Ticker

6/recent/ticker-posts

देशातील २३ लाख विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या स्वप्नांना मोठा धक्का ------------------ 'नीट' परीक्षा रद्द: नैराश्य झटकून स्वतःला पुन्हा सिद्ध करण्याची वेळ!

मजकूर,तंत्रज्ञान आणि विविध परीक्षांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या अनेक घटना आपण ऐकल्या असतील; पण जेव्हा देशातील सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या वैद्यकीय प्रवेश परीक्षेला याचा फटका बसतो, तेव्हा लाखो विद्यार्थ्यांचे भविष्य पणाला लागते.नॅशनल टेस्टिंग एजन्सीने ३ मे २०२६ रोजी झालेली 'NEET-UG २०२६' ही परीक्षा 'पेपर फुटीच्या' गंभीर आरोपांमुळे अधिकृतपणे रद्द केली आहे.या एका निर्णयामुळे वैद्यकीय क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या देशभरातील सुमारे २३ लाख विद्यार्थ्यांच्या आणि त्यांच्या पालकांच्या स्वप्नांना मोठा धक्का बसला आहे.त्यांची अहोरात्र केलेली मेहनत तूर्तास अधांतरी लटकली आहे.या संपूर्ण प्रकरणाचे नेमके परिणाम काय आहेत,याचे कायदेशीर पैलू कोणते आणि आता २१ जून २०२६ रोजी होणाऱ्या आगामी पुनर्परीक्षासाठी कशी तयारी करावी, यावर प्रकाश टाकणारा हा डॉ.संदीप हंबर्डे यांचा हा विशेष लेख. -------------- पेपर फुटीचा शिक्षण व्यवस्थेवर आणि विद्यार्थ्यांवर होणारा आघात पेपर फुटीची ही घटना केवळ एक प्रशासकीय चूक नाही, तर तो संपूर्ण शिक्षण व्यवस्थेचा पराभव आहे.याचे विद्यार्थ्यांच्या आणि समाजाच्या मानसिकतेवर अत्यंत गंभीर परिणाम होतात: दोन-दोन,तीन-तीन वर्षे सर्वस्व पणाला लावून,अहोरात्र अभ्यास करणाऱ्या प्रामाणिक विद्यार्थ्यांचे यामुळे मोठे मानसिक संतुलन बिघडते.परीक्षा अचानक रद्द झाल्याने त्यांच्यात नैराश्य आणि चिंतेचे ढग दाटून येतात.जेव्हा परीक्षा पद्धतीच अपयशी ठरते,तेव्हा पैशांच्या जोरावर पेपर विकत घेणारे अयोग्य उमेदवार पुढे येतात आणि रात्रंदिवस एक करणारी गुणवंत, हुशार मुले मागे पडतात.हा गुणवत्तेवर झालेला सर्वात मोठा अन्याय आहे.देशातील सर्वात पारदर्शक मानल्या जाणाऱ्या 'NTA'सारख्या परीक्षा यंत्रणेवरील विद्यार्थ्यांचा आणि पर्यायाने जनतेचा विश्वास पूर्णपणे उडतो.परीक्षा पुढे ढकलली गेल्याने विद्यार्थ्यांचे केवळ शैक्षणिक नुकसान होत नाही,तर कोचिंग क्लासेस,प्रवास,राहण्याचा खर्च आणि फी या स्वरूपात पालकांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होते. निष्पाप विद्यार्थी आणि पालकांना मिळणारी'अकारण' शिक्षा या संपूर्ण घोटाळ्यात ज्यांचा काडीमात्र संबंध नव्हता,अशा निष्पाप विद्यार्थ्यांना आणि त्यांच्या पालकांना सर्वात मोठी आणि अकारण शिक्षा सोसावी लागत आहे.आपल्या मुलाला किंवा मुलीला डॉक्टर बनवण्याचे स्वप्न उराशी बाळगून अनेक मध्यमवर्गीय पालक कर्ज काढतात,पोटाला चिमटा काढून लाखो रुपयांची फी भरतात.परीक्षा रद्द झाल्याने पालकांवर पुन्हा एकदा आर्थिक ताण पडतो आणि मुलांच्या अनिश्चित भविष्याची चिंता त्यांना सतावू लागते. विद्यार्थ्यांचा दुप्पट संघर्ष ---------- ज्या मुलांनी ३ मे च्या परीक्षेसाठी आपली पूर्ण ताकद पणाला लावली होती,त्यांना आता पुन्हा त्याच मानसिकतेत येऊन शून्यापासून नव्याने सुरुवात करावी लागत आहे. हा त्यांच्या मानसिकतेची परीक्षा पाहणारा काळ आहे.पेपर फुटी रोखण्यासाठी कायदेशीर आणि प्रशासकीय उपाय भविष्यात अशा दुर्दैवी घटना घडू नयेत,यासाठी सरकारने आणि न्यायव्यवस्थेने आता अत्यंत कठोर पावले उचलणे काळाची गरज बनली आहे.केंद्रसरकारने आणलेल्या सार्वजनिक परीक्षा (गैरप्रकारांना प्रतिबंध) कायद्यांतर्गत दोषींना १० वर्षांपर्यंतचा कारावास आणि १ कोटी रुपयां पर्यंतच्या दंडाची तरतूद आहे.या शिक्षण माफियांना फास्ट ट्रॅक कोर्टाद्वारे तात्काळ आणि कठोर शिक्षा झाली पाहिजे,तरच याला आळा बसेल. आगामी काळात ओएमआर आधारित ऑफलाईन परीक्षा पद्धती बंद करून,पूर्णपणे सुरक्षित अशा संगणक आधारित (कॉम्पुटर बेस्ड टेस्ट) परीक्षा पद्धतीचा अवलंब करावा.यामुळे वाहतुकीदरम्यान किंवा छपाईदरम्यान पेपर लीक होण्याचा धोका जवळपास संपुष्टात येईल. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या प्राध्यापकांपासून ते परीक्षा केंद्राच्या पर्यवेक्षकांपर्यंत सर्वांची कडक पार्श्वभूमी तपासणी (बॅकग्राऊंड चेक) होणे अनिवार्य आहे.या प्रकरणाची सीबीआयसारख्या केंद्रीय यंत्रणांद्वारे सखोल चौकशी होणे गरजेचे आहे. पुनर्परीक्षेची २०२६' ची तयारी कशी करावी? (नवी रणनीती) राष्ट्रीय परीक्षा संस्थेने आता २१ जून २०२६ ही पुनर्परीक्षेची नवीन तारीख जाहीर केली आहे.विद्यार्थ्यांकडे आता अतिशय मर्यादित वेळ शिल्लक आहे.त्यामुळे निराश न होता नवी रणनीती आखणे आवश्यक आहे. नकारात्मकता दूर करा ----------- जे झाले ते आपल्या हातात नव्हते,हे वास्तव स्वीकारा.पण आता मिळणारी ही 'दुसरी संधी'कोणत्याही परिस्थितीत सोडायची नाही,हा ठाम विचार मनात ठेवा.३ मे च्या परीक्षेत तुमचे जे प्रश्न चुकले होते किंवा ज्या प्रकरणांमध्ये (टॉपिकस) तुम्ही कमी पडलात,त्यावर आता जास्त लक्ष केंद्रित करा.ही वेळ त्या त्रुटी भरून काढण्याची आहे. मुख्य परीक्षेचा पॅटर्न लक्षात घेता,जीवशास्त्र (Biology), रसायनशास्त्र (Chemistry) आणि भौतिकशास्त्र (Physics) या तिन्ही विषयांसाठी केवळ NCERT च्या पुस्तकांचेच वारंवार वाचन आणि उजळणी करा. मॉक टेस्ट आणि टाईम मॅनेजमेंट ---------- दररोज किंवा दिवसाआड किमान एक पूर्ण लांबीची मॉक टेस्ट घड्याळ लावून सोडवा.यामुळे तुमचा आत्मविश्वास दुणावेल आणि पेपर सोडवण्याचा वेगही वाढेल. चौकट -------- विद्यार्थी आणि पालकांसाठी मोलाचा सल्ला विद्यार्थ्यांसाठी लक्षात ठेवा,तुमचे ज्ञान आणि तुमची मेहनत कोणीही चोरू शकत नाही.पेपर लीक करणाऱ्या माफियांनी सिस्टीम फसवली असेल,पण ते तुमच्या बुद्धिमत्तेची आणि कष्टाची बरोबरी कधीच करू शकत नाहीत.स्वतःवर अढळ विश्वास ठेवा. २१ जून रोजी होणाऱ्या परीक्षेत तुमची जागा केवळ आणि केवळ तुमच्या गुणवत्तेच्या जोरावर निश्चित करा. चौकट ------- पालकांसाठी या कठीण काळात तुमच्या पाल्याला तुमच्या आधाराची आणि समजुतीची सर्वात जास्त गरज आहे.त्यांच्यावर गुणांचा किंवा अभ्यासाचा अतिरेकी दबाव टाकू नका.त्यांच्याशी मोकळा संवाद साधा,त्यांच्या आरोग्याची काळजी घ्या आणि पाठीवर हात ठेवून त्यांना विश्वासाने सांगा'आम्ही तुझ्यासोबत आहोत.' तुमचे हे प्रोत्साहनच त्यांना या संकटातून बाहेर काढून यशाच्या शिखरावर पोहोचवेल. चौकट ------- NEET २०२६ रद्द होणे हे अत्यंत दुर्दैवी आणि क्लेशदायक असले,तरी अंतिमतः प्रामाणिकपणाचाच विजय नक्की होईल.सीबीआय तपास सुरू असून दोषींना त्यांच्या कर्माची शिक्षा मिळेलच;परंतु विद्यार्थ्यांनी आता या वादात न पडता आपले संपूर्ण लक्ष आणि ऊर्जा २१ जूनच्या पुनर्परीक्षेवर केंद्रित करावी.'लढा आणि जिंका! हीच वेळ आहे स्वतःला सिद्ध करण्याची.तुम्हाला तुमच्या पुढील वाटचालीस आणि आगामी परीक्षेसाठी मनःपूर्वक शुभेच्छा! ------------- लेखक- डॉ.संदीप हंबर्डे, (छत्रपती संभाजीनगर/आष्टी.)
----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या