आष्टी (प्रतिनिधी)
शब्दगंध साहित्यिक परिषद,महाराष्ट्र राज्य यांच्यावतीने आयोजित १७ व्या.राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलनात विविध साहित्यकृतींचा प्रकाशन सोहळा रविवार दि.२४ मे रोजी सकाळी १० वाजता जाधव लॉन्स अहिल्यानगर येथे संपन्न होणार आहे.या सोहळ्यात ५ महत्त्वपूर्ण ग्रंथांचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती परिषदेचे कार्यकारी मंडळ सदस्य हर्षल आगळे व मकरंद घोडके यांनी दिली.
या प्रकाशन समारंभात सौ.एस.एम.मिर्झा यांच्या ‘प्रारब्ध’ या कथासंग्रहाचे,सुरेखा घोलप यांच्या ‘अंतरी’ या काव्य संग्रहाचे,बाळासाहेब देशमुख यांच्या ‘माणसं अशी अन तशीही’या कथासंग्रहाचे,विनय पिंपरकर यांच्या ‘निशब्द भावना’या काव्यसंग्रहाचे तसेच संमेलनाध्यक्ष राहिलेल्या मान्यवरांच्या भाषणांचे संकलन असलेल्या ‘शब्दसंचित’ या ग्रंथाचे प्रकाशन होणार आहे.‘शब्दसंचित’या ग्रंथाचे संपादन सुनील गोसावी यांनी केले आहे.
साहित्य संमेलनाच्या निमित्ताने नवोदित तसेच अनुभवी साहित्यिकांच्या साहित्यकृतींना व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा शब्दगंध साहित्यिक परिषदेचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे.यावर्षीही विविध विषयांवरील साहित्यकृतींमुळे संमेलनाचे साहित्यिक वैभव अधिक समृद्ध होणार आहे.
सौ.एस.एम.मिर्झा या गृहिणी असून त्यांच्या ‘प्रारब्ध’ या कथासंग्रहातून जीवनातील वास्तव आणि मानवी भावभावनांचे चित्रण करण्यात आले आहे.सुरेखा घोलप या माध्यमिक शिक्षिका असून ‘अंतरी’ या काव्यसंग्रहातून त्यांनी संवेदनशील भावविश्व व्यक्त केले आहे.सेवानिवृत्त टेलिफोन अधिकारी बाळासाहेब देशमुख यांच्या ‘माणसं अशी अन तशीही’ या कथासंग्रहात समाजातील विविध स्वभाववैशिष्ट्यांचे वास्तवदर्शी चित्रण आढळते. वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत असलेल्या विनय पिंपरकर यांच्या ‘निशब्द भावना’ या काव्यसंग्रहातून अंतर्मनातील भावना शब्दबद्ध करण्यात आल्या आहेत.पूर्वीच्या साहित्य संमेलनाध्यक्षांच्या विचारप्रवर्तक भाषणांचे संकलन असलेला ‘शब्दसंचित’हा ग्रंथ साहित्य रसिकांसाठी विशेष आकर्षण ठरणार आहे.

0 टिप्पण्या