उत्तम बोडखे,आष्टी
-----------------
अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील संजय आणि रमेश गदादे या बंधूंनी वडिलोपार्जित दुग्ध व्यवसायात आधुनिकतेची कास धरत मोठी गरुडझेप घेतली आहे.केवळ दूध उत्पादन न करता,पशुपालनाचे काटेकोर व्यवस्थापन,दर्जेदार चारा नियोजन आणि'सुविधा डेअरी'च्या माध्यमातून थेट ग्राहकांना दूध व उपपदार्थांची विक्री करत त्यांनी परिसरातील शेतकऱ्यांसमोर एक आदर्श उभा केला आहे.
शिक्षणाचा आणि
व्यवसायाचा सुरेख मेळ
------------
गदादे कुटुंबाकडे केवळ एक-दोन गाईंचा असणारा हा वडिलोपार्जित व्यवसाय होता.रमेश गदादे यांचे डी.फार्मसीचे शिक्षण झाले असून ते स्वतःचे मेडिकल चालवतात,तर संजय गदादे यांचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे.शेती आणि इतर व्यवसाय सांभाळून त्यांनी या पिढीजात व्यवसायाचा विस्तार करण्याचे ठरवले.कुटुंबाची १४ एकर शेती असून,त्यात ऊस,कांदा,मका आणि चाऱ्यासाठी नेपिअर गवत व लसूण घासाचे नियोजनबद्ध पीक घेतले जाते.आज या व्यवसायाच्या जिवावर गदादे कुटुंबातील पुढची पिढी उच्च शिक्षण घेत आहे.रमेश यांची मुलगी अंजली आणि संजय यांची मुलगी गायत्री या दंतचिकित्सेचे शिक्षण घेत आहेत,पूर्ण केले आहे.तर दुसरी मुलगी निकिता अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असून,मुले ओमकार आणि साहिल हे बारावीत आहेत.या संपूर्ण व्यवसायात त्यांना आई आशाबाई,रमेश यांच्या पत्नी संगिता आणि संजय यांच्या पत्नी सुनंदा तसेच घरातील सर्व मुलांची मोलाची साथ मिळते.
आधुनिक मुक्तसंचार गोठा आणि काटेकोर व्यवस्थापन सध्या गदादे बंधूंकडे २८ एचएफ (HF) गाई,१८ कालवडी आणि १३ म्हशी आहेत.२०१६ मध्ये त्यांनी एक एकर क्षेत्रावर आधुनिक मुक्तसंचार गोठ्याची उभारणी केली.यात दुभत्या गाई,गाभण गाई,वासरे आणि म्हशींसाठी स्वतंत्र व्यवस्था आहे.आजारी जनावरांचा संसर्ग इतरांना होऊ नये म्हणून त्यांना वेगळे ठेवून विशेष काळजी घेतली जाते.दूध काढणीसाठी आधुनिक 'मिल्किंग मशिन'चा वापर केला जातो,ज्यामुळे एकाचवेळी सहा गाईंचे दूध काढणे शक्य होते.




उन्हाळ्याच्या झळांपासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी गोठ्यात मोठे पंखे आणि जनावरांना स्वच्छ धुण्यासाठी स्वतंत्र शॉवरचीही उभारणी करण्यात आली आहे.
'टीएमआर' तंत्रज्ञान
आणि चारा नियोजन
---------------
जनावरांच्या उत्तम आरोग्यासाठी गदादे कुटुंब पंजाबमध्ये प्रचलित असलेल्या 'टीएमआर'(टोटल मिक्सरेशन) पद्धतीने चारा देते.यात ७० टक्के मुरघास,२० टक्के गव्हाचा भुस्सा आणि १० टक्के नेपिअर गवताची कुट्टी यांचा १२ तास थर लावून तो एकत्रितपणे जनावरांना दिला जातो.एका गाईला दररोज ३० किलो चारा लागतो.चारा टंचाईवर मात करण्यासाठी स्वतःच्या शेतातील आणि बाहेरून विकत आणलेल्या मक्यापासून दरवर्षी तब्बल अडीचशे टन 'मुरघास' तयार केला जातो.सेंद्रिय खतातून अतिरिक्त उत्पन्न गोठ्यातून वर्षाकाठी २० ते २५ ट्रॉली शेणखत उपलब्ध होते. यातील ५० टक्के खत स्वतःच्या शेतात वापरून उर्वरित खताची विक्री केली जाते.गोमूत्र मिश्रित दर्जेदार शेणखत असल्याने त्याला बाजारात मोठी मागणी असून,यातूनही कुटुंबाला चांगला आर्थिक हातभार लागत आहे.
चौकट
-----------
थेट दूध विक्री आणि'सुविधा डेअरी'तून उपपदार्थ निर्मिती गदादे कुटुंबाने केवळ उत्पादनावर न थांबता थेट मार्केटिंगवर भर दिला आहे.दररोज म्हशींचे ८० लिटर तर गाईचे ३८० लिटर दुधाचे संकलन होते.गाईचे दूध ४५ रुपये तर म्हशीचे दूध ७० रुपये प्रति लिटर दराने थेट जागेवरूनच विकले जाते. याशिवाय,मिरजगावात'सुविधा डेअरी' सुरू करून त्या माध्यमातून दररोज १०० लिटरहून अधिक दुधाची थेट ग्राहकांना विक्री केली जाते.मागील दोन महिन्यांपासून त्यांनी स्टीम बॉयलरसारख्या आधुनिक यंत्रणेचा वापर करून दुधापासून पनीर,खवा,दही,ताक,तूप यांसारखे उपपदार्थ तयार करण्यास सुरुवात केली असून,ग्राहकांकडून त्याला प्रचंड पसंती मिळत आहे.
चौकट
--------
गाईंना बसविले इस्रायली 'अॅक्टिव्हिटी मॉनिटरींग सेन्सर' पशुपालनात तंत्रज्ञानाचा सर्वोच्च वापर करत गदादे बंधूंनी ५ वर्षांपूर्वी २ लाख ४० हजार रुपये खर्च करून १८ गाईंना महागडे इस्रायली 'अॅक्टिव्हिटी मॉनिटरींग सेन्सर' टॅग बसवले आहेत.या अत्याधुनिक तंत्रज्ञानामुळे गाईची 'हिट'(माजावर येण्याची वेळ),तिने खाल्लेला चारा,प्यायलेले पाणी आणि तिची शारीरिक हालचाल या सर्व बाबींची अचूक माहिती रमेश गदादे यांच्या मोबाईलवर मिळते.यामुळे एखादी गाय आजारी पडण्यापूर्वीच तिच्यावर तातडीने उपचार करणे शक्य होते व संभाव्य मोठे नुकसान टळते.
गदादे बंधू यांना दैनिक झुंजार नेता परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा......
ले ख क
------------
उत्तम बोडखे,आष्टी.
-----------------
0 टिप्पण्या