आष्टी( प्रतिनिधी )
वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन मंडळ संलग्नित राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्था गोवा,गोवा विद्यापीठ,विज्ञान भारती, राष्ट्रीय ध्रुवीय आणि महासागर संशोधन केंद्र,भारतीय राष्ट्रीय महासागर माहिती सेवा केंद्र व राष्ट्रीय महासागर तंत्रज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक समुद्र विज्ञान परिषद २३ ते २६ फेब्रुवारी २०२६ दरम्यान गोवा येथे उत्साहात पार पडली.या परिषदेत देश-विदेशातील नामांकित शास्त्रज्ञ,संशोधक व तज्ज्ञ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.या जागतिक परिषदेचे उद्घाटन गोवा राज्याचे विद्यमान मुख्यमंत्री डॉ.प्रमोद सावंत यांच्या हस्ते झाले.या प्रतिष्ठित जागतिक परिषदेत महाराष्ट्रातुन अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील फक्राबाद येथील युवा शास्त्रज्ञ व जैवविविधता संशोधक रणजित रावसाहेब राऊत यांनी सक्रिय सहभाग नोंदविला.ते सध्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर संलग्नित योगेश्वरी महाविद्यालय अंबाजोगाईच्या प्राणीशास्त्र विभागातील संशोधक विद्यार्थी आहेत. त्यांनी “रत्नागिरी येथील भाट्ये खाडीच्या शिंपल्यांतील महत्त्वाचे अन्नघटक” या विषयावर संशोधनपर सादरीकरण केले. आपल्या सादरीकरणातून त्यांनी सागरी जैवविविधतेचे पोषणमूल्य, शिंपल्यांचे मानवी आरोग्यातील महत्त्व तसेच स्थानिक परिसंस्थेतील त्यांची भूमिका यावर सविस्तर प्रकाश टाकला.
सादरीकरणानंतर राऊत यांनी विविध देशांतील तज्ज्ञ शास्त्रज्ञ, प्राध्यापक तसेच सागरी संशोधकांसोबत सखोल चर्चा करून संशोधनविषयक अनुभवांची देवाणघेवाण केली.या चर्चेमुळे सागरी जैवसंपत्तीच्या संवर्धनासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर सहकार्य वाढविण्याची गरज अधोरेखित झाली.रणजित राऊत यांनी या जागतिक परिषदेत महाराष्ट्रातील मराठवाडा विभागाचे प्रतिनिधित्व केले.राऊत यांच्या सोबत पद्मश्री विखे पाटील महाविद्यालय प्रवरानगर, लोनीच्या प्राणीशास्त्र विभागाचे संशोधक विद्यार्थी आशुतोष निरभवने व आकाश जाधव हे सहभागी झाले.त्यांच्या या यशामागे वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.बबन इंगोले, वरीष्ठ शास्त्रज्ञ डॉ.विश्वास चव्हाण,प्राध्यापक डॉ.जी.डी.सुर्यवंशी,प्राध्यापक डॉ.अनिल कुर्हे,प्राध्यापक डॉ.रूपेंद्र भागडे,प्राध्यापक डॉ.जे.डी.शेख तसेच विविध मान्यवरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.या परिषदेत विविध तांत्रिक सत्रे,कार्यशाळा,व्याख्याने,चर्चा सत्रे,प्लेनरी टॉक्स व संशोधन सादरीकरणांच्या माध्यमातून सागरी विज्ञान,

हवामान बदल,जैवविविधता संवर्धन आणि सागरी संसाधनांच्या शाश्वत वापरावर चर्चा करण्यात आली.
युवा शास्त्रज्ञ रणजित राऊत यांच्या या आंतरराष्ट्रीय स्तरावरील सहभागामुळे महाराष्ट्रातील संशोधन क्षेत्राला नवी दिशा मिळत असून,त्यांच्या कार्याबद्दल सर्व स्तरांतून त्यांचे कौतुक होत आहे.
0 टिप्पण्या