
आष्टी (प्रतिनिधी)
आजच्या तरुण पिढीने मोबाईलच्या आभासी दुनियेत न रमता संतविचार,सुसंस्कार आणि समाजसेवेचा मार्ग पत्करावा असे मार्मिक प्रतिपादन ह.भ.प.शिवाजी महाराज कोकणे यांनी केले.
महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्यावतीने आष्टी येथे आयोजित अखंड हरिनाम सप्ताहात कीर्तनसेवा देताना ते बोलत होते.त्यांच्या रसाळ कीर्तनाने आणि हरिनामाच्या गजराने संपूर्ण आष्टी परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता.
आजची तरुण पिढी मोबाईलच्या विळख्यात अडकत चालल्याबद्दल खंत व्यक्त करत ह.भ.प.कोकणे महाराजांनी तरुणांना स्वाभिमानाने जगण्याचा कानमंत्र दिला.ते म्हणाले, आई-वडिलांचा सन्मान करणारा,धर्माच्या रक्षणासाठी ठामपणे उभा राहणारा आणि अन्यायाविरुद्ध सडेतोड आवाज उठवणारा युवकच खऱ्या अर्थाने 'स्वाभिमानी' असतो.स्वाभिमान म्हणजे अहंकार नव्हे,तर तो स्वतःच्या संस्कृतीचा,कष्टाचा आणि आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा अभिमान असतो. पैसा,पद आणि प्रतिष्ठा या गोष्टी क्षणभंगुर आहेत,मात्र माणसाचे चारित्र्य आणि स्वाभिमान आयुष्यभर टिकतो.सत्य,प्रामाणिकपणा आणि धर्माच्या मार्गावर चालणारा माणूसच खऱ्या अर्थाने श्रीमंत असतो.समाजाच्या जडणघडणीत धर्मसत्तेचे महत्त्व विशद करताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श उपस्थितांसमोर ठेवला.शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करताना संतांच्या विचारांना आणि शिकवणीला नेहमीच संरक्षण दिले.जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या कीर्तनात स्वतः उपस्थित राहून त्यांनी धर्मसत्तेचा सन्मान केला.राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या या संगमामुळेच शिवरायांचे कार्य आजही संपूर्ण जगासाठी दीपस्तंभासारखे प्रेरणादायी ठरत आहे.मनसे शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष कैलास दरेकर यांच्या पुढाकाराने आयोजित या सप्ताहामुळे आष्टी शहरात अध्यात्म, संस्कार आणि समाज प्रबोधनाचे अत्यंत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.दररोज विविध नामांकित कीर्तनकारांच्या माध्यमातून समाजाला धर्मरक्षण,स्वाभिमान आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश दिला जात आहे.
या कीर्तन सोहळ्यास आयोजक कैलास दरेकर यांच्यासह संतोष कदम,शिवाजी भराटे,गणेश दळवी तसेच आष्टी शहर व परिसरातील ग्रामस्थ आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.सप्ताहातील विविध धार्मिक कार्यक्रमांना नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभत आहे.
---------------
0 टिप्पण्या