Ticker

6/recent/ticker-posts

अहिल्यानगरमध्ये उद्यापासून रंगणार 'शब्दगंध राज्यस्तरीय साहित्य संमेलन' -------------- साहित्य, संस्कृती, काव्य आणि प्रबोधनाचा उडणार बार; नामवंत साहित्यिकांची मांदियाळी

आष्टी (प्रतिनिधी) शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय राज्यस्तरीय 'शब्दगंध साहित्य संमेलना'ला आज,शनिवार दि.२३ मे पासून अहिल्यानगर येथे दिमाखात सुरुवात होत आहे. शनिवार आणि रविवार असे सलग दोन दिवस साहित्य,संस्कृती,काव्य,गझल,परिसंवाद आणि सामाजिक प्रबोधनाचा बहारदार मेळा येथे रंगणार असून,राज्यभरातील साहित्यिक,कवी,गझलकार आणि विचारवंतांच्या उपस्थितीमुळे यंदाचे संमेलन विशेष लक्षवेधी ठरणार असल्याची माहिती स्वागताध्यक्ष तथा नगरसेवक सुरेश बनसोडे आणि शब्दगंधचे संस्थापक सुनील गोसावी यांनी दिली आहे. संमेलनाचे रीतसर उद्घाटन शनिवार, २३ मे रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्याचे क्रीडा व युवक कल्याण तथा कृषिमंत्री दत्तात्रय विठ्ठल ऊर्फ दत्तामामा भरणे यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.या सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून आ. संग्रामभैय्या जगताप,महापौर ज्योतीताई गाडे,उपमहापौर धनंजय जाधव,मनपा आयुक्त यशवंतराव डांगे,माजी संमेलनाध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम भापकर आणि डॉ.संजीवनी तडेगावकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. उद्घाटन सोहळ्यापूर्वी महापुरुषांना अभिवादन करण्यात येईल. यानंतर शाहिरी जलसा सादर होणार असून,यामध्ये शाहीर कल्याण काळे,हमीद सय्यद,भारत गाडेकर,वसंत डंबाळे यांच्यासह अनेक नामवंत कलाकार आपली कला सादर करणार आहेत.वैचारिक परिसंवाद आणि काव्यमैफील या दोन दिवसीय संमेलनात वैचारिक मंथनासाठी विविध परिसंवादांचे आयोजन करण्यात आले आहे.यामध्ये आधुनिक साहित्यातील स्त्री जीवनाचे चित्रण”बदलते ग्रामीण जीवन आणि ग्रामसंस्कृती” तसेच असा मी घडलो.यांसारख्या अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयांवर मान्यवर विचारमंथन करतील.याशिवाय,रसिक श्रोत्यांसाठी खुले काव्य संमेलन, निमंत्रितांचे काव्य संमेलन आणि खास गझल संमेलन ही यंदाच्या संमेलनाची प्रमुख आकर्षणे असणार आहेत. महाराष्ट्रातील नावाजलेले कवी आणि गझलकार यात सहभागी होऊन रसिकांना मंत्रमुग्ध करतील. ग्रंथ प्रकाशन आणि पुरस्कार वितरण रविवारी,संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी ग्रंथ प्रकाशन सोहळा पार पडेल. यामध्ये ‘प्रारब्ध’, ‘अंतरी’, ‘माणसं अशी अन तशीही’,आणि ‘निशब्द भावना’ या नूतन पुस्तकांचे प्रकाशन होणार आहे. याचबरोबर सुनील गोसावी संपादित ‘शब्दसंचित’ या ग्रंथाचेही मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन केले जाणार आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि प्रबोधन क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानाबद्दल यंदाचा प्रतिष्ठेचा “शब्दगंध जीवनगौरव पुरस्कार २०२६” प्रा.डॉ.गणी पटेल आणि आयु.अशोकराव गायकवाड यांना प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र उदागे यांनी दिली.वाचन संस्कृतीला अधिक चालना देण्यासाठी संमेलनस्थळी 'स्व.अरुणकाका साहित्य नगरी'उभारण्यात आली असून,येथे ग्रंथ विक्रेत्यांचे स्वतंत्र स्टॉल असणार आहेत.दरवर्षीप्रमाणे यंदाही साहित्यिकांच्या आणि रसिकांच्या उदंड प्रतिसादामुळे लाखो रुपयांची पुस्तक खरेदी होईल,अशी अपेक्षा परिषदेचे कार्यवाह शाहीर भारत गाडेकर यांनी व्यक्त केली आहे. राज्यभरातील साहित्यिक आणि साहित्यप्रेमी नागरिकांनी या दोन दिवसीय भरगच्च साहित्य पर्वात मोठ्या संख्येने सहभागी होऊन या वैचारिक आणि साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन शब्दगंध साहित्यिक परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या