आष्टी (प्रतिनिधी)
राज्याच्या कानाकोपऱ्यातून आणि अत्यंत सामान्य शेतकरी कुटुंबातून विद्यार्थी लातूरसारख्या ठिकाणी वैद्यकीय प्रवेशाचे स्वप्न उराशी बाळगून येतात.मात्र,नुकतीच उघडकीस आलेली 'नीट' परीक्षेच्या पेपरफुटीची घटना अत्यंत दुर्दैवी आणि चिंताजनक आहे.यामुळे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या गरिबांच्या मुलांवर मोठा अन्याय होत असून,विद्यार्थ्यांनी केवळ वैद्यकीय क्षेत्रामागे न धावता इतरही महत्त्वाच्या क्षेत्रांत आपले करिअर घडवावे, असे अत्यंत परखड मत माजी आ.भीमराव धोंडे यांनी व्यक्त केले.
आष्टी येथील पंडित नेहरू विद्यालयामध्ये आयोजित गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार समारंभात ते बोलत होते.यावेळी मंचावर विद्यालयाचे मुख्याध्यापक तथा प्राचार्य सुरेश बोडखे आणि ग्रामपंचायत अधिकारी उद्धव शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यार्थ्यांना आणि पालकांना मार्गदर्शन करताना माजी आ.भीमराव धोंडे यांनी शिक्षण व्यवस्थेतील सद्यस्थितीवर तीव्र चिंता व्यक्त केली.त्यांनी अनेक उदाहरणे देत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त अशी भूमिका विस्तृतपणे मांडली.ते म्हणाले की,लातूरमध्ये घडलेला पेपरफुटीचा प्रकार हा अत्यंत गंभीर आहे. महाराष्ट्राच्या विविध भागांतून आलेली मुले येथे प्रचंड कष्ट करतात. घाम गाळून आणि पुस्तकात डोके घालून आपले भविष्य घडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतात.मात्र,जर पेपर लीक करून श्रीमंत घरची मुले क्लासच्या माध्यमातून गुण मिळवून वरच्या स्तरावर जात असतील,तर हा सर्वसामान्य आणि गरीब घरच्या विद्यार्थ्यांच्या कष्टांवर पाणी फेरणारा घोर अन्याय आहे.
चौकट
--------
लातूरचे आजवरचे यश
बोगस होते का?
------------
"सामान्य माणसाच्या मुलावर होणारा हा आजवरचा अन्याय भरून कसा निघणार? ही अत्यंत भीषण स्वरूपाची बाब आहे.या प्रकारामुळे आतापर्यंत लातूरने जे यश मिळवले,ते खरोखरच पारदर्शक होते की बोगस? असा उद्विग्न सवाल आणि प्रश्नचिन्ह माजी आ.धोंडे यांनी यावेळी उपस्थित केला.
पेपरफुटीच्या या नैराश्यजनक वातावरणात विद्यार्थ्यांनी खचून न जाता आपला दृष्टिकोन व्यापक करण्याची गरज असल्याचे धोंडे यांनी स्पष्ट केले. केवळ 'मेडिकल' हेच अंतिम ध्येय न मानता,त्याशिवाय आजच्या काळात अनेक नवनवीन आणि तितकीच महत्त्वाची क्षेत्रे विद्यार्थ्यांसाठी खुली आहेत. त्यामध्येही विद्यार्थ्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध करून उत्तम करिअर घडवावे असा मोलाचा आणि आधार देणारा सल्ला त्यांनी उपस्थितांना दिला.
या सत्कार समारंभाला विद्यार्थी, पालक आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आल्याने विद्यार्थ्यांचा उत्साह द्विगुणित झाला होता.
---------------
0 टिप्पण्या