नम्रता हाच जीवन सुधारण्याचा खरा मार्ग असतो आणि आई-वडिलांचे संस्कार हेच माणसाचे खरे विद्यापीठ असते. समाजात बाभळीची झाडे पावलोपावली मिळतात, परंतु सुवासिक चंदन मात्र शोधावे लागते. याच न्यायाने, साहित्याच्या आणि वाचनाच्या अखंड प्रेमातून समाजातील अंधार दूर करण्यासाठी झटणाऱ्या एक 'चंदन' म्हणजे ख्यातनाम समतावादी हिंदी साहित्यिक आणि समाजसेविका डॉ.आशा फड ग्रामीण भागातून अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून पुढे येऊन साहित्यात व शिक्षण क्षेत्रात आपला स्वतंत्र ठसा उमटवणाऱ्या प्रा.डॉ.आशा फड यांचा आज वाढदिवस. त्यांच्या या संघर्षमय आणि प्रेरणादायी प्रवासाचा सौ.
बबिताताई बोडखे यांनी घेतलेला हा विशेष आढाव...
------------------
एका अत्यंत सर्वसामान्य परिस्थितीतून आणि ग्रामीण भागातून आलेल्या प्रा.डॉ.आशा फड यांचा प्रवास मुळीच सोपा नव्हता.मात्र, त्यांच्यातील सुस्वभावी,शांत आणि संयमी वृत्तीने त्यांना नेहमीच बळ दिले.शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांच्यातील प्रतिभा फुलू लागली होती. भाषण,लेखन,गायन आणि एकांकिका-नाटकांमध्ये त्यांचा नेहमीच सक्रिय सहभाग असायचा.
कठोर परिश्रमांच्या जोरावर त्यांनी इयत्ता दहावी ते पीएच.डी.पर्यंतचे शिक्षण अत्यंत यशस्वीरित्या पूर्ण केले.एम.ए., बी.एड.,एम.फिल.,सेट आणि पीएच.डी. यांसारख्या उच्च पदव्या त्यांनी प्राप्त केल्या.त्यांच्या या यशामुळे ग्रामीण भागातील अनेक मुलींसाठी त्या एका 'प्रेरणास्त्रोत' बनल्या आहेत.वयाच्या अवघ्या अकराव्या वर्षापासून डॉ. फड यांनी कविता आणि विविध विषयांवर लेखन करण्यास सुरुवात केली. वर्तमानपत्रांमधील विस्तृत लेखनातून त्यांनी विशेषतः स्त्रियांच्या समस्या अतिशय प्रभावीपणे मांडल्या आहेत.
मनोरंजनासोबतच शैक्षणिक,सामाजिक,धार्मिक,वैचारिक आणि सांस्कृतिक अशा सर्वच अंगांनी त्यांचे लेखन बहरले आहे.लोककला ही महाराष्ट्राची प्रबोधनाची महत्त्वाची परंपरा आहे,हे ओळखून त्यांनी या माध्यमातूनही लेखन आणि सादरीकरण केले आहे.केवळ साहित्यापुरते मर्यादित न राहता डॉ.आशाताईंनी स्वतःला सामाजिक कार्यात झोकून दिले आहे.आरोग्य चिकित्सा,रक्तदान शिबिरे, प्रौढ साक्षरता,अंधश्रद्धा निर्मूलन,व्यसनमुक्ती आणि वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमध्ये त्यांचा प्रत्यक्ष सहभाग असतो.समाजातील वाईट प्रवृत्तींवर प्रहार करण्यासाठी त्यांनी पथनाट्यांच्या माध्यमातून वैचारिक प्रबोधन केले आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या गरीब आणि गरजू मुलींशी संपर्क साधून त्यांना मोलाचे मार्गदर्शन व मदत करण्याची त्यांची कृती अत्यंत वाखाणण्याजोगी आहे.छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर,राजर्षी शाहू महाराज, महात्मा जोतीराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या विचारांवर आधारित व्याख्यानमाला आणि उपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच हिरिरीने सहभाग नोंदवला आहे.
'महाराष्ट्र राज्य नेट,सेट,पीएच.डी.धारक संघर्ष समिती'च्या बीड जिल्हा समन्वयक म्हणून त्यांचे कार्य अत्यंत लक्षवेधी राहिले आहे.
ईश्वरावर अढळ श्रद्धा ठेवत समता,शांतता,बंधुत्व आणि सर्वधर्मसमभाव ही मूल्ये समाजात रुजविणाऱ्या डॉ. आशा फड यांच्या कार्याची दखल विविध स्तरांवर घेतली गेली आहे:
साहित्य व शिक्षण क्षेत्रातील अमूल्य योगदानाबद्दल बीडच्या तत्कालीन जिल्हाधिकारी दीपा मुधोळ-मुंडे यांच्या हस्ते त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला.
उत्कृष्ट कादंबरी लेखनासाठी 'राजस्थान साहित्य सेवा मंडळा'चा प्रतिष्ठेचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला आहे. 'नॉलेज प्लांट'च्या वतीने त्यांना या अत्यंत मानाच्या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.बीड येथील मातृभूमी प्रतिष्ठानतर्फे शैक्षणिक,संशोधन व साहित्य क्षेत्रातील योगदानाबद्दल विशेष पुरस्कार.
याशिवाय राष्ट्रीय,राज्य,विभाग आणि जिल्हा पातळीवरील अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आले आहे.
चौकट
--------
निस्वार्थपणे स्त्री समस्यांच्या अनुषंगाने लेखन करणाऱ्या आणि तन-मन-धनाने मातृप्रेम, देशप्रेम, ऐक्य व बंधुता या मूल्यांची समाजाला शिकवण देणाऱ्या प्रा.डॉ.आशा फड यांचे कार्य खऱ्या अर्थाने स्तुत्य आहे.समाजातील अज्ञानाचा अंधार दूर करणाऱ्या या गुणी आणि प्रतिभाशाली 'सावित्रीच्या लेकीला' आज वाढदिवसानिमित्त

साहित्याच्यावतीने आणि सौ.बबीताताई बोडखे यांच्यासह बोडखे परिवाराच्या वतीने उदंड आयुष्याच्या व पुढील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा..
----------------
0 टिप्पण्या