
आष्टी (प्रतिनिधी)
भारताच्या कुस्ती परंपरेला ऑलिम्पिकच्या नकाशावर सुवर्णाक्षरांनी कोरणाऱ्या स्व. खाशाबा जाधव यांच्या नावाने होणारी प्रतिष्ठेची 'स्व.खाशाबा जाधव चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धा - २०२६' यंदा बीडच्या लाल मातीत रंगणार आहे.राज्याच्या उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांनी या स्पर्धेच्या आयोजनास तत्काळ मान्यता दिली आहे.महाराष्ट्र कुस्तीगीर संघाचे बीड जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. भीमराव धोंडे यांच्या आग्रही मागणीला आणि पाठपुराव्याला मोठे यश आले आहे.
मुंबई येथे उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांच्या अध्यक्षतेखाली आणि मार्गदर्शनाखाली विविध राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धांच्या आयोजनाबाबत नुकतीच एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली.
या बैठकीत बीड जिल्ह्याला कुस्तीचे यजमानपद देण्याचा हा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला.कुस्ती क्षेत्राची नस ओळखणारे,स्वतः कुस्तीची प्रदीर्घ आवड असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते भीमराव धोंडे यांनी बीडमध्ये ही राज्यस्तरीय स्पर्धा घेण्याची आग्रही मागणी शासनाकडे लावून धरली होती.त्यांच्या या मागणीची सकारात्मक दखल घेत ना.सुनेत्राताई पवार यांनी या प्रस्तावाला तातडीने मंजुरी दिली. बीडच्या कुस्ती परंपरेला मिळणार नवे बळ बीड जिल्ह्याला कुस्तीची एक अतिशय समृद्ध आणि जुनी परंपरा लाभली आहे.मात्र,अशा मोठ्या राज्यस्तरीय स्पर्धेच्या आयोजनामुळे या परंपरेला आता खऱ्या अर्थाने संजीवनी मिळणार आहे.या भव्य स्पर्धेच्या निमित्ताने ग्रामीण तसेच शहरी भागातील होतकरू आणि रांगड्या मल्लांना आपल्या ताकदीचे आणि लाल मातीतील डावांचे प्रदर्शन करण्यासाठी एक मोठे राज्यस्तरीय व्यासपीठ त्यांच्याच जिल्ह्यात उपलब्ध होणार आहे.आजच्या आधुनिक काळात युवा पिढीला पुन्हा एकदा पारंपरिक लाल मातीतील कुस्तीकडे आकर्षित करण्यासाठी आणि त्यांच्यात नवचैतन्य निर्माण करण्यासाठी ही स्पर्धा अत्यंत प्रेरणादायी ठरेल.क्रीडाप्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण बीड जिल्ह्याला या प्रतिष्ठेच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेचे यजमानपद मिळाल्याने जिल्ह्यातील तमाम कुस्तीप्रेमी,मल्ल,वस्ताद आणि तालमींशी जोडलेल्या नागरिकांमध्ये सध्या कमालीच्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान,जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी आणि मल्लांसाठी एवढी मोठी ऐतिहासिक संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल,माजी आ.भीमराव धोंडे यांनी उपमुख्यमंत्री ना.सुनेत्राताई पवार यांचे आभार मानले आहेत.
0 टिप्पण्या