छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राच्या भूमीत हिंदवी स्वराज्याची स्थापना केली आणि इथल्या माणसाच्या मनात चैतन्याचे वारे संचारले.महाराष्ट्रात शिवशाही नंतर पेशवाई अवतरली.लोक कल्याणासाठी निर्माण केलेले हे राज्य विश्वस्तांच्या भूमिकेतून कसे जपले जाईल,याचा आदर्श ज्या ज्या राज्यकर्त्यांनी घालून दिला त्या राज्यकर्त्यांच्या यादीत होळकर घराण्याचा उल्लेख अतिशय आदराने आणि आपुलकीने केला जातो.स्वतःच्या राज्यात व राज्याबाहेर लोककल्याणाची कामे करून दिगंत कीर्ती मिळविणारे राज्यकर्ते होळकरांशिवाय दुसरे कोणीही नव्हते.या घराण्याविषयी आणि विशेषता:मल्हारराव होळकर व अहिल्याबाई होळकर यांच्या विषयी जनसामान्यांच्या मनात आजही प्रचंड आदर आहे.अहिल्याबाई होळकरावर संकटे आणि दुःखाचे प्रचंड डोंगर कोसळले तरी न डगमगता २८ वर्ष त्यांनी माळवा प्रांताचा कारभार मोठ्या कुशलतेने केला.राज्यकारभार करणाऱ्या त्यांच्या समकालीनांना व नंतरच्या राजांना त्यांचे जीवन मार्गदर्शक व स्फूर्तीदायक ठरेल असेच आहे.मराठवाड्यातील चौंडी येथील शिंदे पाटलाची मुलगी माळव्याच्या सुभेदाराची सून म्हणून येते आणि काही वर्षातच त्यांच्या कार्यकर्तृत्वाची नोंद सर्व भारतभर घेतली जाते. अठराव्या शतकात अहिल्याबाई सारखी पराक्रमी,स्वार्थ त्यागी,धर्मपरायण,लोककल्याणकारी कार्य करणारी तेजस्वी व्यक्ती विशेषतः भारताच्या इतिहासात कोठे झाली नाही.छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याच्या संकल्पनेला भारतभर विस्तारित करण्याचे महान कार्य अहिल्याबाई होळकरांनी केले आहे.याची दखल घेऊन ब्रिटिश पार्लमेंट ने त्यांना "अठराव्या शतकातील सर्वात महान महिला शासक".म्हणून गौरविले आहे.तर युरोपियन कवयित्री जोना बेले हिने अहिल्याबाई वर खंड काव्य लिहिले आहे.१९ व्या. शतकातील युरोपातील स्त्रीमुक्तीच्या चळवळीची प्रेरणा म्हणूनही अहिल्याबाई होळकरांचा उल्लेख अनेकांनी केला आहे.होळकर शाही ची प्रस्थापना करून मराठीशाहीचा उत्तर हिंदुस्थानात धबधबा निर्माण करणाऱ्या मल्हारराव होळकर यांनी निर्माण करून ठेवलेल्या पार्श्वभूमीवरच .अहिल्याबाई मधील कारभारक्षमता ओळखल्यामुळे सहजपणे, बाई म्हणून मल्हाररावांनी अहिल्याबाईंना कमी लेखले नाही. मुलगा खंडेराव होळकर यांच्या मृत्यूनंतर त्यांनी राज्यकारभार अहिल्याबाई कडे सोपवला.आणि राज्यकारभार करताना अहिल्याबाईंनीही स्वतःला कमी लेखले नाही. त्या काळातल्या अंतर्गत दुहीचा आणि स्वतःच्या राज्याच्या अस्तित्वाला अग्रक्रम देण्याच्या मर्यादेचा फास तत्कालीन राजकारणाला होता.त्याच्या पार जाण्याची आणि इंग्रजी सत्तेला पाय बंद घालण्यासाठी ,समाजाची आतून भक्कम बांधणी करीत,एकजूट करण्याची विशाल राजकीय दृष्टी कोणाकडेच नव्हती.सतराव्या अठराव्या शतकाचा काळ हा फुटीरतेने ग्रासलेला आणि लहान मोठ्या लढाया मध्येच राज्यकर्त्यांची आर्थिक, मानसिक शक्ती खर्च करणारा काळ होता.या पार्श्वभूमीवरच अहिल्याबाईंचे धर्माधिष्ठित राजकारण हे थोडे वेगळे ठरते.राजकारण आणि धर्मकारण या दोन्ही गोष्टींचे लोककल्याण हेच केंद्र अहिल्याबाईंनी ठेवले.धर्मकारण करताना प्रजा या शब्दाचा अर्थ केवळ होळकर संस्थानातील प्रजा एवढ्या पुरताच मर्यादित नव्हता.त्यांनी 'साऱ्या देशभरातील लोकसमूह'असा त्या शब्दाचा अर्थ विस्तार केला आणि धर्माच्या अनुषंगाने साऱ्या देशातअनेक लोकोपयोगी कामे उभी केली. .ज्या प्रदेशात मुस्लिम राजवट होती तिथेही हिंदू मंदिरांची बांधकामे केली. मंदिरे,दर्गा,घाट,पूल ,रस्ते ,वाडेतलाव,बारवा,धर्मशाळा,अन्नछत्रे बांधली. भारताबरोबरच भारताच्या बाहेर नेपाळमध्ये पशुपतीनाथाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केला. पाकिस्तानातील कराची जवळ त्यांनी बांधलेले शिवमंदिर आजही उभे आहे.अहिल्याबाई होळकर या राज्यकारभार करत असताना कर वसुलीसाठी राज्याचा व खाजगीचा असे दोन भाग त्यांनी केले होते.त्यांनी कटाक्षाने आपल्या खाजगी मिळकतीतून कौटुंबिक जबाबदाऱ्या निभावल्या.जो भाग दौलतीचा तो त्यांनी लोक कल्याणासाठी खर्च केला त्यातला एक पैसाही आपल्या खाजगी खर्चात येऊ नये असा त्यांचा काटेकोर व्यवहार होता.''दौलतीची एक कवडी मजकडे निघाली तर कवडीच्या पाच कवड्या देईन''. असे त्या म्हणत असत.अहिल्याबाई कडे सत्ता आली तेव्हा १६ कोटींचे द्रव्य आणि पंधरा लाखांची मिळकत होती.एवढ्या अमाप संपत्तीवर अहिल्याबाईंची एक हाती सत्ता होती.या सत्तेचा उपयोग त्यांनी लोककल्याणकारी कामासाठी केला.व्यक्तिगत जीवनात अनेक संकटातून तोड देत माळवा प्रांताचा त्यांनी राज्यकारभार केला,पण या सगळ्या कारभारात त्यांनी स्वतःची अर्थनीती आणि जलनीती ठरविली.राजकारण व समाजकारण या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत हे समजून त्यांनी त्यापुढे जाऊन नेतृत्व केले.सरकारी व्यवहार पाहण्यासाठी त्यांनी दरबारात तज्ञ मंडळींची एक समिती तयार केली होती,त्यांच्या साह्याने व सल्ल्याने त्या आर्थिक व्यवहार पाहत असत.त्यांनी दरबारातील अधिकारी मंडळींना पैशाचा योग्य विनियोग करण्यासाठी प्रशिक्षण दिले. त्यांची अर्थनीती अतिशय पारदर्शी होती. राज्यातील कष्टकरी ,शेतकरी, कामगार, उपेक्षित, वंचित घटक हा त्यांच्या विकासाचा केंद्रबिंदू होता. त्यामुळेच त्यांनी आदिवासी, भिल्ल ,भूमिहीन, शेतमजूर यांना त्यांनी माळरान, पडीक जमिनी कसावयास देऊन त्यांना जगण्याचे साधन निर्माण करून दिले. जमिनी कसताना त्या जमिनीत वीस फळ झाडे लावावीत त्यातील ११ फळझाडे सरकारची आणि ९ फळझाडे शेतकऱ्याची असे सूत्र ठरले.उत्पन्न वाढीसाठी वेगवेगळ्या तंत्राचा वापर केला.ग्राम विकास करताना चुकीचे काम करणाऱ्याला त्या खडसावत असत.गावाची सुरक्षा यालाही त्या महत्त्व देत असत.त्यासाठी त्यांनी चौकीदाराची व्यवस्था केली होती गावोगावी न्याय देणारे अधिकारी नेमले.महाराष्ट्र शासनाची आजच्या काळातील वृक्ष लागवडीची योजना त्यांनी त्या काळात राबवली.रस्त्याच्या दोन्ही बाजूंना वृक्ष लागवडीची कामे त्यांच्या काळात झाली. त्या काळात भारतातील महत्त्वाच्या तीर्थक्षेत्रांना पायी जाण्यासाठी रस्ते तयार केले.याच रस्त्यावर आज भारत सरकारचे राष्ट्रीय महामार्ग होत आहेत.सैन्य व्यवस्थापन चोख ठेवले.शिवाय स्वतंत्रपणे महिलांची फौज निर्माण करणाऱ्या त्या एकमेव महिला प्रशासक होत्या.एवढेच नाही तर राज्यात स्वतंत्र अशी पोलीस यंत्रणा ही त्यांनी उभी केली.न्यायदान तर त्या अशा करत की दोन्ही बाजू त्यांना दुवा देत असत.धर्मनिरपेक्षता त्यांच्या अंगी ठाई ठाई होती.त्यांनी अनेक मुस्लिम पीर,दर्गा यांना देणगी दिली. राज्यकारभार करताना त्यांनी जुन्या रुढीपरंपराना त्यांनी कायमच विरोध केला होता.सती जाणे,हुंडा घेणे,केशवपण या जुन्या वाईट चाली रीती मोडीत काढण्याचा प्रयत्न केला.शिक्षण विषयक दूरदृष्टी ही त्यांची मोठी व्यापक होती.त्यांनी राज्यात अनेक ठिकाणी गुरुकुल उभारले.त्यांच्या वैयक्तिक संग्रहात अनेक ग्रंथ होते.स्त्रियांचा सन्मान,कवी कलावंतांना प्रोत्साहन देणे,उत्तेजनार्थ अनेक बक्षीसे ही दिल्याची अनेक उदाहरणे इतिहासात आहेत.इंग्रज हे देशाचे शत्रू आहेत हे अहिल्याबाईंनी ओळखले होते.त्यांचे आक्रमण परतून लावण्यासाठी पेशव्यांच्या वकिलांना त्यांनी काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या होत्या.नानासाहेब पेशव्यांचा वकील अहिल्याबाई कडे आपली हुशारी दाखविण्यासाठी आला तेव्हा अहिल्याबाईं म्हणाल्या "इंग्रजांनी वसई घेतली म्हणजे देशात उपद्रव करतील मग पुणे कसे राहील?" हे भूगोलाचे व ब्रिटिश राजनीतीचे अहिल्याबाईंना असलेले ज्ञान पाहून तोही आश्चर्यचकित झाला.आपली एकुलती एक कन्या मुक्ताबाई तिचा विवाह त्यांनी पण लावून केला.त्यांनी दरबार भरवून असे आवाहन केले की,"जो कोणी तरुण आपल्या राज्यातील चोर,दरोडेखोरांचा बंदोबस्त करेल त्या तरुणांसोबत माझी कन्या मुक्ताबाई हिचा विवाह लावून देण्यात येईल". दरबारात आलेल्या यशवंतराव फणसे या कर्तबगार तरुणाने हा विडा उचलला.त्यानंतर अहिल्याबाईंनी त्याच्यासोबत काही फौज फाटा देऊन चोर दरोडेखोरांचा बंदोबस्त त्या तरुणांनी केला.पुढे मोठ्या थाटामाटात अहिल्याबाईंनी आपल्या एकुलत्या एक मुलीचा विवाह यशवंतराव फणसे सोबत लावून दिला. यावेळी तो तरुण कोणत्या जातीचा आहे हे न पाहता केवळ त्याची कर्तबदारी अहिल्याबाईंनी पाहिली.
उद्योग क्षेत्रातही त्यांनी मोठी कामगिरी केली होती.महेश्वरी साड्या विणण्याचा व्यवसाय त्यांनी महेश्वर येथे उभा केला होता तो व्यवसायआज तागायत सुरू आहे.त्यातून अनेकांना रोजगार मिळाला.स्त्रियांच्या हक्का विषयी त्यांना विशेष जागरूकता होती.विधवेच्या संपत्तीची लुबाणूक,तिच्या व्यवहारीक अज्ञानाचा गैरफायदा आणि तिचे शोषण सार्वत्रिक असण्याच्या काळात अहिल्याबाईंनी विधवांना अभय दिल्याचे आणि स्वतःची संपत्ती स्वतःच्या इच्छेप्रमाणे खर्च करण्यासाठी त्यांना प्रवृत्त केल्याचे अनेक पुरावे आहेत.उदार धर्मकारण,
कल्याणकारी राजकारण व समाजकारण करणाऱ्या अहिल्याबाई होळकरांनी आपल्या महेश्वरच्या वाड्यावर जी प्रतिज्ञा लिहिली आहे ती त्यांच्या विचारांची आणि जीवन विचाराची बैठक स्पष्ट करणारी आहे ती आजच्या सत्ताधाऱ्यांना जागे करणारी आहे.माझे कार्य प्रजेला सुखी करणे आहे.माझ्या प्रत्येक कृतीला मी स्वतः जबाबदार आहे.सत्तेच्या अधिकारामुळे मी जेथे जे जे काही करत आहे त्या प्रत्येक कृत्याचा जाब मला परमेश्वरापुढे देणे आहे.परमेश्वराने ज्या जबाबदाऱ्या माझ्यावर सोपवल्या आहेत. त्या मला पार पाडायच्या आहेत पुरुषप्रधान व्यवस्थेत व मध्ययुगीन अंदाधुंदीच्या काळात स्वच्छ आणि शिस्तबद्ध कारभार करणाऱ्या त्या रणरागिणी होत्या.मराठा कालखंडात जिजाबाई,येसूबाई ताराबाई,अशा कर्तबगार स्त्रियांची मालिका दिसून येते त्यात अहिल्याबाई होळकरांचे नाव लोककल्याणकारी व कर्तब गार स्त्री म्हणून इतिहासात नोंद आहे.संतत्व वृत्तीच्या लोकमाता पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी १३ ऑगस्ट १७७५ रोजी जगाचा निरोप घेतला.
प्राचार्य डॉ.रामकिशन दहिफळे
(महिला कलाहाविद्यालय, छत्रपती संभाजीनगर)

0 टिप्पण्या