Ticker

6/recent/ticker-posts

युवकांनी नोकरीच्या मागे न लागता आधुनिक दुग्ध व्यवसायातून 'शेती उद्योजक' व्हावे ----आ.सुरेश धस ----------------- दुग्ध उत्पादन व्यवसायातून स्वयंरोजगार सुलभ निर्मिती ---- हरप्रीत सिंग ----------------- आष्टी येथील पशुसंवर्धन व दूध उत्पादन वाढ मार्गदर्शन मेळाव्यास हजारोंची उपस्थिती ------------------ उच्चांकी दूध देणाऱ्या गाईंच्या मालकांचा विशेष सत्कार

आष्टी (प्रतिनिधी) दुग्ध व्यवसाय हा आता केवळ शेतीला पूरक धंदा राहिलेला नसून,तो स्वयंरोजगार निर्मितीचा आणि प्रगतीचा एक मोठा मार्ग बनला आहे.युवकांनी केवळ नोकरीच्या पाठीमागे न धावता,आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात करून दुग्ध व्यवसायातून 'शेती उद्योजक' बनावे असे प्रतिपादन आ.सुरेश धस यांनी केले. आष्टी तालुका दूध उत्पादक पुरवठा सहकारी संघाच्या वतीने आयोजित 'पशुसंवर्धन व दूध उत्पादन वाढ मार्गदर्शन मेळाव्यामध्ये'प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते.या भव्य मेळाव्याला दूध उत्पादक शेतकऱ्यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती दर्शवली.यावेळी मंचावर महानंदचे संचालक रणजीत देशमुख,भटिंडा (पंजाब) येथील दुग्ध व्यावसायिक व पशुखाद्य विशेषज्ञ संदीप सिंग आणि डेअरी फार्मर इन्फ्लुएंसर,प्रशिक्षक व सल्लागार हरप्रीत सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.कार्यक्रमाच्या सुरुवातीला पशुखाद्य विशेषज्ञ संदीप सिंग यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.दुग्ध व्यवसायाच्या यशस्वीतेसाठी पशुखाद्य अत्यंत महत्त्वाचे असल्याचे सांगत ते म्हणाले की,गेल्या १५ वर्षांच्या संशोधनातून आम्ही ६७ किलो वजनाची कालवड निर्माण करण्यात यशस्वी झालो आहोत.पशुखाद्यामध्ये मका,प्रोटीन आणि मुरघास यावर भर द्यावा.दुधाळ गाय जास्त वजनाची होऊ नये याची काळजी घ्यावी आणि कोरडा चाराही द्यावा. कालवडीचे वय आणि वजन वाढीनुसार पहिले सहा महिने योग्य आहार दिल्यास, १३ ते १५ महिन्यात ती ३५० किलो वजन प्राप्त करते आणि गाभण राहण्यास योग्य होते. 'मुक्त संचार गोठा' काळाची गरज ---आ.सुरेश धस आष्टी तालुक्यात आपण सर्वात मोठा आणि शास्त्रोक्त पद्धतीने चालणारा गाय गोठा उभारला असल्याचे सांगत आ.सुरेश धस यांनी शेतकऱ्यांना मोलाचा सल्ला दिला.दूध उत्पादकांनी जागरूक राहावे.पंजाबमधून अत्यंत हलक्या दर्जाच्या गाई इकडे येत आहेत,त्या आणणे टाळावे.सध्याच्या भोतातल्या मुरघासामुळे गाईंना स्तनदाह होत आहे.यापुढे जमिनीत तीन ताली खोदून,तळाला सोयाबीन,तूर किंवा कडबा टाकून त्यावर मुरघास तयार करावा,गाईंना बांधून ठेवण्यापेक्षा 'मुक्त संचार गोठा' तयार करा.गाईंचे नुसते पोट भरू नका,तर त्यांना बाराही महिने ८० टक्के मुरघास, २० टक्के सोयाबीन सरकी आणि ५ टक्के खुराक द्यावा.चांगल्या उत्पादनासाठी दर्जेदार सिमेन (वीर्य) वापरावे.जगात सर्वात जास्त दूध होलस्टीन फ्रिजियन गायी देतात.लवकरच पाच गाईंच्या गोठ्यासाठी ११ लाख रुपयांची योजना सुरू होणार असून,'गाय तुमची कालवड आमची' ही फायदेशीर योजनाही आणली जाणार आहे. यावेळी ३५,४०,४१ आणि ४२ लिटर दूध देणाऱ्या गाईंच्या मालकांचा आ. धस यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. पंजाबचे डेअरी सल्लागार हरप्रीत सिंग यांनी लहान शेतकऱ्यांना प्रोत्साहन देताना सांगितले की,"डेअरी फार्मिंग ही जीवनस्तर उंचावणारी सर्वोत्तम योजना आहे.हा व्यवसाय छोट्या स्वरूपातही सुरू करता येतो.दुधाला प्रचंड मागणी असून विनाभेसळ दूध निर्मितीद्वारे युवकांनी रोजगार निर्माण करावा.त्यांनी आ.धस यांच्या शेतकऱ्यांप्रती असलेल्या तळमळीचे विशेष कौतुक केले. महानंदचे संचालक रणजित देशमुख यांनी आ.सुरेश धस यांच्या निर्भीड आणि अभ्यासू नेतृत्वाचे कौतुक करत त्यांना'महाराष्ट्र भूषण'प्रमाणे काम करणारे नेते म्हटले.शेतकऱ्यांना दिशा देताना ते म्हणाले की, मिशन ५० लिटर संगमनेर तालुक्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या दारात ५० लिटर दूध देणारी गाय उभी करण्याचे ध्येय ठेवा. व्यवसायाचे व्यवस्थापन हा शेतीचा जोडधंदा नसून एक उद्योग आहे.जमाखर्च आणि उत्पादनाचा ताळमेळ ठेवा. जागतिक प्रगती युरोपमध्ये ६० लिटर दूध देणाऱ्या गाई आहेत,तर पंजाबमध्ये संदीप व हरप्रीत सिंग यांनी ६२ लिटर दूध देणारी गाय निर्माण केली आहे.एका प्रदर्शनात ८७ लिटर दूध देणारी गायही पाहायला मिळाली.दर्जेदार सिमेन वापरून 'आजची कालवड,उद्याची गाय'या सूत्रावर भर द्या.या मेळाव्याला महानंद दूध महासंघाच्या संचालिका सौ. प्राजक्ताताई धस,राजहंस दूध संघ संगमनेरचे व्हाईस चेअरमन राजेंद्र चकोर,संचालक विक्रमराजे थोरात,विलासराव कवडे, डॉ.प्रमोद पावसे,आष्टी तालुका दूध संघाचे चेअरमन शांतिलाल भोसले,व्हाईस चेअरमन अशोक गर्जे,मच्छिंद्र धनवडे, सभापती बद्रीनाथ जगताप,आत्माराम फुंदे,मोहन झांबरे, दिनकर दाणी, गणेश मोकाशे,गोकुळ कोकणे,डॉ.संतोष शेळके,भरत सुळे, शिवाजी घोलप,माऊली जरांगे,डॉ.जालिंदर वांढरे,चंद्रकांत भोसले यांच्यासह दूध संघाचे अधिकारी,पदाधिकारी आणि दूध उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ---------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या