आष्टी (प्रतिनिधी)
आष्टी तालुक्यातील कडा येथील आनंदराव धोंडे उर्फ बाबाजी महाविद्यालयाचे ग्रंथपाल प्रा.डॉ.शाम तुकाराम सांगळे दि. ३० जून रोजी सेवानिवृत्त होत आहेत.त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय सेवेचा सन्मान करण्यासाठी शनिवारी,दि.३० मे २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयाच्या प्रांगणात एका भव्य 'सेवापूर्ती व गौरव ग्रंथ प्रकाशन'सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.आनंद चॅरिटेबल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी आमदार आदरणीय भीमराव धोंडे हे या सोहळ्याचे अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. प्रा.डॉ.सांगळे यांनी ग्रंथालय क्षेत्रात आणि विद्यार्थी घडवण्यात दिलेल्या योगदानाचा कृतज्ञतापूर्वक सन्मान म्हणून त्यांच्या जीवनकार्यावरील एका विशेष 'गौरव ग्रंथाचे' प्रकाशन या मुख्य कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे.
महामानवांच्या विचारांचा जागर:
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे यांचे कीर्तन
-------------
या सेवापूर्ती सोहळ्याचे प्रमुख आकर्षण म्हणजे, शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारसरणीचे गाढे अभ्यासक आणि राष्ट्रीय कीर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज वाबळे (आळंदी, पुणे) यांचे प्रबोधनपर हरिकीर्तन.सकाळी १० ते १२ या वेळेत हा कीर्तनाचा कार्यक्रम पार पडेल.
आपल्या निरुपणातून वाबळे महाराज छत्रपती शिवाजी महाराज,छत्रपती शाहू महाराज,महात्मा जोतीराव फुले आणि भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या समतावादी व पुरोगामी विचारांवर प्रकाश टाकणार आहेत.या महामानवांच्या विचारांची आजच्या आधुनिक समाजाला किती नितांत आवश्यकता आहे,याचा जागर या कीर्तनातून होणार आहे.कीर्तनाच्या सांगतेनंतर मुख्य सत्कार सोहळा आणि पुस्तक प्रकाशन पार पडेल.विद्यार्थी आणि वाचक वर्गाशी नेहमीच आपुलकीचे नाते जपणाऱ्या प्रा.डॉ.शाम सांगळे यांच्या या सन्मान सोहळ्याला,तसेच या प्रबोधनपर कीर्तनाचा लाभ घेण्यासाठी परिसरातील नागरिक,विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे,असे आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.हरिदास विधाते,सर्व प्रशासन अधिकारी,प्राध्यापक वृंद आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वतीने करण्यात आले आहे.

0 टिप्पण्या