Ticker

6/recent/ticker-posts

चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि डोळ्यांतील सकारात्मकता दर्शवणानारा प्रसंग

माणूस जन्माला येतो,ही नैसर्गिक प्रक्रिया असली तरी;'माणुसकी'निर्माण करावी लागते,हे संस्कारांचे फळ असते.कौटुंबिक संस्कारांतून मुलांमध्ये चांगुलपणाचा दीपस्तंभ उभा राहतो.याच मूल्यांची पेरणी करत जीवन जगण्याची एक आदर्श रीत आष्टीच्या बोडखे परिवाराने आणि विशेषतः उत्तमराव बोडखे यांनी जपली आहे. आष्टी तालुक्यातील कडा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती संजयनाना ढोबळे आणि त्यांचे महाविद्यालयीन जीवनातील मित्र असलेले उत्तमराव बोडखे नुकतेच एका विवाह सोहळ्याच्या निमित्ताने एकत्र आले होते.या भेटीत गप्पांची मैफल रंगली आणि महाविद्यालयीन विद्यार्थी संसदेच्या निवडणुका,त्यातील डाव- प्रतिडाव अशा जुन्या आठवणींना उजाळा मिळाला.दिलखुलास गप्पांच्या या मैफिलीत दोन मित्रांमधील जिव्हाळा पुन्हा एकदा नव्याने फुलून आला.मैत्रीचे आणि स्नेहाचे हे धागे ज्या एका गोष्टीमुळे घट्ट विणलेले असतात,
ती गोष्ट म्हणजे माणसातील 'माणुसकी'. याच माणुसकीचा आणि सकारात्मक दृष्टीचा परिपाठ आष्टीच्या बोडखे परिवारातील उत्तमभाऊंच्या माध्यमातून आपल्याला पदोपदी पाहायला मिळतो.पूर्णवेळ पत्रकारितेचा वसा स्वीकारून सलग अडीच दशकांहून अधिक काळ त्यांनी या क्षेत्रात आपली एक स्वतंत्र आणि भक्कम ओळख निर्माण केली आहे. 'दैनिक झुंजारनेता'चे उपसंपादक आणि एक ज्येष्ठ पत्रकार म्हणून कार्य करत असताना त्यांच्या लेखणीतून नेहमीच विधायकतेचा सूर उमटला आहे.त्यांच्या या कार्यकर्तृत्वाचा सार्थ अभिमान केवळ आष्टी तालुक्यालाच नव्हे, तर संपूर्ण बीड जिल्ह्याला वाटतो.त्यांच्या याच निरलस सेवेला साद घालत आजवर अनेक मानाच्या पुरस्कारांनी त्यांच्या विविध अंगी व्यक्तिमत्त्वाचा गौरव केला आहे. उत्तमराव बोडखे म्हणजे समाजकारणात आणि मैत्रीत नेहमी 'बेरजेचे'काम करणारे व्यक्तिमत्त्व.चेहऱ्यावर सदैव हास्य आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार असलेल्या या माणसाने इतरांसाठी एक अनोखा आदर्श निर्माण केला आहे.समाजातील प्रत्येक घटकासाठी ते नेहमी हक्काने उपलब्ध असतात.कुणाच्या घरचे लग्न असो,धार्मिक कार्यक्रम असो,राजकीय सोहळा असो वा कुणाच्या घरातील दुःखद प्रसंग;उत्तमराव तिथे आवर्जून उपस्थित राहतात.इतरांच्या आनंदात आपला आनंद शोधणारे आणि दुःखात खंबीरपणे पाठीशी उभे राहणारे उत्तमराव हे खऱ्या अर्थाने समाजातील एक'अजब रसायन'आहेत.विविध जाती,धर्म,पंथ आणि वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या सीमा ओलांडून त्यांच्याभोवती सातत्याने जमलेला मित्रांचा अफाट गोतावळा,हीच त्यांच्यातील'माणुसकीच्या माणसाची'आणि त्यांच्या निखळ स्वभावाची खरी पावती आहे. चौकट -------- नुकतेच आष्टी तालुक्यातील एका कार्यक्रमात राजकीय व्यक्तिमत्त्वाला साजेसा असा रुबाबदार पोशाख परिधान करून उत्तमराव हसतमुखाने सहभागी झाले होते.या आनंदी क्षणी एका छायाचित्रकाराने टिपलेला त्यांचा अत्यंत नैसर्गिक आणि जिवंत फोटो सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.चेहऱ्यावरील प्रसन्नता आणि डोळ्यांतील सकारात्मकता दर्शवणारा हा फोटो केवळ एक प्रतिमा नसून,तो पाहणाऱ्या प्रत्येकाला जीवन जगण्याची नवी प्रेरणा आणि ऊर्जा देणारा ठरेल,हे मात्र नक्की! -------------------- ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या