यावेळी त्यांच्या भव्य सत्कारा प्रसंगी नागराज मंजुळे म्हणाले.ल.ना.होशिंग विद्यालयाचे प्राचार्य श्रीकांत होशिंग यांनी गौरव पत्राचे वाचन केले.ज्येष्ठ मुलाखतकार आनंद देशमुख यांनी घेतलेल्या प्रकट मुलाखती मधून रामदास फुटाणे यांच्या खडतर प्रवासावर प्रकाश टाकण्यात आला.जास्तीत जास्त एक तासाची मुलाखत घ्यावी असा रामदास फुटाणे यांचा दंडक असल्याने,छोट्या  छोट्या प्रश्नांमधून त्यांनी खुमारदार शैलीत उत्तरे दिली.अधून मधून वात्रटिका,कविताही सादर केल्या.जामखेड येथे दि.१४ एप्रिल १९४३ रोजी जन्मलेले रामदास फुटाणे यांनी सामना,सर्वसाक्षी,सुरवंता,सरपंच भगीरथ यासारखे चित्रपट काढले.सामना तीन राष्ट्रीय पुरस्कार,फिल्मफेअर अवॉर्ड आणि राज्य पुरस्कार.तसेच १९७५ च्या बर्लिन येथील आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवड झाली.आणि महोत्सवात सहभाग घेणारा चित्रपट ठरला.सर्वसाक्षी हा चित्रपट बेंगलोरच्या इंडियन पॅनोरमासाठी आणि हॉंगकॉंग येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी निवडला गेला.सुरवंता चित्रपट उत्कृष्ट ग्रामीण चित्रपटाचा राज्य पुरस्कार.१९९५ चा चित्रपटासाठीचा कालनिर्णय पुरस्कार,दिग्दर्शनासाठी प्राप्त झाला.सामना या चित्रपटाचे दिग्दर्शन जब्बार पटेल यांनी केले होते.तर सर्वसाक्षी या चित्रपटाचे दिग्दर्शन रामदास फुटाणे यांनी केले होते.साहित्य लेखनामध्ये कटपीस हिंदी कविता संग्रह,सफेद टोपी लाल बत्ती,भारत कधी कधी माझा देश आहे,चांगभलं,फोडणी,कॉकटेल ही पुस्तके नुसती लोकप्रिय ठरली नाहीत तर त्यांच्या अनेक आवृत्त्या निघाल्या.फोडणी या कवितासंग्रहाला महाराष्ट्र शासनाचा उत्कृष्ट मराठी साहित्य पुरस्कार,गोवा कला अकादमी काव्यहोत्र पुरस्कार,अशा अनेक पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले. त्यांनी अनेक पदे भूषविली.अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे ते अध्यक्ष राहिले. महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे चे उपाध्यक्ष पद त्यांनी भूषविले.महाराष्ट्र राज्य विधान परिषदेवर आमदारही होते.महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समिती मुंबईचे सदस्यही होते. सोलापूर येथील भैरू रतन दमाणी पुरस्कार, जामखेड येथील स्वातंत्र्य सैनिक दत्तात्रय जनार्दन तथा भाई फुटाणे प्रतिष्ठानचा संत नामदेव पुरस्कार,प्रियदर्शनी पुरस्कार मुंबई,यशवंतराव चव्हाण साहित्य पुरस्कार पुणे,निर्मलकुमार फडकुले साहित्य व समाजसेवा पुरस्कार सोलापूर,कवयित्री संजीवनी खोजे पुरस्कार अहमदनगर, पद्मश्री विखे पाटील साहित्य पुरस्कार प्रवारानगर अहमदनगर,महाराष्ट्राला सुपरिचित आणि प्रतिष्ठेचे मानले जातात. पुरस्कारा निमित्त कवी संमेलनात निमंत्रित म्हणून मीही अनेक वेळा सहभागी झालो आहे.जागतिक मराठी अकादमी शोध मराठी मनाचा साहित्य संमेलनासाठी त्यांची  अध्यक्ष या नात्याने भूमिका फार महत्त्वाची मानली जाते.अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तोडीने हे जागतिक मराठी साहित्य संमेलन अनेक देशात, परदेशात मराठी माणसांचा कानोसा घेत आला आहे.जागतिक मराठी अकादमी संमेलनाचे अध्यक्षपद प्रा.राम शेवाळकर, डॉ.श्रीराम लागू,विजय तेंडुलकर,प्रकाश भालेराव,निळू फुले,सुहास काकडे,मंगेश पाडगावकर,विजय भटकर,अरुण फिरोजिया,आशुतोष गोवारीकर,मधु मंगेश कर्णिक,विक्रम गोखले आशा अनेक दिग्गजांनी भूषविले आहे.भाई फुटाणे प्रतिष्ठानच्या वतीने दिल्या जाणाऱ्या संत नामदेव पुरस्काराचे आजवर प्रा.पुरुषोत्तम पाटील,भाऊसाहेब पाटणकर,वामनदादा कर्डक,राजा मुकुंद,प्रा.वसंत सावंत,कवी रा. ना.पवार,शाहीर साबळे,फादर फ्रान्सिस दिब्रेटो,शाहीर विभुते,कवी ना.धों.महानोर, शाहीर विठ्ठल उमप,प्रा.रा ग जाधव,शाहीर शेख जैनुद्दीन चांद,डॉ.अशोक कामत, डॉ.निर्मलकुमार फडकुले,प्रा.डॉ.वि.मा. बाचल,सत्यपाल सिरसोलीकर,शाहीर लीलाधर हेगडे,कवी विठ्ठल वाघ,कवी अशोक नायगावकर,शाहीर संभाजी भगत, महेश केळुसकर,कवी प्रा.फ.मुं.शिंदे,कवी अरुण म्हात्रे,विष्णू सूर्या वाघ,सुरजित सिंग पातर पुरस्काराचे असे अनेक मानकरी ठरले आहेत.जामखेड येथील या सत्कार सोहळ्यात सत्काराला उत्तर देताना रामदास फुटाणे म्हणाले,मी अनेक देशात गेलो.एक मराठी माणूस,निर्माता,वात्रटिकाकार म्हणून माझे खूप सत्कार झाले.पण ८१  व्या. वाढदिवसानिमित्तच्या नागरी सत्काराने मी भारावून गेलो आहे.मी जामखेडचे नाव दूरवर नेले आहे.चित्रपटाचे चित्रीकरणही मी जामखेड मध्येच केले.जामखेडची ओळख नागपंचमीमुळे होते.मी नागपंचमी सोडून जामखेडला यायचो.मी लहान असताना जामखेडचे जुने कोर्ट,येथे आमची शाळा भरायची.तिथेच आठवी पर्यंतचे शिक्षण झाले.पुढे होशिंग विद्यालयात शिकलो.चित्रकलेची आवड होती.चित्रकलेच्या दोन्हीही परीक्षा मी इथेच पास झालो.आमच्या पायात चप्पल नसायची.जामखेड तालुका गरीब होता. कोणी कोणाची जात पाहत नसे.मुंबईपर्यंत जाण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागत.कापड दुकानापासून अनेक पडेल ती कामे केली.जिद्द होती.आपण खुजे आहोत,ही जाणीव आपल्याला कुठल्यातरी उंचीवर घेऊन जाते.हिंदी कटपीस मधून काव्य मैफिलीत हजेरी लावली.बड्या हिंदी कवी, साहित्यिकांच्या ओळखी झाल्या.अनेक राजकीय नेते यांच्याशी मैत्री झाली.नगर जिल्ह्यातील कानूर पठार येथे शिक्षक म्हणून रुजू झालो.ते आमदारकीचा प्रवास.एक चित्रपटासारखा डोळ्यासमोर उभा राहतो. रामदास फुटाणे यांच्या ८१ व्या .वाढदिवसानिमित्त जामखेडकरांमुळे घडवूनआलेला सत्कार सोहळा सदैव लक्षात राहील.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या