Ticker

6/recent/ticker-posts

विभक्त कुटुंबपद्धतीच्या काळात आष्टीतील गुरव कुटुंबाचा अनोखा आदर्श; २५ जणांचे कुटुंब, एकाच छताखाली अन् एकच चूल!

आजच्या धकाधकीच्या आणि 'हम दो,हमारे दो'च्या जमान्यात सख्खे भाऊही एका छताखाली गुण्यागोविंदाने राहणे दुरापास्त झाले आहे.अशा विभक्त कुटुंबपद्धतीच्या लाटेत बीड जिल्ह्यातील आष्टी येथील भीमराव गुरव यांचे २५ सदस्यांचे कुटुंब समाजासाठी एक दीपस्तंभ बनून उभे आहे.पाच सख्खे भाऊ,पाच बहिणींसारख्या राहणाऱ्या जावा, त्यांची मुले-नातवंडे असा हा २५ जणांचा गोतावळा आजही एकाच छताखाली राहतो आणि विशेष म्हणजे या सर्वांचा स्वयंपाक आजही एकाच चुलीवर होतो.१६ मे रोजी असलेल्या 'जागतिक एकत्र कुटुंब दिना'च्या निमित्ताने या कुटुंबाच्या ३५ वर्षांच्या संघर्ष आणि यशाची ही विशेष यशोगाथा... शून्यातून विश्व उभारण्याची जिद्द ३५ वर्षांपूर्वीची ही गोष्ट.पारगाव (जोगेश्वरी) येथील रामदास गुरव यांचा थोरला मुलगा भीमराव अवघ्या १६ व्या.वर्षी पोटापाण्याचा शोध घेत आष्टीत आला.पाठीमागे पाच लहान भाऊ,आई- वडील आणि आजी अशी मोठी जबाबदारी होती. जोगेश्वरी देवीच्या मंदिराची देखभाल आणि तुटपुंजी जिरायती शेती यावर कुटुंबाची गुजराण होत नव्हती.आष्टीत आल्यावर भीमराव आणि बापूराव यांनी सुरुवातीला आष्टी नागरी पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलास सोनवणे,डॉ.आर.के.सानप,आणि डॉ.मधुकर हंबर्डे यांच्या दवाखान्यात कंपाऊंडर म्हणून काम सुरू केले.कुटुंबाला हातभार लावण्यासाठी आई रजनी गुरव यांनी धुणीभांड्याची कामे केली.गरिबीचे चटके बसत होते,पण कुटुंबाची एकजूट अतूट होती. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी इतर भावांनाही रोजगार मिळावा,या हेतूने मी (उत्तम बोडखे) आणि प्रफुल्लभाऊ सहस्त्रबुद्धे यांनी १९८६ मध्ये या भावंडांना लोकमत, झुंजारनेता आणि देवगिरी तरुण भारत या वृत्तपत्रांची एजन्सी दिली.इथूनच या कुटुंबाच्या प्रगतीचा खरा पाया रचला गेला.ऊन,वारा,पाऊस न बघता या भावंडांनी घरोघरी वर्तमानपत्रे पोहचवली.पुढे महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, सकाळसह तब्बल ३६ दैनिकांचे वितरण त्यांनी सुरू केले.जसजसा जम बसला तसतशी पाचही भावंडांची लग्ने झाली आणि घरात सुना आल्या.कुटुंबातील महिलांनीही नुसती चूल न सांभाळता घरगुती व्यवसाय सुरू केले.सर्वांच्या एकत्रित कष्टांतून 'जोगेश्वरी मंगल कार्यालय' उभे राहिले.जोगेश्वरी भोजनालय सुरू झाले.आज वृत्तपत्र विक्रीसोबतच फळ विक्री,थंड पाण्याचे जार,झेरॉक्स,रबर स्टॅम्प,जोगेश्वरी मेडिकल (औषधाचे दुकान) आणि हंगामी फटाके विक्री असे अनेक व्यवसाय हे कुटुंब एकत्रितपणे आणि यशस्वीपणे सांभाळत आहे. या कुटुंबाच्या यशाचे गमक त्यांच्या शिस्तीत दडले आहे.आजी कै.श्रीमती मैनाबाई (ज्यांचे माहेर पुण्याचे होते) यांनी कुटुंबाला उत्तम विचार आणि व्यवहारी भूमिकेची जोड दिली.पहाटे ४ वाजताच आजी सर्वांना दरडावून उठवायची. सकाळी ६ ते रात्री १२ वाजेपर्यंत सर्वजण अव्याहतपणे राबायचे.तेच कालचक्र आजही सुरू आहे.आज वडील आणि आजी हयात नाहीत, पण त्यांची शिकवण या कुटुंबाच्या सौख्याचा पाया बनली आहे. सध्या कुटुंबात भीमराव गुरव अण्णांची आई,५ भाऊ, ५ जावा, ७ मुली,४ मुले,विवाहित मुलगा अभिजीतची पत्नी (१ सून) आणि १ नातू असे एकूण २५ सदस्य आहेत. एकत्रित कुटुंबाच्या फायद्याविषयी बोलताना कुटुंबप्रमुख भीमराव गुरव सांगतात,"एकत्र राहिल्याने कोणत्याही वस्तूची घाऊक स्वरूपात खरेदी होते,ज्यामुळे पैशांची आणि वेळेची बचत होते. मंगल कार्यालय आणि भोजनालयासारखे मोठे व्यवसाय घरच्याच माणसांच्या श्रमशक्तीमुळे सहज शक्य होतात.सुख-दुःखात एकमेकांची भक्कम साथ असते,हाच सहजीवनाचा आणि सुखी जीवनाचा खरा मंत्र आहे.१६ मे हा दिवस गुरव कुटुंबासाठी दुहेरी आनंदाचा आहे.आज'जागतिक एकत्र कुटुंब दिवस'तर आहेच,शिवाय कुटुंबप्रमुख भीमराव गुरव आणि त्यांच्या पत्नी सौ.भाग्यश्री गुरव यांच्या विवाहाचा वाढदिवसही आहे.घरातल्या प्रत्येकाच्या सुखासाठी स्वतःच्या इच्छा बाजूला ठेवणारी,राग गिळून माया देणारी आणि या मोठ्या संसाराला खऱ्या अर्थाने स्वर्ग बनवणारी सौ.भाग्यश्रीताईंसारखी स्त्री या कुटुंबाचा कणा आहे. आजच्या काळात जिथे दोन भाऊ किंवा पिता-पुत्र एकत्र राहू शकत नाहीत,तिथे २५ जणांचे हे 'गुरव कुटुंब' एका जिवंत विद्यापीठासारखे आहे.जागतिक एकत्र कुटुंब दिनानिमित्त आणि विवाह वाढदिवसा निमित्त भीमराव गुरव,सौ.भाग्यश्री गुरव आणि या संपूर्ण कुटुंबाला त्यांच्या या आदर्श वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा! लेखक ---उत्तम बोडखे (ज्येष्ठ पत्रकार)
आष्टी. ------------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या