Ticker

6/recent/ticker-posts

मातृभाषेची २९ वर्षांची अविरत सेवा; प्रा.संपत गर्जे ठरले साहित्यातील 'मुकुटमणी'! ----------------- ३६ पुरस्कारांवर कोरले नाव; ६ पुस्तकांचे यशस्वी प्रकाशन

आष्टी (प्रतिनिधी) संत-महंतांच्या विचारधारेचा वारसा जपत,अत्यंत संवेदनशीलतेने आणि जिद्दीने तब्बल २९ वर्षे ज्ञानदानाचे पवित्र कार्य करणारे भारतीय जैन संघटना (पुणे) येथील ज्येष्ठ शिक्षक प्रा.संपत गर्जे हे साहित्य क्षेत्रातील खऱ्या अर्थाने 'मुकुटमणी' ठरले आहेत.त्यांच्या या प्रदीर्घ आणि बहुआयामी शैक्षणिक, सामाजिक व साहित्यिक सेवेची दखल घेतली.बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेल्या प्रा.गर्जे यांच्या या यशाने जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे.उच्च विद्याविभूषित प्रा.संपत माणिकराव गर्जे यांनी पुणे येथील संत तुकारामनगर भागातील भारतीय जैन संघटना संचलित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात २९ वर्षे अध्यापनाचे कार्य केले.केवळ वर्गातच न रमता त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये मातृभाषेची गोडी निर्माण केली.त्यांच्या या प्रदीर्घ सेवेबद्दल त्यांना आतापर्यंत तब्बल ३६ विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्यांची ६ पुस्तके प्रकाशित झाली आहेत जी साहित्य वर्तुळात लोकप्रिय ठरली आहेत.प्रा.गर्जे हे केवळ शिक्षकच नाहीत तर एक उत्तम समाजसेवकही आहेत.१९९३ च्या लातूर-किल्लारी भूकंपात आणि गुजरातमधील भुज येथील महाभयंकर भूकंपात त्यांनी प्रत्यक्ष कृतीयुक्त सहभाग नोंदवून विद्यार्थ्यांसाठी ज्ञानार्जन व पुनर्वसनाचे कार्य केले. पुणे येथे आयोजित भव्य प्लास्टिक सर्जरी शिबिराचे 'कोऑर्डिनेटर' म्हणूनही त्यांनी मोलाची जबाबदारी पार पाडली.राष्ट्रसंत भगवानबाबा विचार मंचाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांना भगवानबाबांच्या नावाने पुरस्कार देऊन प्रोत्साहित करण्याचा त्यांचा उपक्रम सातत्याने सुरू आहे. अनेक आध्यात्मिक संस्था आणि मंदिरांना आर्थिक मदत करण्यासोबतच,राज्यभरात विविध ठिकाणी अखंड हरिनाम सप्ताह आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचने देऊन त्यांनी प्रबोधनाचे कार्य केले आहे.विविध आध्यात्मिक व शैक्षणिक कार्यक्रमांचे खुमासदार सूत्रसंचालन हा त्यांचा हातखंडा आहे.जलसंधारण ही काळाची गरज ओळखून वृक्षारोपणाचे महत्त्व पटवून देणे हा त्यांच्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय राहिला आहे.राज्य, विभाग आणि जिल्हास्तरीय वक्तृत्व स्पर्धांचे परीक्षक तसेच ज्येष्ठ नागरिक संघांमधून त्यांच्या प्रबोधनपर व्याख्यानांनी राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. 'महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघा'चे प्रदेश कार्याध्यक्ष म्हणूनही त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवून दिली आहे.अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी ग्रामीण पोलिस दलामार्फत राज्यस्तरीय विद्यार्थ्यासाठी काही वर्षांपूर्वी वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या.त्याचे मुख्य परीक्षक म्हणून तीनही फेरीमध्ये कामकाज पाहिले होते.त्यामुळे नांगरे यांनी प्रा.संपत गर्जे यांना सन्मानित केले होते. चौकट --------- मातृभाषेची निरंतर सेवा करत प्रा.संपत गर्जे यांनी देशपातळीवर कर्तृत्व गाजवणारे अनेक विद्यार्थी घडवले.शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक आणि वैचारिक अशा विविध क्षेत्रांत त्यांचे योगदान अतुलनीय आहे.३६ पुरस्कार आणि ६ दर्जेदार पुस्तके त्यांच्या साहित्य सेवेची साक्ष देतात. ते खऱ्या अर्थाने या क्षेत्रातील 'मुकुटमणी'आहेत! अशा शब्दांत त्यांच्या कार्याचा गौरव करण्यात आला.महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी भाषा विषय शिक्षक महासंघाचे बीड जिल्हा सचिव प्रा.बिभीषण चाटे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी प्रा.संपत गर्जे यांचे अभिनंदन केले आहे. -------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या