Ticker

6/recent/ticker-posts

ज्या शाळेत घडलो, त्या शाळेचे आपण देणे लागतो...!' ---------------- माजी विद्यार्थ्यांकडून सावरगाव घाट येथील शाळेला अडीच लाखांचा विकास निधी ----------------- १४ वर्षांनंतर रंगले स्नेहसंमेलन; 'ट्वेल्थ युनिटी फाउंडेशन'ची स्थापना, शिक्षकांचाही दातृत्वात सहभाग

आष्टी (प्रतिनिधी) जीवनात यशस्वी झाल्यानंतर ज्या शाळेने आपल्याला घडवले, त्या मातृसंस्थेची आठवण ठेवणारे दुर्मिळच.मात्र,सावरगाव घाट येथील श्री संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी समाजासमोर एक आदर्श वस्तुपाठ ठेवला आहे.तब्बल १४ वर्षांनंतर एकत्र आलेल्या १० वी.आणि १२ वी.च्या माजी विद्यार्थ्यांनी केवळ जुन्या आठवणींना उजाळाच दिला नाही तर शाळेच्या इमारत बांधकामासाठी तब्बल अडीच लाख रुपयांचा भरीव निधी देण्याची ऐतिहासिक घोषणा केली.याशिवाय शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी 'ट्वेल्थ युनिटी फाउंडेशन'चा शानदार शुभारंभही या स्नेहसंमेलनात करण्यात आला. श्री संत भगवान बाबा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, सावरगाव घाट येथे रविवारी माजी विद्यार्थ्यांचा 'गेट-टुगेदर' कार्यक्रम अत्यंत उत्साही आणि तेवढ्याच भावनिक वातावरणात पार पडला.१४ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर मित्र-मैत्रिणी आणि गुरुजन एकत्र आल्याने संमेलनात आनंदाला उधाण आले होते.हास्यविनोद आणि शालेय जीवनातील जुन्या आठवणींच्या गप्पांनी वातावरण भारावून गेले होते. हे स्नेहसंमेलन केवळ गप्पा-गोष्टींपुरते मर्यादित राहिले नाही.ज्या शाळेने आपल्या आयुष्याला आकार दिला,त्या शाळेचे आपण काहीतरी देणे लागतो या उदात्त भावनेतून सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकजुटीने शाळेच्या विकासासाठी पुढाकार घेण्याचा निर्णय घेतला.यातूनच इमारत बांधकामासाठी अडीच लाख रुपयांचा शिक्षण निधी चालू शैक्षणिक वर्षातच शाळेला सुपूर्द करण्याचा महत्त्वपूर्ण ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. भविष्यातील शालेय उपक्रमांना संस्थात्मक दिशा देण्यासाठी या कार्यक्रमाच्या निमित्ताने 'ट्वेल्थ युनिटी फाउंडेशन'ची अधिकृत स्थापना करण्यात आली.हे फाउंडेशन यापुढे शाळेत विविध लोकोपयोगी उपक्रम राबवणे,गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना आर्थिक मदत करणे आणि अत्याधुनिक शैक्षणिक सुविधा निर्माण करण्यासाठी कटिबद्ध असेल.शाश्वत मदतीचा ओघ सुरू राहावा यासाठी शाळेत कायमस्वरूपी'शिक्षा निधी पेटी' ठेवण्याचा अभिनव निर्णयही घेण्यात आला.विद्यार्थ्यांचा हा उत्साह आणि मातृसंस्थेप्रती असलेली कृतज्ञता पाहून उपस्थित शिक्षकही भारावून गेले.त्यांनीही या ज्ञानयज्ञात आपल्या दातृत्वाची भर घातली.शाळेचे आदर्श शिक्षक आरिफ सर यांनी त्यांच्या दिवंगत आईच्या स्मरणार्थ ५१ हजार रुपये देण्याची घोषणा केली तर आजीनाथ सानप यांनी ५० हजार रुपये देण्याचा संकल्प बोलून दाखवला.सर्व शिक्षकवृंदाच्या वतीने शाळेच्या या नव्या प्रवासात खंबीर साथ देण्याचे आश्वासन देण्यात आले.या प्रेरणादायी सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी बी.टी.खाडे सर होते तर प्रमुख अतिथी म्हणून प्राचार्य मुंडे सर,प्राचार्य सय्यद सर,पी.जी.बांगर,बांगर सर,वनवे सर, खाडे सर,ढवळे सर,माजी मुख्याध्यापक राम सर,आरिफ सर, विकास शिरसाट सर,पवार सर आदी मान्यवर शिक्षक उपस्थित होते.कार्यक्रमाचे खुमासदार सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन अभिमन्यू महाराज खाडे व सय्यद सर यांनी केले. चौकट ------------ सावरगाव घाट येथील हे स्नेहसंमेलन शाळेच्या इतिहासातील एक सुवर्णपान ठरले आहे.माजी विद्यार्थ्यांच्या या एकजुटीमुळे शाळेच्या विकासाला नवी गती मिळणार असून,समाजाप्रती कृतज्ञता व्यक्त करणारा हा उपक्रम संपूर्ण राज्यासाठी एक दिशादर्शक आणि प्रेरणादायी उदाहरण ठरला आहे. -----------------

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या